रेश्मा राईकवार

‘कोर्ट’ चित्रपटानंतर तब्बल पाच वर्षांनी दिग्दर्शक चैतन्य ताम्हाणे ‘द डिसायपल’ हा चित्रपट घेऊन प्रेक्षकांसमोर आला आहे. ‘कोर्ट’नंतर चैतन्य ताम्हाणे कु ठे आहे, या चाहत्यांच्या प्रश्नाला ‘व्हेनिस आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवा’त उत्कृष्ट पटकथेसह क्रिटिक्सचाही पुरस्कार जिंकणाऱ्या ‘द डिसायपल’ या चित्रपटाच्या माध्यमातून त्याने दणदणीत उत्तर दिलं आहे. ‘कोर्ट’नंतर लोक माझ्या दुसऱ्या चित्रपटाची वाट पाहात होते, हीच खरं तर माझ्यासाठी खूप आनंदाची गोष्ट आहे, अशी भावना चैतन्य ताम्हाणेने व्यक्त के ली. अर्थात, या पाच वर्षांत मी चित्रपटच करत होतो, असं सांगणारा चैतन्य वेळ घेऊन चित्रपट बनवण्याची त्याची दिग्दर्शनाची पद्धत आणि एकू णच व्यावसायिक चित्रपटांचा वाढत चाललेला बडेजाव यांची सांगड घालणं अवघड असल्याचं सांगतो. विसाव्या शतकात सिनेमाला मनोरंजनविश्वात जे स्थान होतं ते आता राहिलेलं नाही. एकविसाव्या शतकात ते वेगाने बदलत असल्याची भावना त्याने व्यक्त के ली.

राष्ट्रीय-आंतरराष्ट्रीय पुरस्कारांवर ‘कोर्ट’ची मोहोर उमटली आणि त्यानंतर तो चित्रपट ऑस्कर पुरस्कारांसाठी भारताचं प्रतिनिधित्व करणार होता. त्यामुळे या सगळ्या प्रक्रियेत बराच कालावधी गेला. दरम्यान, ‘द डिसायपल’चे काम सुरू झालं होतं. शास्त्रीय संगीतावर बेतलेल्या या चित्रपटासाठी शास्त्रीय संगीताचा अभ्यास करण्यास जवळपास दोन वर्ष लागली. त्यानंतर पटकथा लेखन, चित्रपटासाठीची पूर्वतयारी यात एक वर्ष निघून गेलं. मात्र पूर्ण तयारीनिशी के लेला हा चित्रपट २०२० या विचित्र वर्षांत इतका प्रतिष्ठेचा पुरस्कार मिळवता झाला, याबद्दल चैतन्य आनंद व्यक्त करतो. मला एका चित्रपटकर्मीने सांगितलं होतं की, तुमचा चित्रपट बनवण्यासाठी तुम्ही किती वेळ घेतला, हे कोणी लक्षात ठेवत नाही. तुमचा चित्रपट चांगला आहे की वाईट आहे हेच लक्षात ठेवलं जातं. त्यामुळे ते लक्षात ठेवूनच ‘द डिसायपल’साठी आवश्यक तो वेळ घेतल्याचं त्याने सांगितलं. पहिल्याच चित्रपटाला आंतरराष्ट्रीय-राष्ट्रीय पुरस्कार मिळाले की दिग्दर्शकासाठी दुसऱ्या चित्रपटाच्या निर्मितीची आर्थिक आणि इतर गणितंही सोपी होतात, असं म्हटलं जातं. मात्र निर्मितीच्या बाबतीत असा अनुभव आपल्याला आलेला नाही, असं तो स्पष्ट करतो. अनेकदा पहिल्या चित्रपटाचं कौतुक झालं की दुसरा चित्रपट फसतोच, असा अनुभव असल्याचं तो गमतीने सांगतो. पण खरोखरच पहिल्याच झटक्यात यश मिळालं तरी नव्या चित्रपटाची जुळवाजुळव तितकी सोपी नसते, असं तो म्हणतो. त्याचं कारण स्पष्ट करताना तो सांगतो की, पहिल्या चित्रपटानंतर दिग्दर्शक  म्हणून आपल्या आपल्याकडूनही अपेक्षा वाढलेल्या असतात. ‘द डिसायपल’चंच उदाहरण तो समोर ठेवतो. शास्त्रीय संगीताचा अभिजात वारसा पुढे नेणाऱ्या गायकाची ही गोष्ट अधिक व्यापक आणि भव्य स्तरावर सांगण्याची आपली इच्छा होती. त्यामुळे साहजिकच निर्मितीचा खर्चही मोठाच होता. जसजसं यश मिळत जातं तसतशी आपली महत्त्वाकांक्षा वाढत जाते. प्रेक्षकांची अभिरूचीही सतत बदलत असते. पाच वर्षांपूर्वी सिनेमाचा प्रेक्षकांशी जो संबंध होता तो आता पूर्णपणे वेगळा झाला आहे. त्यांना टीव्ही, मोबाइलवर चित्रपट पाहण्याची सवय झाली आहे. त्या अर्थाने आशयनिर्मिती वाढली, भरपूर पैसा मार्के टमध्ये ओतला गेला, पण त्यामुळे निर्मितीचा खर्चही तेवढाच वाढला. एका चित्रपटावर इतकी वर्ष मेहनत घेऊन काम करताना निर्मितीच्या खर्चाचं गणित सांभाळणं, चित्रपटाच्या संपूर्ण टीमला सतत प्रोत्साहित ठेवणं, आपला उद्देश हरवू न देता चित्रपट पूर्ण करणं हे आव्हानच आहे, असं तो सांगतो.

दिग्दर्शक म्हणून आपल्याला माहिती नसलेल्या विषयात शिरून चित्रपट करणं ही चैतन्यची खासियत आहे. ‘द डिसायपल’चा जन्मही अशाच पद्धतीने झाल्याचं तो सांगतो. मला स्वत:ला शास्त्रीय संगीताची फारशी आवड नव्हती आणि काही माहितीही नव्हती. वेगवेगळ्या विषयांवर चर्चा करत असताना संगीतकारांचे वेगवेगळे किस्से, शास्त्रीय संगीताचा इतिहास, आपलं ज्ञान दुसऱ्याला देण्यासंदर्भातील नियम, परंपरा हे शास्त्रीय संगीताचं विश्वच इतकं  भारून टाकणारं आहे की मी आपोआप त्याकडे ओढलो गेलो. मग हळूहळू मी शास्त्रीय संगीत ऐकायला सुरुवात के ली, या क्षेत्रातील दिग्गजांच्या मुलाखती घेतल्या. दिल्ली, कोलकाता, अहमदाबाद, बनारस, मुंबई सगळीकडे फिरून मी शास्त्रीय संगीत क्षेत्रातील प्रतिभावंतांना भेटलो, त्यांच्याशी मैत्री के ली. अनेकांना समाजमाध्यमांवरही फॉलो करत होतो. या सगळ्या अभ्यासातून ही पटकथा साकारली आहे, पण हा मला अभ्यास वाटलाच नाही. खूप मजेमजेत मी हा प्रवास के ला, असं चैतन्य सांगतो. अर्थात, पटकथेनुसार शास्त्रीय संगीताचं वास्तव चित्रं उभं करणं हे या चित्रपटासमोरचं फार मोठं आव्हान होतं, असं त्याने सांगितलं. जगभरात शास्त्रीय संगीताचे दर्दी चाहते आहेत. त्यामुळे त्याविषयी भाष्य करणाऱ्या चित्रपटात शास्त्रीय संगीताशी संबंध नसलेल्या उत्तम कलाकाराला घेऊन काम करणंही शक्य नव्हतं. उलट, शास्त्रीय संगीताची जाण असलेल्या नवोदित कलाकारांना घेऊन काम करणं सोपं होईल, असं मला सुरुवातीला वाटलं, पण तेही सोपं नव्हतं, अशी आठवण तो हसत हसत सांगतो. या चित्रपटात एखाद्दुसरा अपवाद वगळता सगळे नवीन कलाकार आहेत, अनेक जण खरोखरच शास्त्रीय संगीतात गायक-वादक म्हणून कार्यरत असणारे आहेत. यासाठी अनेक शास्त्रीय संगीतातील मराठी गायक-गायिकांना आपण खूप त्रास दिला, असं तो सांगतो. या मेहनतीमुळेच पडद्यावर शास्त्रीय संगीताचं हे विश्व अस्सल उभं राहिलं आहे, असं तो म्हणतो.

प्रवास सारखाच..

सिनेमा आणि शास्त्रीय संगीत यांची तुलना होऊ शकत नाही. सिनेमा हे माध्यम तसं नवखं आहे. शास्त्रीय संगीताला किमान आठशे वर्षांचा इतिहास आहे. मात्र शास्त्रीय संगीतात सगळ्यांनाच रुची असते असं नाही. त्यामुळे शास्त्रीय संगीत ही एक  वेगळी संस्कृती मानली जाते. तसेच सिनेमा हा विसाव्या शतकात लोकप्रिय मनोरंजन संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होता. आता मनोरंजनाचे इतके  पर्याय आणि माध्यमं उभी राहिली आहेत की सिनेमाला स्वतंत्र स्थान राहिलेलं नाही. किती जण आता चित्रपटगृहात जाऊन सिनेमा पाहतील, हाही एक प्रश्न आहे. अभिजात चित्रपटनिर्मितीचा अट्टहास जपणं सहजशक्य होईल का, असंही वाटतं.

भाषेची बंधनं नाहीत

सिनेमाची भाषाच वेगळी आहे. सबटायटल्सचा एक अडथळा जर तुम्ही पार करू शकलात तर खूप सुंदर, वेगवेगळ्या गोष्टी तुम्ही सिनेमाच्या माध्यमातून जगभरात पोहोचवू शकता. ‘कोर्ट’ असेल वा ‘द डिसायपल’ या दोन्ही चित्रपटांना राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर मिळालेला प्रतिसाद हा थक्क करणारा आहे. आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवातही तो कु ठल्या भाषेतील चित्रपट आहे यापेक्षा एक चांगला किं वा वाईट चित्रपट असतो.

चैतन्य ताम्हाणे