छोट्या पडद्यावरील अतिशय लोकप्रिय मालिका म्हणजे ‘तारक मेहता का उल्टा चष्मा.’ या मालिकेतील दयाबेन म्हणजेच दिशा वकानी गेल्या काही दिवसांपासून मालिकेपासून लांब आहे. पण चाहते तिची आतुरतेने वाट पाहात होते. दिशा वकानी पुन्हा कधी मालिकेत दिसणार? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. अशातच दिशाने मालिकेला कायमचा रामराम ठोकला असल्याचे समोर आले आहे.

२०१७मध्ये दिशा मॅटरनिटी लीव्हवर गेली होती. तेव्हापासून ती तारक मेहता का उल्टा चष्मा मालिकेपासून लांब असल्याचे पाहायला मिळाले. आता दिशाने मालिकेचा कायमचा निरोप घेतला असल्याचे समोर आले आहे.

कोईमोईने दिलेल्या वृत्तानुसार, गेल्या काही दिवसांपासून दिशा मालिकेत पुन्हा दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ती योग्य वेळेची वाट पाहत असल्याचे म्हटले जात होते. दिशा आणि मालिकेचे निर्माते यावर चर्चा देखील करत होते. पण आता दिशाने मालिकेला रामराम ठोकला आहे.

गेल्या काही दिवसांपासून ‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ मालिकेत दयाबेनची भूमिकेत दुसरी अभिनेत्री दिसणार असल्याच्या चर्चा रंगल्या होत्या. ही अभिनेत्री दुसरी तिसरी कोणी नसून राखी विजान आहे. तिने एका मुलाखतीमध्ये दिशा वकानीची भूमिका साकारायला आवडेल अशी इच्छा व्यक्त केली होती. पण निर्मात्यांनी याबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही.