सुशांत सिंह मृत्युप्रकरणी सध्या मुंबई पोलीस आणि बिहार पोलीस तपास करत आहेत. या तपासामध्ये अनेक नवनवीन गोष्टींचा खुलासा होत आहेत. सुशांतच्या आत्महत्येच्या काही दिवसांपूर्वी त्याची एक्स मॅनेजर दिशा सालियनने आत्महत्या केली होती. त्यामुळे सुशांतच्या मृत्यूचा त्याची एक्स-मॅनेजर दिशा सालियनच्या मृत्यूशी काही संबंध आहे का? यादृष्टीने बिहार पोलीस शोध घेत आहेत. याप्रकरणी दिशाच्या आईने ‘झी न्यूज’च्या मुलाखतीत या दोन्ही आत्महत्येंचा काहीही संबंध नाही, असं म्हटलं आहे.
“दिशाने सुशांतकडची नोकरी सोडल्यानंतर त्या दोघांचा कोणताही कॉन्टॅक्ट नव्हता. ती सुशांतकडे काम करत होती हे आम्हाला माहित नव्हतं. फार उशीरा ही गोष्ट आम्हाला समजली. ती कधीच तिच्या कामाविषयी कुटुंबीयांशी चर्चा करत नसे. फक्त एकदा तिने सांगितलं होतं की ती सुशांतच्या घरी जात आहे. परंतु, त्या एका भेटीचा आणि त्या दोघांच्या आत्महत्येचा संबंध कसा काय लावता येऊ शकतो? तिने फार कमी काळासाठी सुशांतकडे काम केलं होतं”, असं दिशाची आई म्हणाली.
पुढे त्या म्हणाल्या, “सुशांत सिंह राजपूत आणि दिशाच्या आत्महत्येचा कोणताही संबंध नाही. तसंच तिने ऐश्वर्या राय बच्चनसोबतही काम केलेलं नाही. लॉकडाउनमुळे ती घरुनच काम करत होती. त्यामुळे कामाच्या गराड्यात तिने २६ जून रोजी तिचा वाढदिवसदेखील सेलिब्रेट केला नव्हता. तिच्यावर कामाचा ताण होता. पण ती उदास आहे हे मला समजलंच नाही. तिला लहान लहान गोष्टींमध्ये आनंद दिसायचा आणि तिला फिरायला खूप आवडायचं”.
दरम्यान, ८ जूनला दिशाचा मालाड येथे १४ व्या माळ्यावरुन खाली पडून मृत्यू झाला होता. ही आत्महत्या असल्याचा दावा होता. पण पोलिसांनी हा अपघाती मृत्यू असल्याची शंका व्यक्त केली. तर १४ जून रोजी सुशांत सिंहने वांद्रे येथील आपल्या राहत्या घरी आत्महत्या केली. तपास करण्यासाठी बिहारचे एसपी विनय तिवारी मुंबईत दाखल झाले आहेत.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on August 3, 2020 9:38 am