बॉलीवूडची सध्याची लोकप्रिय अभिनेत्री कोण, असा प्रश्न एका सर्वेक्षणात विचारला गेला आणि आत्तापर्यंत कतरिनाचे नाव ऐकायची सवय झालेल्या कानांना हे नाव ऐकून धक्काच बसला. हे नाव आहे दीपिका पदुकोणचे. ‘कॉकटेल’ चित्रपटातली दीपिकाची बिनधास्त वेरोनिका लोकांना एवढी आवडली आहे की कतरिना काय अगदी करिनालाही बाजूला सारत चाहत्यांनी आपली मते दीपिकाच्या खात्यात जमा केली आहेत.
सर्वेक्षणातील या क्रमवारीनुसार दीपिका पहिली, कतरिना दुसरी आणि करिना चक्क तिसरी..याहीपेक्षा वाईट म्हणजे राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पातळीवर नावलौकिक मिळवण्यासाठी धडपडणारी ‘पीगी चॉप्स’ अर्थात प्रियांका चोप्राचा समावेश पहिल्या पाचांमध्येही नाही. अरेरे! तिच्या प्रेमळ हृदयाचे किती ‘चॉप्स’ झाले असतील कोण जाणे.. पण, आपला पहिला नंबर लागला एकदाचा म्हणत दीपिकाच्या अंगावर मूठभर मास चढले आहे. ‘मला लोकांचे प्रेम काय माझ्या बिनधास्त प्रतिमेमुळे नाही मिळाले तर माझा हळुवार स्वभाव आणि आजवर मी प्रामाणिकपणे के लेले काम शिवाय, चित्रपटसृष्टीची कोणतीही पाश्र्वभूमी नसलेल्या घरातून मी आले आहे ना म्हणून लोकांना माझे जास्त कौतुक आहे, असं अगदी आनंदाच्या भरात काहीबाही बडबडत होती हो दीपिका.
तिचा हा आनंद पुढचे वर्षभर तरी टिकणार आहे. कारण यावर्षी ‘रेस’ चित्रपटानंतर तिचे सलग तीन मोठे चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एक एसआरकेबरोबरचा ‘चेन्नई एक्स्प्रेस’, दुसरा माजी रणबीरबरोबरचा ‘ये जवानी है दिवानी’ आणि तिसरा आजी रणवीरबरोबरचा ‘राम लीला’. त्यामुळे ती वर्षभर चर्चेत असणार आहे. तशीही ती असतेच. आता कतरिनाला रणबीरशिवाय चर्चेचे निमित्त नाही आणि करिना सध्या खान झाल्यामुळे तिलाही चर्चेत राहण्यासाठी काही नाही. दीपिकाला मात्र आजी-माजी प्रियकरांबरोबर अनेक गोष्टी आहेत चर्चेत राहण्यासाठी तो रहो बिनधास्त!