इफ्फीच्या मुद्द्यावरुन सुरु असलेल्या वादाला आता आणखी एक तोंड फुटले आहे. कहानी आणि अल्लादिन या चित्रपटाच्या दिग्दर्शनाची धुरा सांभाळणाऱ्या सुजॉय घोषने इंटनरनॅशनल फिल्म फेस्टिव्हल ऑफ इंडिया म्हणजेच इफ्फीतील ज्युरीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.

‘एस दुर्गा’ आणि ‘न्यूड’ या दोन्ही चित्रपटांच्या वादानंतर सुजॉयने हा निर्णय घेतला. खुद्द सुजॉयनेच आपण ‘इफ्फी’ ज्युरीच्या अध्यक्षपदाचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले. पण, त्याने यामागचे कारण मात्र अद्यापही स्पष्ट केलेले नाही. गोव्यात २० ते २८ नोव्हेंबर दरम्यान पार पडणाऱ्या ४८ व्या ‘इफ्फी’साठी इफ्फीच्या इंडियन पॅनारामा सेक्शनच्या १३ परीक्षकांनी मिळून २६ चित्रपटांपैकी ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे चित्रपट निवडले होते. पण, महोत्सवात दाखवण्यात येणाऱ्या चित्रपटांच्या अंतिम यादीतून ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ हे दोन चित्रपट वगळण्याचा निर्णय केंद्रीय माहिती व प्रसारण मंत्रालयाने घेतला.

वाचा : राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या ‘दशक्रिया’च्या प्रदर्शनास ब्राह्मण महासंघाचा विरोध

नाव जाहीर न करण्याच्या अटीवर एका ज्युरी सदस्याने माहिती व प्रसारण मंत्रालयाच्या या निर्णयाविषयी आपले मत मांडले. २०- २१ सप्टेंबरला मंत्रालयाने ही यादी जाहीर करणे अपेक्षित होते. पण, हल्लीच ही यादी जाहीर करण्यात आली. ज्यामधून ‘एस दुर्गा’ आणि ‘न्यूड’ या दोन्ही चित्रपटांची नावे वगळण्यात आली. विशेष म्हणजे परीक्षकांना कोणतीही पूर्वसूचना न देता हा निर्णय घेण्यात आला.

वाचा : Padmavati Controversy: ‘पद्मावती’ प्रदर्शित होणारच, दीपिकाची गर्जना

मंत्रालयाच्या या निर्णयाचा बऱ्याच ज्युरी सदस्यांनीही विरोध केला आहे. ज्युरी सदस्यांचा हा विरोध पाहता मंत्रालयाकडून मात्र कोणतीही प्रतिक्रिया देण्यात आलेली नाही. ‘न्यूड’ आणि ‘एस दुर्गा’ या दोन्ही चित्रपटांची नावे यादीतून हटवण्यात आल्याप्रकरणी दोन्ही चित्रपटांच्या दिग्दर्शकांनी नाराजीचा सूर आळवला आहे. मंत्रालयाच्या या निर्णयाविरोधात ‘एस दुर्गा’च्या दिग्दर्शकांनी न्यायालयात धाव घेण्याचाही इशारा दिला आहे.