X

‘बिग बॉस १२’च्या घरात ‘ससुराल सिमर का’ फेम अभिनेत्री

सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये कोणकोणते स्पर्धक भाग घेणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे.

छोट्या पडद्यावरील सर्वाधिक लोकप्रिय आणि तितकाच वादग्रस्त ठरलेल्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोचा १२वा सिझन लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. सलमान खान सूत्रसंचालन करत असलेल्या या शोमध्ये कोणकोणते स्पर्धक भाग घेणार हे जाणून घेण्याची उत्सुकता सर्वांनाच आहे. ‘ससुराल सिमर का’ या मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री दीपिका कक्कर ‘बिग बॉस’च्या घरात स्पर्धक म्हणून जाणार आहे.

काही दिवसांपूर्वीच दीपिकाने ‘ससुराल सिमर का’ मालिकेतील सहकलाकार शोएब इब्राहिमशी लग्नगाठ बांधली. ती ‘बिग बॉस’च्या स्पर्धेत सहभागी होणार असल्याची माहिती शोएबने स्वत: दिली. एका वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतीत शोएबने सांगितलं की, ‘प्रेक्षकांमध्ये याविषयी खूप चर्चा आहे आणि त्यांना खरं काय ते माहित आहे. पण हो, दीपिका बिग बॉसच्या घरात जाणार आहे.’

वाचा : तेलुगू अभिनेत्री श्री रेड्डीचा सचिन तेंडुलकरवर खळबळजनक आरोप

‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वाची एक अनोखी संकल्पना असते. यावर्षी ‘विचित्र जोडी’ अशी संकल्पना आहे. त्यामुळे शोएबसुद्धा दीपिकासोबत या रिअॅलिटी शोमध्ये सहभागी होणार का असाही प्रश्न त्याला विचारण्यात आला. मात्र त्यावर शोएबने नेमकं काही उत्तर दिलेलं नाही. काही स्पर्धकांच्या बाबतीत ‘बिग बॉस’च्या टीमकडून खूप गोपनियता पाळली जाते. या नियमांमुळे शोएबने त्याच्या सहभागाबद्दल स्पष्ट असं काहीच उत्तर दिलेलं नाही असं समजतंय.

सलमान खान गेल्या नऊ वर्षांपासून ‘बिग बॉस’चं सूत्रसंचालन करत आहे. ‘या शोच्या निमित्ताने अनेक गोष्टी पाहायला आणि शिकायला मिळतात. माणसांचे स्वभाव, एकमेकांशी वागण्यातून त्यांच्यात निर्माण होणारे वाद हे सर्व जवळून अनुभवताना कसं असावं आणि कसं नसावं याबद्दल अनेक गोष्टी लक्षात येतात. हा शो म्हणजे माझ्यासाठी एक वेगळाच मानसिक प्रवास आहे,’ असं तो म्हणतो. येत्या काही दिवसांत इतर स्पर्धकांची नावंदेखील समोर येतीलच.