News Flash

थेट रूपेरी पडदा!

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पहिल्याच पर्वात स्पर्धकांवरच नव्हे तर परीक्षक, नाटय़विश्व, नाटय़विश्वातील कलाकार या सगळ्यांवरच एक वेगळा प्रभाव पडला आहे.

| August 2, 2015 12:25 pm

‘लोकसत्ता लोकांकिका’च्या पहिल्याच पर्वात स्पर्धकांवरच नव्हे तर परीक्षक, नाटय़विश्व, नाटय़विश्वातील कलाकार या सगळ्यांवरच एक वेगळा प्रभाव पडला आहे. हे स्पर्धेच्या पहिल्या पर्वात सहभागी झालेल्या कलावंतांकडून जाणवते. एकांकिकेच्या माध्यमातून नाटय़ क्षेत्रातील निरनिराळ्या विभागांत काम करण्याची संधी गुणवान कलाकारांना मिळू शकते याचे प्रात्यक्षिक पहिल्या पर्वानंतर दिसू लागले आहे.
लोकांकिका स्पर्धेचे हे स्वरूप इतर स्पर्धापेक्षा वेगळे असल्याचे मत सहभागी कलाकारांनी नोंदविले असून त्याचा निश्चितच चांगला फायदा दुसऱ्या पर्वात सहभागी होऊ इच्छिणाऱ्या कलाकारांना होईल.
पुण्याच्या निनाद गोरेलाही लोकांकिकातून थेट सुजय डहाके यांच्या सिनेमापर्यंतची वाटचाल करता आली आहे. ‘सॉफ्टकॉर्नर’ प्रस्तुत ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धेच्या दुसऱ्या पर्वासाठी कसून तयारीला लागलेल्या तरुणाईसाठी पहिल्या पर्वातील शिलेदारांचे हे अनुभव नक्कीच नवा उत्साह निर्माण करणारे ठरणार आहेत. येत्या २९ सप्टेंबरला ‘अस्तित्व’च्या सहकार्याने पुन्हा एकदा ‘लोकसत्ता लोकांकिका’ स्पर्धाचे नवे पर्व सुरू होईल. कलावंतांना पारखणाऱ्या नजरा याही वेळी तरुण स्पर्धकांवर लक्ष ठेवून असतील. लोकांकिकेतून थेट चित्रपटात काम करण्याची संधी पुण्याच्या निनाद गोरेलाही मिळाली.
एस. पी. महाविद्यालयाचा विद्यार्थी असलेल्या निनाद गोरेने लोकांकिकामध्ये ‘व्हील ऑफ विप्स’ या लोकांकिकेत काम केले होते. ‘फुंतरू’ सिनेमाच्या लाइन प्रोडय़ुसर अश्विनी परांजपे यांनी निनादचे काम पाहिले आणि त्याला दिग्दर्शक सुजय डहाकेसोबत काम करण्याची संधी मिळाली.

लोकांकिकामुळे एका वेगळ्या माध्यमात कामाची संधी मिळाली

पुण्यात रमणबाग शाळेत शिकतानाच मी पाचवीपासून नाटकांमध्ये काम करीत होतो. आमचे शिक्षक रवींद्र सातपुते यांनी मला पहिल्यांदा स्टेजवर सादरीकरण करायला लावले. त्यानंतर दहावीपर्यंत सलगपणे मी नाटकातून काम करीत होतो. राज्यस्तरीय नाटय़ स्पर्धेतही मी पुरस्कार मिळविला आहे. पुढे शालेय शिक्षण संपूवन एस. पी. महाविद्यालयात प्रवेश घेतल्यानंतर तिथेही पुन्हा महाविद्यालयाच्या आर्ट सर्कलमधून रंगमंचीय विश्वात सामील झालो. पुरुषोत्तम करंडक, फिरोदिया चषक या स्पर्धामधून सातत्याने अभिनय सुरू राहिला. तृतीय वर्षांत शिकत असताना गेल्या वर्षी ‘लोकसत्ता लोकांकिका’मध्ये ‘व्हील ऑफ विप्स’ ही एकांकिका सादर केली.
लोकांकिका स्पर्धेचे वेगळेपण पहिल्याच पर्वात जाणवले. लोकांकिका स्पर्धेत सहभागी होण्याआधी तुम्हाला इथे वेगळ्या प्रकारचे व्यासपीठ उपलब्ध करून दिले जाईल असे आश्वासन आयोजकांनी दिले होते. आज त्याचा अनुभव प्रत्यक्षातही मी घेतला आहे. लोकांकिकाचे स्पर्धा स्वरूप हे म्हणूनच वेगळे आणि या कला क्षेत्रात काम करू इच्छिणाऱ्यांसाठी उपयुक्त असे आहे. लोकांकिका स्पर्धेचे दुसरे वैशिष्टय़ म्हणजे स्पर्धेच्या वेळचे व्यवस्थापन तितकेच परिपूर्ण आणि सुंदर होते. प्रतिष्ठित महाविद्यालयांनी या स्पर्धेत भाग घेतला होता आणि एवढे स्पर्धक, एवढय़ा मोठय़ा प्रमाणात एकांकिका असूनही परीक्षकांनी प्रत्येक एकांकिकेनंतर सविस्तर मार्गदर्शन केले. एरव्ही, पुरुषोत्तम करंडकसाठी मोठय़ा स्टेजवर नाटक करण्याचा अनुभव असलेल्या आम्हा कलाकारांना वर्गाएवढय़ा छोटय़ाशा जागेत स्टेज, प्रॉपर्टीसकट नाटक बसविणे हा एक आव्हानात्मक अनुभव ठरला. त्यामुळे आत्मविश्वासही वाढला. एका एकांकिकेच्या बळावर ‘फुंतरू’सारख्या सिनेमात अभिनय करण्याविषयी विचारणा झाली तेव्हा खरोखरीच आनंद झाला. लोकांकिकेच्या व्यासपीठाचा उपयोग करून चित्रपटासारख्या निराळ्या कला माध्यमात काम करण्याची संधी मिळाली, याचे खूप समाधान वाटते.
निनाद गोरे

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on August 2, 2015 12:25 pm

Web Title: direct silvery veil
Next Stories
1 मनोरंजन..
2 ‘कोकिळ कुहू-कुहू बोले’
3 दृश्यादृश्यांतून उलगडणारा
Just Now!
X