सिनेमातील धूम्रपानाच्या दृश्याआधी ‘धूम्रपान आरोग्यास हानीकारक आहे’, असा संदेश देणारी सूचना दाखविणे बंधनकारक करण्याविरोधात दिग्दर्शक अनुराग कश्यप याने उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. न्यायालयानेही या याचिकेची दखल घेत केंद्र सरकार तसेच सेन्सॉर बोर्डाला मंगळवारी नोटीस बजावत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले आहेत.
मुख्य न्यायमूर्ती मोहित शहा आणि न्यायमूर्ती मनोज संकलेचा यांच्या खंडपीठासमोर अनुरागच्या याचिकेवर सुनावणी झाली. त्या वेळेस केंद्र सरकारचे आरोग्य मंत्रालय, माहिती व प्रसारण मंत्रालयासह सेन्सॉर बोर्डाला नोटीस बजावत ५ मार्चपर्यंत उत्तर दाखल करण्याचे आदेश दिले.
आपल्या ‘अग्ली’ या सिनेमातील धूम्रपानाच्या दृश्याआधी आपण धूम्रपानविरोधी सूचना दाखविणार नाही, अशी भूमिका अनुरागने घेतली आहे. त्याच्या भूमिकेनंतर सेन्सॉर बोर्डाने सिनेमा प्रसिद्ध करण्यास मज्जाव केला आहे. त्या विरोधात अनुरागने न्यायालयात धाव घेत ही सूचना दाखविणे बंधनकारक करणाऱ्या अधिसूचनेलाच आव्हान दिले आहे. ही सूचना दाखविणे हे आपल्या सर्जनशील अभिव्यक्ती स्वातंत्र्याचे आणि मूलभूत हक्कांचे उल्लंघन आहे, असा दावा याचिकेत केला आहे. आपला सिनेमा म्हणजे धूम्रपानाची जाहिरात नाही. ही सूचना केवळ जाहिरातींपुरती मर्यादित आहे, असा दावाही अनुरागने केला आहे. तसेच अवैध, अन्यायकारक आणि मनमानी करणारी धूम्रपानाविरोधातील ही अधिसूचना रद्द करण्याची मागणी याचिकेद्वारे केली आहे.