जयपूर साहित्य उत्सव २०१७ च्या चौथ्या दिवशी गीतकार आणि जाहिरात लेखक प्रसून जोशी यांनी एका परिसंवादाला उपस्थिती लावली होती. हिंदी चित्रपटातील ज्या गाण्यांना महिलांनी विरोध करायला हवा त्याच गाण्यांवर त्या नृत्य करतात, असे वक्तव्य यावेळी प्रसून जोशी यांनी केले. राजस्थानच्या राजधानीत होणा-या जयपूर साहित्य उत्सवाचे हे यंदा दहावे वर्ष आहे.

प्रसून जोशी म्हणाले की, हिंदी चित्रपटांमध्ये महिलांना चुकीच्या पद्धतीने दाखविले जाते. त्या कशावर नाचत आहेत हे सुद्धा त्यांना कदाचित माहित नसते. जोपर्यंत चुकीच्या कामाला नकार दिला जात नाही. तोपर्यंत नवीन काम समोर येत नाही. जाहिरात लिहताना मी नेहमीच महिलांच्या प्रतिष्ठेला किंवा समाजाला कुठेही हानी होणार नाही ना याची काळजी घेतो, असेही ते म्हणाले. मी १५ वर्षांचा असल्यापासून कविता लिहत आहे. पण केवळ कविता लिहून आपले पोट भरणार नाही हे मला माहित होते. त्यामुळेच मी नंतर जाहिराती लिहण्यास सुरुवात केली, असे प्रसून जोशी म्हणाले.

भारतामध्ये लोकांना कवितासुद्धा हवा आणि पाण्यासारख्या फुकट हव्या असतात. त्यासाठी कोणीही पैसे द्यायला तयार नसते, अशी खंत जोशी यांनी व्यक्त केली. ते म्हणाले की, कविता एक दृष्टी देते. जे इतरांना दिसत नाही त्यापलीकडे पाहणे म्हणजे कविता असते. मी कवितांचा वापर जाहिराती विकण्याकरिता करतो, असेही ते म्हणाले. जाहिराती या कोणालाही ठगत नाहीत, त्या ख-या असतात. प्रसारमाध्यामं लोकांना मूर्ख बनवतात आणि पेड न्यूज छापतात, असे प्रसून जोशी चर्चेत जाहिरातींची बाजू मांडताना म्हटले.