पंजाबी सिनेसृष्टीतील लोकप्रिय गायक, अभिनेता दिलजीत दोसांज हे नाव आता प्रेक्षकवर्गासाठी नवीन राहिलेलं नाही. उत्तम अभिनय आणि आवाजामुळे दिलजीतने अनेकांच्या मनात स्थान निर्माण केलं आहे. दिलजीत सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणावर सक्रीय असून अनेकदा तो त्याचे विचार व्यक्त करत असतो. यामध्येच सध्या त्याचं एक ट्विट चांगलंच चर्चेत आलं आहे. मी सेलिब्रिटी नाही तर गावातला एक सामान्य मुलगा आहे असं त्याने म्हटलं आहे.

अनेकदा सोशल मीडियावर सेलिब्रिटींना ट्रोल व्हावं लागतं. त्यांमुळे एका युजरने दिलजीतला ट्रोलर्सकडे दुर्लक्ष कर असा सल्ला दिला होता. त्यावर दिलजीतने त्याचं मत व्यक्त केला आहे. सोबतच मी ट्रोलर्सकडे दुर्लक्ष करतो. मी एक सामान्य मुलगा आहे असं तो म्हणाला आहे.


“नाही. मी ट्रोलर्सकडे कधीच लक्ष देत नाही. पण या लोकांना वाटतं की मी एक सेलिब्रिटी आहे, त्यामुळे माझ्याविषयी काहीही म्हटलं तरी चालेल. पण, मी कोणी सेलिब्रिटी नाहीये. एक साधारण माणूस आहे. गावातला माणूस, असं ट्विट दिलजीतने केलं आहे.

दरम्यान,दिलजीत हा कलाविश्वातील लोकप्रिय सेलिब्रिटी आहे. पंजाबी सिनेसृष्टी गाजवल्यानंर दिलजीतने त्याचा मोर्चा बॉलिवूडकडे वळवला आहे. उडता पंजाब, गुड न्यूज अशा सुपरहिट चित्रपटांच्या माध्यमातून त्याच्यातील अभिनयाची झलक त्याने दाखविली आहे.