आजच्या घडीला प्रेक्षकांना पाहण्यासाठी टेलिव्हिजनवर इतक्या मालिका आहेत की नक्की कोणती मालिका बघावी असा अनेकदा प्रश्न पडतो. किती तरी मालिका सुरु होत असतात. त्यातल्या काही मालिका प्रेक्षकांची मनं जिंकून टेलिव्हिजनवर चांगलाच तग धरतात. तर काही मालिका अगदी काही महिन्यातच बंद होतात. कहानी घर घर की, क्योंकि सास भी कभी बहू थी, ये रिश्ता क्या कहलाता है यांसारख्या हिंदी मालिका तर मराठीत पुढचं पाऊल या मालिकांनी वर्षानुवर्ष प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. अशीच गेली अनेक वर्ष कलर्स वाहिनीवर सुरु असलेली एक मालिका म्हणजे ससुराल सिमर का. मात्र, आता या मालिकेचा जसा प्रेक्षकांना कंटाळा येऊ लागलाय त्याचप्रमाणे त्यातील कलाकारांनाही मालिकेचा कंटाळा येतोय.

ससुराल सिमर का या मालिकेत भूमिका साकारणा-या अविका कौरने काही महिन्यांपूर्वीच ही मालिका सोडली होती. त्यानंतर मालिकेत मुख्य भूमिका साकारणारी दिपिका ककर म्हणजेच सिमर ही मालिका सोडणार असल्याचे वृत्त पिंकविला या संकेतस्थळाने दिले आहे. या संकेतस्थळाला दिलेल्या मुलाखतीत दिपिकाने मालिका सोडणार असल्याचे सांगितले. दिपिका म्हणाली की, होय, मी मालिका सोडण्याचा निर्णय घेतला आहे. आता मी स्वतःसाठी कामातून वेळ काढण्याची गरज आहे. आम्ही गेली काही वर्ष ही मालिका करत असून आता मी खूप थकले आहे. त्यामुळे मी आता स्वतःसाठी वेळ काढायचे ठरवलेय. जर टेलिव्हिजन क्षेत्रातील इतिहासावर नजर टाकली तर बहुतेकदा मालिकेतील मुख्य कलाकारांनी निर्मात्यांसोबतच्या वादामुळे मालिका सोडल्याचे दिसते. तुझ्याबाबतही असे काही नाही ना? असा प्रश्न केला असता दिपिका म्हणाली की, मी मालिका सोडण्यामागे असे कोणतेही वादग्रस्त कारण नाही. याच मालिकेत दिपिकाचा सहकलाकार राहिलेला अभिनेता शोएब इब्राहिम हा तिचा प्रियकरदेखील आहे. तसेच, हे दोघं लवकरच लग्न करणार असल्याचेही म्हटले जात होते. याच कारणामुळे तू मालिका सोडत आहेस का असे विचारले असता तिने असे काही नसल्याचे सांगितले. आम्ही लवकरच लग्न करणार आहोत. पण हे मालिका सोडण्यामागचे कारण नसल्याचे दिपिका म्हणाली.

dipika

कलर्स वाहिनीवर ससुराल सिमर का ही मालिका २०११ साली सुरु झाली होती. यात दिपिका ककर आणि अविका गोर यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या. त्यापैकी अविका गोरने काही महिन्यांपूर्वीच या मालिकेला राम राम ठोकला होता.