23 August 2019

News Flash

Good News: ‘तारक मेहता..’मध्ये दयाबेनची होणार वापसी; जेठालालने दिले संकेत

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेच्या प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे.

दिलीप जोशी, दिशा वकानी

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ या लोकप्रिय मालिकेच्या प्रेक्षकांसाठी खुशखबर आहे. या मालिकेत दयाबेनची भूमिका साकारणारी अभिनेत्री दिशा वकानी लवकरच परतणार आहे. याचे संकेत खुद्द जेठालाल अर्थात अभिनेता दिलीप जोशी यांनी दिले आहेत. दिशा गेल्या दीड वर्षापासून सुट्टीवर आहे. सप्टेंबर २०१७ मध्ये तिने प्रसूती रजा घेतली. त्यानंतर ती मालिकेत परतणार होती. मात्र बाळंतपणानंतर मालिकेत येण्यासाठी तिने निर्मात्यांसमोर काही अटी ठेवल्या होत्या. यात तिने मानधनात वाढ करण्याचंही सांगितलं होतं. निर्मात्यांनी तिला ३० दिवसांचा अल्टिमेटमसुद्धा दिला होता. पण दिशाकडून काहीच उत्तर न आल्याने त्याने दयाबेनच्या भूमिकेसाठी दुसऱ्या अभिनेत्रीला निवडले. आता पुन्हा एकदा दिशा दयाबेनच्या भूमिकेत प्रेक्षकांना दिसू शकते. ‘डीएनए’ या वेबसाइटला दिलेल्या मुलाखतीत दिलीप जोशी यांनी तसे संकेत दिले.

”माणसाने नेहमी सकारात्मक राहावं. दयाबेनच्या भूमिकेत दिशा परतही येऊ शकते. माझीसुद्धा हीच अपेक्षा आहे आणि त्यासाठी मीसुद्धा आशावादी आहे. दिशाने दयाबेनची भूमिका जगली आहे. गेल्या साडेनऊ वर्षांपासून ती ही भूमिका साकारत आहे आणि त्यासाठी तिने खूप मेहनत घेतली आहे,” असं दिलीप म्हणाले. त्यामुळे दयाबेनला परत आणण्यासाठी अजूनही प्रयत्न सुरू असल्याचं दिसतंय.

‘तारक मेहता का उल्टा चष्मा’ ही मालिका गेल्या अकरा वर्षांपासून प्रेक्षकांचं मनोरंजन करतेय. लहानांपासून थोरांपर्यंत या मालिकेचे चाहते पाहायला मिळतात. यातील प्रत्येक भूमिकेला प्रेक्षकांनी डोक्यावर उचलून घेतलं. त्यामुळे जर दिशा मालिकेत परत येणार असल्यास चाहत्यांसाठी ही नक्कीच आनंदाची बातमी ठरेल.

 

First Published on August 14, 2019 9:58 am

Web Title: disha vakani will return to taarak mehta ka ooltah chashmah dilip joshi revealed ssv 92