करोना विषाणूचं संक्रमण दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. देशभरातील लाखो लोकांना या प्राणघातक विषाणूची लागण झाली आहे. लाखो लोक बेरोजगार झाले आहेत. कोट्यवधी रुपयांचं नुकसान झालं आहे. साध्या डोळ्यांनाही न दिसणाऱ्या एका विषाणूने देशभरातील लोकांचं जनजीवन विस्कळीत केलं आहे. अशा या प्रतिकूल परिस्थितीवर भाष्य करताना ‘वॉर’ फेम अभिनेत्री दीपानिता शर्मा हिने माध्यमांवर निशाणा साधला आहे. करोनाचं संकट वाढत असताना आपण मात्र टीआरपीच्या शर्यतीत मग्न आहोत, अशी अप्रत्यक्ष टीका तिने माध्यमांवर केली आहे.

अवश्य पाहा – सुशांत मृत्यू प्रकरण: संजय राऊत यांच्यावर सुशांतचं कुटुंब ठोकणार मानहानीचा दावा

“करोना विषाणूचं संकट दिवसेंदिवस वाढतच चाललं आहे. पण आम्ही मात्र टीआरपीच्या शर्यतीत मग्न आहोत. दिवसभरात एक हजारांपेक्षा अधिक रुग्णांचा मृत्यू झाला आहे. जर या गोष्टीमुळे देखील आपल्याला त्रास होत नसेल तर आपलं काही खरं नाही.” अशा आशयाचं ट्विट दीपानिताने केलं आहे. करोना संक्रमणाच्या पार्श्वभूमीवर तिचं हे ट्विट सध्या चर्चेत आहे.

अवश्य पाहा – सुशांतनं पत्ता म्हणून दिलेला फ्लॅट आठ वर्षांपूर्वीच रियाच्या वडिलांनी घेतला होता विकत

देशभरात मागील २४ तासांत ५३ हजार ६०१ करोनाबाधित

जगभरात थैमान घालणाऱ्या करोना विषाणूचा प्रादुर्भाव देशभरात अद्यापही झपाट्याने वाढत आहे. करोनाबाधितांच्या संख्येबरोबर मृतांच्या संख्येतही दररोज वाढ होताना दिसत आहे. देशभरात मागील २४ तासांमध्ये तब्बल ५३ हजार ६०१ नवे करोनाबाधित आढळले व ८७१ जणांचा मृत्यू झाला आहे. देशातील करोनाबाधितांची एकूण संख्या २२ लाख ६८ हजार ६७६ वर पोहचली आहे. देशातील २२ लाख ६८ हजार ६७६ करोनाबाधितांच्या संख्येत ६ लाख ३९ हजार ९२९ अॅक्टिव्ह रुग्ण, करोनामुक्त झालेले/डिस्चार्ज मिळालेले/स्थलांतरित १५ लाख ८३ हजार ४९० जण व आतापर्यंत मृत्यू झालेल्या ४५ हजार २५७ जणांचा समावेश आहे. आरोग्य मंत्रालयाच्या हवाल्याने एएनआयने हे वृत्त दिले आहे.