अभिनेता अक्षय कुमार त्याच्या विविध धाटणीच्या भूमिकांमुळे नेहमीच प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत असतो. एका चांगल्या अभिनेत्यासोबतच बॉलिवूडचा हा खिलाडी कुमार एक चांगला पती आणि पिता म्हणूनही त्याच्या भूमिका अगदी चोखपणे पार पाडतो. बी टाऊनमध्ये अनेकांच्याच पसंतीच्या काही सेलिब्रिटी जोड्यांपैकी एक म्हणजे अभिनेता अक्षय कुमार आणि त्याची पत्नी ट्विंकल खन्ना. गेल्या काही दिवसांपासून अक्षय कुमार आणि ट्विंकलविषयी विविध चर्चा रंगत आहेत. त्यातच आता आणखी एका चर्चेची भर पडली आहे. आपल्या प्रभावशाली व्यक्तिमत्त्व आणि भूमिकांद्वारे अनेकांना भुरळ पाडलेल्या खिलाजी कुमारला त्याच्या सासुबाई म्हणजेच अभिनेत्री डिंपल कपाडिया काही वेगळेच समजत होत्या. अक्षय ‘गे’ आहे असा डिंपल यांचा समज होता.

ट्विंकच्या एका पत्रकार मित्राने तिला अक्षय ‘गे’ असल्याचे सांगितले होते. ट्विंकलचा तर यावर विश्वासच बसत नव्हता. तिने लगेचच ही बाब डिंपल कपाडिया यांना सांगितली. त्यावेळी डिंपल यांनी ट्विंकलच्या म्हण्यावर विश्वास ठेवला होता. त्यामुळे ज्यावेळी अक्षय कुमार ट्विंकलला लग्नाची मागणी घालण्यासाठी गेला तेव्हा त्याच्यासमोर डिंपल कपाडिया यांनी एक अट ठेवली. अक्षय आणि ट्विंकलला लग्नाआधी एक वर्ष एकमेकांसोबत राहावं लागेल अशी ती अट होती. त्यानंतरच जर त्या दोघांमध्ये सर्वकाही ठीक राहिले तरच ते लग्न करु शकतात असेही डिंपल यांनी स्पष्ट केले होते.

ट्विंकल आणि अक्षयच्या लग्नाआधी डिंपल यांनी अक्षय कुमारचा जेनेटिक रेकॉर्डही तपासून पाहिला होता. या सर्व गोष्टींचा उलगडा करण जोहरच्या ‘कॉफी विथ करण’ या चॅट शो मध्ये करण्यात आला. सध्या हा चॅट शो अनेकांच्याच पसंतीस उतरत आहे. नुकत्याच सुरु झालेल्या या चॅट शो च्या नव्या पर्वाबद्दल प्रेक्षकांमध्ये उत्साहाचे वातावरण पाहायला मिळत आहे. दरम्यान, करणच्या या कार्यक्रमामध्ये लवकरच अभिनेता रणबीर कपूर आणि रणवीर सिंग हे दोघेही एकत्र हजेरी लावणार असल्याची चर्चा आहे. त्यामुळे हे दोन्ही कलाकार करणसह कॉफी प्यायला आणि गप्पा मारायला येणार का हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.