गेल्या वर्षी अभिनेत्री तनुश्री दत्ताने ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांच्या वर लैगिंक शोषणाचा आरोप करत मीटू मोहिमेला चालना दिली होती. त्यानंतर बॉलिवूडमधल्या अनेक बड्या लोकांच्या सभ्य चेहऱ्यामागची कृष्णकृत्य उघड झाले. आलोक नाथ यांच्यावर केलेल्या आरोपांमुळे बॉलिवूडमधल्या अनेकांना धक्का बसला होता. आलोक नाथ यांच्यावर #MeToo (मीटू) मोहिमेअंतर्गत निर्माती विनता नंदा यांनी बलात्काराचा आरोप केला होता.

‘मैं भी’ चित्रपटात अलोक नाथ भूमिका साकारणार असल्यामुळे वितरकांनी चित्रपट विकत घेण्यास नकार देत असल्याचे चित्रपट निर्माते इमरान खानने सांगितले आहे. या चित्रपटात आलोख नाथ एका इमानदार न्यायाधीशाची भूमिका साकारणार आहेत. ‘आम्ही आलोक नाथ यांच्यावर लैगिंक शोषणाचे आरोप लागण्याआधी, गेल्या वर्षी जुलैमध्ये या चित्रपटाचे चित्रीकरण सुरू केले होते. इतक्या चांगल्या भूमिकेसाठी कोणीही आलोक नाथ यांना घेऊ शकतं’ असे इमरान म्हणाले.

‘आलोक नाथ यांनी सुभाष घई, यश चोप्रा आणि करण जोहरसारख्या मोठ्या दिग्दर्शंकासोबत काम केल्यामुळे मी देखील त्यांची निवड केली होती आणि माझी निवड चुकीची नाही. मात्र आलोक नाथ यांना माझ्या चित्रपटात घेतल्यामुळे वितरकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली आहे. त्यामुळे माझ्यासारख्या नवोदित निर्मात्यावर झालेला अन्याय आहे’ अशी खंत इमरानने व्यक्त केली आहे.

‘मैं भी’ चित्रपटाची कथा लैंगिक शोषणावर आधारित आहे. तसेच चित्रपटाचे नाव ‘मैं भी’ हे भारतातील मीटू मोहिम सुरु होण्यापूर्वी रजिस्टर करण्यात आले होते.