वादग्रस्त कार्यक्रमांच्या यादीत अग्रस्थानी असणाऱ्या ‘बिग बॉस’ या रिअॅलिटी शोच्या १२ व्या पर्वाला लवकरच सुरुवात होणार आहे. सलमान खानचं सूत्रसंचालन, सेलिब्रिटी स्पर्धकांचा सहभाग आणि या कार्यक्रमाचं स्वरुप या सर्व गोष्टी पाहता ‘बिग बॉस’च्या प्रत्येक पर्वाला प्रेक्षकांची पसंती मिळते. हीच लोकप्रियता पाहता प्रेक्षकांच्या मनोरंजनाचा जणू विडाच उचललेल्या ‘बिग बॉस’च्या टीमने यंदाच्या पर्वात काही प्रसिद्ध चेहरे या घरात आणण्याचा निर्णय घेतल्याचं पाहायला मिळत आहे. त्यातीलच एक नाव म्हणजे, क्रिकेटपटू श्रीसंत.

भारतीय क्रिकेट संघातून बाहेर असणारा क्रिकेटपटू श्रीसंत ‘बिग बॉस’च्या १२ व्या पर्वात सहभागी होऊ शकतो असं म्हटलं जात आहे. त्याशिवाय टेलिव्हिजन विश्वातील जोडी, भारती सिंग आणि हर्ष लिंबाचिया हेसुद्धा या कार्यक्रमात स्पर्धक म्हणून येणार असल्याचं कळत आहे. हर्ष आणि भारतीव्यतीरिक्त टीना दत्ता, तनुश्री आणि इशिता दत्ता, दीपिका कक्कर, स्कर्लेट रोझ, माहिका शर्मा या कार्यक्रमात येणार असल्याचं म्हटलं जात आहे. त्यातच आता श्रीसंतचंही नाव पुढे आल्यामुळे ‘बिग बॉस’चं यंदाचं पर्व हे खऱ्या अर्थाने लक्षवेधी ठरणार आहे, असं म्हणायला हरकत नाही.

वाचा : Section 377 verdict : ‘अखेर देशाने आम्हाला स्वीकारलं’

स्पॉट फिक्सिंगच्या भोवऱ्यात अडकलेला श्रीसंत बऱ्याच काळापासून क्रिकेटच्या मैदानापासून दूर आहे. मुख्य म्हणजे यादरम्यान, त्याने कलाविश्वातही त्याचं नशिब आजमावून पाहिलं होतं. चित्रपट म्हणू नका किंवा मग रिअॅलिटी शो, विविध क्षेत्रात त्याने प्रवेश केल्याचं पाहायला मिळालं. सध्याच्या घडीला तो ‘केंपेगोडा २’ या चित्रपटाच्या तयारीला लागला असल्याचं कळत आहे.