‘पद्मावती’ चित्रपटावरून एवढे वादविवाद होण्यामागची कारणे काय? या चित्रपटात खरोखरच आक्षेपार्ह प्रसंग आहेत का?, चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे उशिरा का पाठवला आणि तो उशिरा पाठवल्यावर तुम्हाला १ डिसेंबरला चित्रपट प्रदर्शित करण्याची परवानगी मिळेल, असं वाटलंच कसं?, असे प्रश्न माहिती आणि प्रसारण खात्याने नेमलेल्या समितीने दिग्दर्शक संजय लीला भन्साळींना विचारले. समितीच्या या बैठकीतून अजून तरी फार काही साध्य झालेलं नाही. त्यातल्या त्यात सेन्सॉर बोर्डाचे अध्यक्ष प्रसून जोशी यांनी सेन्सॉरच्या सदस्यांनी अजून चित्रपट पाहिलेला नाही, या चित्रपटावरची सेन्सॉर प्रक्रिया सुरू व्हायची आहे, असे सांगत वेळ मारून नेली आहे की वेळ वाढवून घेतली आहे कळायला मार्ग नाही.. पण या पाश्र्वभूमीवर सध्या चित्रपटाला विरोध करणाऱ्यांचे लक्ष सेन्सॉर बोर्ड काय भूमिका घेतंय याकडे लागलं आहे. सेन्सॉर बोर्ड जी भूमिका घेईल ते घेईल.. पण सरकार या सगळ्या वादावर फक्त बघ्याचीच भूमिका घेणार का?, असा सवाल ज्येष्ठ दिग्दर्शक श्याम बेनेगल यांनी केला आहे.

‘पद्मावती’ चित्रपटाला विरोध होतो आहे हे खरे आहे पण अशा प्रकारचा टोकाचा हिंसक विरोध केला जातो आहे हे चुकीचे असल्याचे सांगत बेनेगल यांनी याचा निषेध केला आहे. ‘चित्रपटाला ज्या धमक्या दिल्या जातायेत त्या आता धोक्याच्या पातळीवरच्या आहेत. कलाकारांना, दिग्दर्शकाला धमक्या दिल्या जातायेत आणि त्यासाठी लोक उघड-उघड ५ कोटींचं इनाम जाहीर करतायेत. या धमक्याही थेट टेलिव्हिजन आणि समाजमाध्यमांवरून जाहीरपणे केल्या जातायेत. लोकशाहीमध्ये अशा प्रकारे कोणी उघड धमकावलेलं आम्ही ऐकलेलं नाही. आपल्या देशात विकृतीकरणाच्या आणि मारण्याच्या धमक्या उघडपणे देण्याची परवानगी आहे? त्यांना कोणी फटकारणारच नाही का?’, असा उद्विग्न सवाल बेनेगल यांनी केला आहे. कोणत्याही संघटना किंवा व्यक्ती थेट अशा प्रकारे हिंसेची भाषा करत असताना सरकार फक्त मूकपणे हा प्रकार उघडय़ा डोळ्यांनी बघत बसणार का?, असा प्रश्न त्यांनी उपस्थित केला.

हिंदी चित्रपटाला याआधीही त्यांच्या आशयावरून, गाण्यांवरून विरोध झाला आहे. पण इतक्या टोकाचा विरोध कधीच अनुभवला नव्हता. त्याचबरोबर इतक्या शांतपणे हे हिंसक प्रकार बघणारे सरकारही पाहिले नव्हते, अशा शब्दांत बेनेगल यांनी आपली भावना व्यक्त केली आहे. ‘पद्मावती’ चित्रपटाचे चित्रीकरण सुरू झाल्यापासूनच संजय लीला भन्साळींना विरोध झाला. त्यांच्या सेट्सची तोडफोड केली गेली, त्यांना आणि त्यांच्या तंत्रज्ञांच्या चमूला धक्काबुक्की करण्याचे प्रकार झाले. मात्र एवढे होऊनही या विरोधकांबाबत कोणतीच भूमिका घेतली गेली नाही की भन्साळींना संरक्षण दिले गेले नाही. उलट, हा वाद थोपवण्याऐवजी शांत राहण्याच्या सरकारच्या भूमिकेमुळे तो अधिकच चिघळत चालला आहे, हे चित्र सगळ्याच चित्रपटकर्मीना चिंतेत टाकणारे ठरले आहे. बॉलीवूडमधील चित्रपट संघटना, दिग्दर्शक-निर्माते यांनी वेगवेगळ्या पद्धतीने या वादंगाविरोधात आपला निषेध व्यक्त केला आहे. मात्र अजूनही यावर कोणतेच समाधानकारक उत्तर सरकारक डून मिळालेले नाही. ‘हा खूप धक्कादायक प्रकार आहे. एखाद्याला अशा प्रकारे धमक्या येत असतील तर त्याला संरक्षण देणे सरकारवर बंधनकारक आहे. कोणी हिंसक धमक्या देत असेल तर त्यांना थांबवणं हीसुद्धा सरकारचीच जबाबदारी आहे. मला नवल वाटतंय की याप्रकरणी ना सरकारने कुठली कारवाई केली ना ज्यांना धमक्या येतायेत त्यांना वाचवण्यासाठी काही प्रयत्न के ले आहेत. उलट सत्ताधारी पक्षातील लोकच या धमक्या देणाऱ्या विरोधकांना प्रोत्साहन देण्याचं काम करतायेत’, अशी टीका बेनेगल यांनी केली आहे. चित्रपटातून इतिहास रंगवताना किंवा ऐतिहासिक व्यक्तिरेखा रंगवताना आपल्या पद्धतीने त्याची मांडणी करण्याचे अभिव्यक्तिस्वातंत्र्य प्रत्येकाला असते. किंबहुना, सर्जनशील व्यक्तींनी ते घ्यायला हवे, असे मत चित्रपटसृष्टीतील अनेक मान्यवर दिग्दर्शकांनी व्यक्त केले आहे. ‘मोहेंजोदारो’ चित्रपटाच्या वेळी दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनीही असे स्वातंत्र्य घेत इतिहासाच्या संदर्भाला धक्का न लावता बदल करावे लागतात, असे सांगितले होते. श्याम बेनेगल यांनीही ऐतिहासिक कथांवरून काल्पनिक कथा रचण्यात, चित्रपट करण्यात काहीही वावगे नसल्याचे सांगितले. उलट, ऐतिहासिक कथा किंवा ऐतिहासिक व्यक्तिरेखांना काल्पनिक कथेत उतरवणं ही खूप चांगली कल्पना ठरते, असे मत त्यांनी व्यक्त केले. ‘इतिहासाचे काल्पनीकरण ही वाईट कल्पना नाहीच मुळी.. इतिहासात खूप सुंदर विषय सापडतात ज्यावरून अशा चांगल्या कथा रचता येतात. त्यात साहस आहे, प्रणय आहे, भावनिक नाटय़ आहे, शोकांतिका आहे.. इतक्या अनेक भावभावना या एकाच विषयात सापडतात. शिवाय, ऐतिहासिक व्यक्तिरेखा या नेहमीच प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशा स्वरूपाच्या असल्याने त्यांच्यावरच्या कलाकृती जास्त आकर्षक ठरतात’, असे बेनेगल ठामपणे म्हणतात. त्यामुळे भन्साळींच्या ‘पद्मावती’कडे लोकांनी वेगळी कलाकृती म्हणून पाहणे त्यांना गरजेचे वाटते. पण त्याहीपेक्षा करणी सेनेसारख्या संघटना चित्रपट न पाहता, त्याच्या आशयावरून जो विरोध करतात, आणि त्यांच्या विरोधावर सरकारही हताशपणे बसून राहते हे वातावरण भविष्याच्या दृष्टीने जास्त धोकादायक असल्याचे बेनेगल यांचे म्हणणे आहे.

ऐतिहासिक व्यक्तिरेखा या नेहमीच प्रत्यक्षाहून प्रतिमा उत्कट अशा स्वरूपाच्या असल्याने त्यांच्यावरच्या कलाकृती जास्त आकर्षक ठरतात. त्यामुळे भन्साळींच्या ‘पद्मावती’कडे लोकांनी वेगळी कलाकृती म्हणून पाहणे गरजेचे आहे. पण करणी सेनेसारख्या संघटना चित्रपट न पाहता, त्याच्या आशयावरून जो विरोध करतात, आणि त्यांच्या विरोधावर सरकारही हताशपणे बसून राहते हे वातावरण भविष्याच्या दृष्टीने जास्त धोकादायक आहे.

श्याम बेनेगल