प्रवीण तरडे दिग्दर्शित आगामी ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट काही दिवसापूर्वी चांगलाच चर्चेत आला होता. या चित्रपटातील ‘आरारारा’ या गाण्यामध्ये खरे गुन्हेगार झळकल्यामुळे हा वादाच्या भोवऱ्यात सापडाल होता. विशेष म्हणजे चित्रपटामध्ये गुन्हेगार झळकले असतानाही दिग्दर्शकांनी याचं समर्थनही केलं होतं. त्यानंतर आज प्रवीण तरडे यांनी या चित्रपटाचं मोशन पोस्टर प्रदर्शित केलं आहे.

दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी आज (१२ ऑक्टोबर) फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून चित्रपटाची पहिली झलक प्रदर्शित केली. विशेष म्हणजे यावेळी चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीखही जाहीर करण्यात आली. यावेळी चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती.

बहुचर्चित ठरलेला ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट येत्या २३ नोव्हेंबर रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार असून या चित्रपटामध्ये शेतकऱ्यांच्या जीवनावर भाष्य करण्यात येणार आहे. पुण्यातील डॉन स्टुडिओ येथे चित्रपटाच्या प्रदर्शनाची तारीख जाहीर करण्यात आली.

दरम्यान, ‘मुळशी पॅटर्न’ हा चित्रपट मुळशी या गावावर आधारित आहे. त्यामुळे यातून मुळशी गावामधील शेतकरी बांधव, येथील पोलीस अधिकारी आणि गावाचा इतिहास यांच्या भोवती चित्रपटाचं कथानक फिरत असल्याचं दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी सांगितलं. या चित्रपटाची निर्मिती अभिजीत भोसले आणि पुनीत बालन यांनी केलं आहे.