शेत जमिनीचे महत्व सांगणाऱ्या ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटाचे दिग्दर्शक प्रविण तरडे यांनी सोशल मीडियावर आपल्या शेतकरी बाबासाठी एक पोस्ट लिहीली आहे. ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाली आहे. या पोस्टमध्ये तरडे यांनी त्यांचे वडिल विठ्ठल तरडे हे वयाच्या ७८व्या वर्षी शेती सांभाळत असल्याचे सांगितले असून तरडे यांनी महाराष्ट्रातील प्रत्येक शेतकऱ्याला सलाम केला आहे. दरम्यान तरडे यांना ‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटातील ‘शेती विकायची नसते वो शेती राखायची असते’ हा डायलॉगदेखील त्यांच्या वडीलांकडे पाहूनच सुचल्याचे त्यांनी म्हटले आहे.

‘माझे वडील विठ्ठल तरडे. शेती विकायची नसते वो शेती राखायची असते. हा डायलाॅग मला ह्यांच्याकडे पाहुन सुचला. शेतीचा एक तुकडा ही न विकतां आज ७८ व्या वर्षी देखील शेती सांभाळतात. महाराष्ट्रातील अशा प्रत्येक शेतकऱ्याला सलाम’ असे लिहित तरडे यांनी फेसबुकवर पोस्ट केली आहे.

प्रवीण तरडेंच्या ‘मुळशी पॅटर्न’ या चित्रपटाने राज्यभरात धुमाकूळ घातला होता. जमिनीला सोन्याचा भाव मिळत आहे, त्यामुळे शेती करून तोट्यात जाण्यापेक्षा जमीन विकून बक्कळ पैसा मिळवण्याचा हव्यास बाळगलेल्या तरुण पिढीवर ‘मुळशी पॅटर्न’ची कथा आधारलेली होती. तसेच चित्रपटातील काही संवाद आणि डायलॉग त्यांनी त्यांच्या वडिलांकडे पाहूनच लिहिले असल्याचे तरडे यांनी स्पष्ट केले आहे.

‘मुळशी पॅटर्न’ चित्रपटानंतर तरडे आणखी एक मराठी चित्रपटसृष्टीतला भव्य आणि बिग बजेट चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला घेऊन येणार आहेत. शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट असणार आहे. या चित्रपटाच्या शूटिंगसाठी प्रवीण तरडे आणि महेश लिमये सध्या रेकी करत आहेत. येत्या १ नोव्हेंबरपासून चित्रपटाच्या शूटिंगला सुरुवात होणार असून पुढच्या वर्षी तो प्रदर्शित होणार आहे.