गेल्या वर्षी चित्रित ‘चित्रफिती’चे आज अनावरण

महानायक अमिताभ बच्चन यांना ‘याची डोळा’ पाहणे हेच मुळी त्यांच्यासाठी अप्रूप आणि त्या दिवशी तर त्यांच्यासमवेत राष्ट्रगीत गायनासाठी अभिनय साकारायचा होता. मनात धाकधूक सुरू होती. पण ते आले, त्यांनी एकूण एक विद्यार्थ्यांशी हस्तांदोलन करीत संवाद साधला. या आपलेपणातून मनातील भीती कुठच्या कुठे पळून गेली आणि आत्मविश्वास दुणावलेल्या ‘त्या’ ३६ दिव्यांग विद्यार्थ्यांनी बच्चन यांच्या बरोबरीने राष्ट्रगीत गायले. हे सारेच अपूर्व आणि अद्भुत असे होते. ज्याची साक्ष ठरली आहेत, कोल्हापुरातील चेतना अपंग मती विद्यालयातील विद्यार्थी. गेल्या वर्षी चित्रित झालेल्या या राष्ट्रगीत गायनाच्या चित्रफितीचे उद्या (दि. १३) अनावरण होत आहे .

‘वुई केअर फिल्म फेस्ट व ब्रदरहूड’ या दिल्लीस्थित स्वयंसेवी संस्थेने ‘साईन लँग्वेज’ (सांकेतिक भाषा) मध्ये महानायक अमिताभ बच्चन यांच्यासमवेत कर्णबधिर, अंध. अपंग, गतिमंद अशा दिव्यांग विद्यार्थ्यांकडून गेल्या वर्षी राष्ट्रगीत गायनाचे आयोजन केले होते. यामध्ये ३६ दिव्यांगांनी सहभाग घेतला होता. त्यामध्ये कोल्हापुरातील चेतना अपंग मती विद्यालयातील आठ विद्यार्थ्यांचा सहभाग होता. ‘चेतना’बरोबरच अ‍ॅडॅप्ट, हेलन केलर इन्स्टिटय़ूट फॉर द डेफ ब्लाइंड, कमला मेहता, दादर स्कूल फॉर दि ब्लाइंड,, मुंबई, कीर्ती कालरा व सीमरन कालरा, नवी दिल्ली येथील विद्यार्थ्यांचाही समावेश होता.

मुंबईतील ‘राजकमल स्टुडिओ’मध्ये गेल्या वर्षी हे चित्रीकरण पार पडले. या चित्रीकरणावेळीच्या अनुभवाने ही मुले अद्याप भारावून गेली होती. या चित्रीकरणासाठी अमिताभ बच्चन यांनी ११ ते ५ अशी वेळ दिली होती. बरोबर अकराच्या ठोक्याला ते प्रवेशते झाले. थेट मुलांशी संवाद साधला आणि वातावरण सल झाले. सांकेतिक भाषेतील गाण्याच्या ओळींच्या वेळी कोणता अभिनय कसा करायचा हे समजावे यासाठी दोन दिवस आधी दोन जाणकार बच्चन यांना घरी भेटणार होते, पण वेळेअभावी ते जमले नाही. तथापि, प्रत्यक्ष चित्रीकरण सुरू झाल्यावर त्यांना एकेका ओळीच्या वेळीचा सांकेतिक भाषेतील अभिनय समजून सांगण्यात आला.

हा सारा अभिनय अमिताभ यांनी त्या क्षणी आत्मसात केल्याचे ‘चेतना’चे कार्याध्यक्ष पवन खेबूडकर यांनी सांगितले. दिव्यांग मुले आणि त्यांच्या सोबत त्याच अभिनयात सहभागी अमिताभ यांनी एकदाही ‘रिटेक’ न घेता हे चित्रीकरण संपवले. हा सारा अनुभव पाहून याचे आयोजन करणाऱ्या संस्थेचे लोकही थक्क झाले.

आज चित्रफीत प्रकाशन

विविध प्रवर्गातील विकलांग मुलांसमवेत अभिनेते अमिताभ बच्चन यांनी साईन लँग्वेजमध्ये राष्ट्रगीत गायले आहे. या चित्रफितीचा प्रकाशन समारंभ रविवारी (१३ ऑगस्ट) येथील केशवराव भोसले नाटय़गृहात महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांच्या हस्ते आणि खासदार धनंजय महाडिक यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे. या चित्रफितीसाठी आदेश श्रीवास्तव यांचे संगीत लाभले असून, गोिवद निहलानी यांनी दिग्दर्शन केले आहे.

‘चेतना’ची तयारी

चेतना संस्थेतील विद्यार्थ्यांना ‘कॅमेरा’ नवीन नाही. अभिराम भडकमकर यांनी त्यांच्या ‘आम्ही असू लाडके’ या चित्रपटाचे चित्रीकारण याच शाळेतील ३२ मुलांसमवेत तब्बल २० दिवस केले होते. हा अनुभव जोडीला असल्याने सुशांत कुंदे, वन्या करकरे, निखिल डाफळे, अनिशा सुतार, विशाल मोरे, आम्रपाली कांबळे, विनम्र खटावकर, प्रतीक्षा कराळे असे आठ जण महानायकासमवेत आपल्या कलाविष्काराचे अत्युच्च दर्शन घडवू शकले.