आपल्या शारीरिक मर्यादांवर मात करून गरूडझेप घेतलेली अनेक उदाहरणं आपल्या डोळ्यांसमोर आहेत. त्यातच आता डॉ. दिव्या बिजूर या तरुणीच्या नावाची भर पडली आहे. नेत्रहीन असलेल्या ३३ वर्षांच्या डॉ. दिव्या यांनी ‘विकून टाक’ या चित्रपटासाठी एक प्रेमगीत गात चित्रपट गायनाचा श्रीगणेशा केला आहे. योगायोगाची गोष्ट म्हणजे त्यांनी गायलेल्या गाण्याचे बोलही डोळ्यांशी संबंधितच आहेत. हे बोल आहेत, ‘डोळ्यांमंदी तुझा चांदवा’!

उत्तुंग ठाकूर निर्मित ‘विकून टाक’ या चित्रपटाच्या निमित्ताने हा योग जुळून आला आहे. योगायोगांची ही साखळी इथेच थांबत नाही. फिजिओथेरपीच्या डॉक्टर असलेल्या दिव्या यांचे वडील नेत्ररोगतज्ज्ञ आहेत. आणखी एक योगायोग म्हणजे त्यांनी ज्या चित्रपटासाठी पहिलंवहिलं गाणं गायलं आहे, तो चित्रपट अवयव दान या एका गंभीर विषयावर अत्यंत खेळकरपणे भाष्य करतो.

“मी जन्मापासूनच दृष्टिहीन आहे. ऑप्टिक नर्व्ह कंडिशनमुळे मला दिसू शकत नाही. अवयव दान हे किती महत्त्वाचं आहे, हे माझ्याशिवाय दुसऱ्या कोणाला चांगल्या पद्धतीने कळू शकेल? ‘विकून टाक’ हा चित्रपट नेमक्या याच विषयावर खूप तरल भाष्य करतो. त्यामुळे या चित्रपटात गाणं गाण्याची संधी मिळणं ही खूप मस्त गोष्ट होती” असं डॉ. दिव्या सांगतात.

डॉ. दिव्या यांच्या घरातील सर्वच जण डॉक्टर आहेत. त्यांचे वडील रवींद्र बिजूर नेत्ररोगतज्ज्ञ आहेत. आई डॉ. सुजल बिजूर या अनेस्थेसिस्ट आणि मोठी बहीण प्रसुतीशास्त्रातल्या तज्ज्ञ आहेत.

अवयव दान या विषयाला अगदी हलक्याफुलक्या पद्धतीने भिडणारा आणि ग्रामीण पार्श्वभूमीवर चित्रित झालेला ‘विकून टाक’ हा चित्रपट ३१ जानेवारीला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे.