सध्या देशावर करोनाचं संकट असल्यामुळे अनेक ठिकाणी लॉकडाउन सुरु आहे. या लॉकडाउनच्या काळात अनेक उद्योग-व्यवसाय बंद झाले असून अनेकांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यातच या बंदचा परिणाम सामान्यांप्रमाणेच सेलिब्रिटींवरही झाल्याचं दिसून येत आहे. कलाविश्वातील कामकाज ठप्प झाल्यामुळे अनेक जणांना त्यांच्या उदरनिर्वाहासाठी वेगवेगळे मार्ग स्वीकारले आहेत. यामध्येच छोट्या पडद्यावरील प्रसिद्ध दिग्दर्शक रामवृक्ष यांच्यावर भाजी विकण्याची वेळ आली आहे, असं ‘आजतक’च्या वृत्तात नमूद करण्यात आलं आहे.

रामवृक्ष यांनी अनेक गाजलेल्या मालिकांचं दिग्दर्शन केलं असून त्यांनी ‘बालिका वधू’, ‘कुछ तो लोग कहेंगे’ या मलिकांसाठीदेखील काम केल्याचं सांगण्यात येतं. रामवृक्ष हे सध्या उत्तर प्रदेशमधील त्यांच्या गावी भाजी विकण्याचं काम करत आहेत. लॉकडाउनचा काळ सुरु झाल्यानंतर रामवृक्ष त्यांच्या गावी उत्तर प्रदेश येथे गेले होते. मात्र, दिवसेंदिवस परिस्थिती बिकट होऊ लागल्यामुळे त्यांनी भाजी विकण्यास सुरु केली. सध्या ते सायकलवरुन दारोदारी भाजी विकत आहेत.

“रिअल आणि रील लाइफ दोन्ही पाहावं लागतं.सध्या मुलांच्या परिक्षा सुरु आहेत त्यामुळे मुंबईमध्ये येणं शक्य नाही. तसंच मुंबईतही चित्रपटांचं काम बंद आहे. त्यामुळे या काळात कुटुंबाचा सांभाळ करण्यासाठी भाजी विकत आहे”, असं रामवृक्ष यांनी सांगितलं.

दरम्यान, रामवृक्ष यांनी काही गाजलेल्या मालिका आणि चित्रपटांचं दिग्दर्शन केल्याचं म्हटलं जातं आहे. आतापर्यंत त्यांनी २५ पेक्षा जास्त मालिका आणि चित्रपटांचं दिग्दर्शन केलं आहे. मात्र या लॉकडाउनच्या काळात त्यांचं संपूर्ण आयुष्य बदललं असून ते भाजी विकून कुटुंबाचा उदरनिर्वाह करत आहेत.