बॉलिवूडमध्ये सिंगल मदरची काही कमतरता नाही. आतापर्यंत सुष्मिता सेन, रविना टंडन, नीना गुप्ता यासारख्या अभिनेत्री सिंगल मदर झाल्याचे आपण पाहिले. पण तुषार हा सिंगल फादर होणारा पहिलाच अभिनेता ठरला. सरोगसीच्या माध्यमातून तुषार लक्ष्य या गोंडस मुलाचा बाप झाला. त्याने ‘सिंगल फादर’ होण्याचा हा निर्णय अचानक कसा काय घेतला असाच प्रश्न सिनेसृष्टीतील अनेक कलाकारांना हा प्रश्न पडला होता. पण आता तुषारनेच त्याने हा निर्णय कोणाच्या सांगण्यावरुन घेतला ते स्पष्ट केले.

तुषारने प्रसिद्ध दिग्दर्शक प्रकाश झा यांच्या सल्ल्यावरून सरोगसीद्वारे ‘सिंगल फादर’ होण्याचा निर्णय घेतल्याचे मान्य केले. ‘ एकदा विमानातून प्रवास करत असताना प्रकाश यांनी मला लग्नाबद्दल सहज विचारले. तेव्हा मी त्यांना म्हटले की, ‘सध्या लग्न होणं कठीण दिसतंय. कारण सध्या कोणाच्या प्रेमात नाही आणि अरेंज मॅरेज मला करायचं नाहीये.’ खरेतर सिंगल पेरेंट होण्याचा निर्णय घेणे सोपे नव्हते. अनेक प्रश्नांचा काहूर डोक्यात माजला होता.’ तुषारच्या या उत्तरावर झा यांनी त्याला ‘सिंगल फादर’ होण्याचा सल्ला दिला. ‘तू लग्न केले नाहीस तरी एखाद्याचा पिता मात्र नक्कीच होऊ शकतोस,’ असे ते म्हणाले. स्वतः झा यांनी एक मुलगी दत्तक घेतली आहे.

तुषारला प्रकाश यांनी एका कुटुंबाचा नंबर दिला. त्यासंदर्भात तुषारने आवश्यक ती सर्व माहिती घेतली. यानंतर तुषारने त्याचा निर्णय घरी सांगितला. घरातूनही त्याला सकारात्मक प्रतिसाद मिळाला. लोकं चार दिवस चांगलं किंवा वाईट बोलतील पण नंतर गप्प राहतील. ‘लोकांच्या बोलण्याकडे लक्ष न देऊ नकोस,’ असा सल्ला तुषारचे बाबा जितेंद्र यांनी दिला. घरात तुषारच्या या निर्णयाला सर्वाधिक सपोर्ट एकतानेच केल्याचे तुषारने यावेळी आवर्जून सांगितले.

तुषार कुठेही जाताना लक्ष्यला स्वतः बरोबर घेऊन जाणेच पसंत करतो. ‘गोलमाल अगेन’ सिनेमाच्या चित्रीकरणादरम्यानही पूर्णवेळ लक्ष्य त्याच्यासोबतच होता. ‘मी लक्ष्यला सेटवर नेण्यापेक्षा मी ज्या शहरात जातो तिथे नेणं जास्त पसंत करतो. कोणत्याही सर्वसामान्य मुलांप्रमाणे त्याचे पालनपोषण व्हावे अशी माझी इच्छा आहे.’