मॉडेल, अभिनेत्री आणि राहुल महाजनची पत्नी अशी ओळख असणारी डिंपी गांगुली ही दुसऱ्यांदा विवाहबद्ध होत आहे. दुबईस्थित उद्योजक रोहित रॉय यांच्याशी डिंपी विवाह करणार असून विवाहापूर्वी मला काहीशी हुरहूर आणि चिंता वाटत असल्याचे डिंपीने सांगितले. मात्र, भविष्याविषयी मी आशावादी असल्याचेही तिने सांगितले. माझ्या मनात एकाचवेळी चिंता आणि हुरहूर दाटून आली आहे. क्षणाक्षणाला बदलणाऱ्या या भावना शब्दांत व्यक्त करता येणार नाहीत. मात्र, माझ्या विवाहाचे हे क्षण माझ्यासाठी आनंददायी असल्याचे डिंपीने सांगितले. टेलिव्हिजनवरील ‘राहुल दुल्हनियाँ ले जायेंगे’ या रिअॅलिटी शोच्या माध्यमातून डिंपी आणि राहुल महाजन यांचा विवाह झाला होता. मात्र त्यांचे हे नाते फार काळ टिकले नव्हते. काही दिवसांपूर्वी राहुल महाजन और डिंपी गांगुली ‘बिग बॉस हल्ला बोल’ या कार्यक्रमात एकत्र दिसून आले होते.