केंद्र सरकारच्या कृषी कायद्यांविरोधात शेतकऱ्यांनी पुकारलेल्या आंदोलनानंतर अभिनेता दिलजीत दोसांज सातत्याने चर्चेचा विषय ठरत आहे. यात अनेकांनी त्याला पाठिंबा दिला आहे. तर काहींनी मात्र, त्याच्यावर टीकास्त्र डागलं आहे. यामध्येच आता दिलजीतच्या नागरिकत्वावर अनेकांनी प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळेच दिलीजतने सोशल मीडियाच्या माध्यमातून या ट्रोलर्सला सडेतोड उत्तर दिलं आहे.

दिलीजने भारतीय नागरिक असल्याचा पुरावा ट्विटरवर शेअर केला आहे. यामध्ये त्याने भारतीय नागरिकत्वाचं प्रमाणपत्र शेअर केलं आहे. सोबतच ट्रोलर्सला खडे बोल सुनावले आहेत.


“आजपर्यंत मी असं कधीच केलं नव्हतं. परंतु, सध्या परिस्थितीच अशी निर्माण झाली आहे की मला भारताचा नागरिक असल्याचा पुरावा द्यावा लागत आहे. इतका द्वेष नका पसरवू”, असं ट्विट दिलजीतने केलं आहे.

पुढे तो म्हणतो, “हे घ्या माझं आणखी एक प्रमाणपत्र. केवळ ट्विटवर देशभक्त असल्याचं म्हटल्यावर कोणी देशभक्त होत नाही. त्यासाठी तसं कार्य करावं लागतं.”
दरम्यान, दिलजीत लोकप्रिय पंजाबी गायक आणि अभिनेता आहे. गेल्या काही दिवसांपासून तो सोशल मीडियावर सातत्याने चर्चेत येत आहे. लवकरच तो ‘जोडी या आगामी पंजाबी चित्रपटात झळकणार आहे.