04 July 2020

News Flash

चित्रपटांची दिवाळी

दर आठवडय़ाला चित्रपटांची टक्कर अनुभवायला मिळणार आहे.

(संग्रहित छायाचित्र)

एरव्ही दसरा-दिवाळी ही कायम मोठमोठय़ा हिंदी चित्रपटांची असते. सुपरस्टार आणि त्यांचे चित्रपट यांनी या खास सणांच्या मुहूर्तावर शिक्कामोर्तब केलेलं असल्याने इतर चित्रपटांना फारसा वाव मिळत नाही. मात्र यावेळी नवरात्री आणि दसऱ्यात त्यामानाने तिकीटबारीवर बिग बजेट चित्रपटांऐवजी छोटे चित्रपटच जास्त प्रदर्शित झाले. अर्थात, त्यामुळे या चित्रपटांना चांगले कलेक्शन करता आले ही गोष्ट महत्त्वाची आहे. मात्र तुलनेने दिवाळीच्या आठवडय़ापासून मोठय़ा आणि छोटय़ा हिंदी चित्रपटांची एकच गर्दी तिकीटबारीवर पहायला मिळणार आहे. पुढच्या महिन्यात तर कुठलीही फारशी सुट्टी नाही, मात्र दर आठवडय़ाला चित्रपटांची टक्कर अनुभवायला मिळणार आहे. कारण प्रदर्शित होणाऱ्या हिंदी चित्रपटांची एकच रांग लागली आहे.

दसऱ्याच्या आधीच्या आठवडय़ात हृतिक रोशन आणि टायगर श्रॉफ यांच्या मुख्य भूमिका असलेला ‘वॉर’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. त्यानंतरच्या आठवडय़ात प्रियांका चोप्रा आणि फरहान अख्तरचा ‘द स्काय इज पिंक’ वगळता अन्य कुठलाही चित्रपट पहायला मिळाला नाही. याही आठवडय़ात सैफ अली खानचा ‘लाल कप्तान’ हा एकमेव मोठा चित्रपट म्हणता येईल. त्याहीआधी सप्टेंबर महिन्यात आयुषमान खुराणाचा ‘ड्रीमगर्ल’, सुशांत सिंग राजपूत-श्रद्धा कपूरचा ‘छिछोरे’, सोनम कपूरचा ‘द झोया फॅक्टर’ असे एखाददुसरेच चित्रपट प्रदर्शित झाले. त्यातल्या त्यात ‘द झोया फॅक्टर’ आणि संजय दत्तचा ‘प्रस्थानम’ वगळता बाकी दोन्ही चित्रपटांनी तुलनेने बिग बजेट चित्रपट नसताना, कोणताही गाजावाजा केलेले नसताना तिकीटबारीवर आपलं नाणं खणखणीत वाजवलं. महिन्या-दीड महिन्याच्या या शांततेमुळे आता छोटय़ा आणि मोठय़ा दोन्ही चित्रपटांची एकच रांग लागली आहे. त्याची सुरुवात अर्थातच अक्षय कुमार, रितेश देशमुख आणि बॉबी देओल यांच्या ‘हाऊसफुल्ल ४’ने होणार आहे. यावर्षीचा हा बिग बजेट चित्रपटांपैकी एक म्हणून गणला जाणारा चित्रपट आहे, शिवाय आजवर चित्रपट कितीही टुकार असला तरी ‘हाऊसफुल्ल’ चित्रपट मालिका तिकीटबारीवर कायमच यशस्वी ठरली असल्याने याहीवर्षी तो कित्ता गिरवला जाणार अशी ट्रेड विश्लेषकांची खात्री आहे. या चित्रपटाबरोबर तापसी पन्नू-भूमी पेडणेकर जोडीचा बहुचर्चित ‘साँड की आँख’ आणि मिखिल मुसळे दिग्दर्शित ‘मेड इन चायना’ असे तीन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. याच आठवडय़ात मराठीतही ‘हिरकणी’ आणि ‘ट्रिपल सीट’ असे दोन मराठी चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. अर्थातच दिवाळीची सुट्टी असल्याने या चित्रपटांना प्रेक्षक मिळणार आणि जास्त दिवसही मिळणार हा तर्क योग्य असला तरी त्याचे सुफळ तितकेच असेल असे ठामपणे सांगता येणे कठीण आहे. प्रेक्षकांना मात्र चित्रपटांची ही दिवाळी जास्तच खर्चीक ठरणार आहे.

दिवाळीनंतरही १ नोव्हेंबरला ‘टर्मिनेटर : डार्क फेट’ हा हॉलीवूडपट प्रदर्शित होतो आहे.  त्यानंतर ७ नोव्हेंबरला आयुषमान खुराणाचा ‘बाला’ आणि सनी सिंगची मुख्य भूमिका असलेला ‘उजडा चमन’ हे एकाच विषयावरचे दोन चित्रपट प्रदर्शित होत आहेत. आधी याच तारखेला सिद्धार्थ मल्होत्रा-रितेश देशमुख जोडीचा ‘मरजावाँ’ हा चित्रपट प्रदर्शित होणार होता. मात्र ‘बाला’ चित्रपटाला त्रास होऊ नये म्हणून त्यांनी आपला चित्रपट २२ नोव्हेंबरला पुढे ढकलला. तरीही चित्रपटांची टक्कर काही टळणार नाही आहे. १५ नोव्हेंबरला नवाझुद्दीन सिद्दिकीची मुख्य भूमिका असलेला ‘मोतीचूर चकनाचूर’ आणि सूरज पांचोलीचा ‘सॅटेलाईट शंकर’ असे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. त्याच्या नंतरच्या आठवडय़ात पुन्हा एकदा अनिल कपूर, जॉन अब्राहम, अर्शद वारसी अशी मोठी कलाकारांची फौज असलेला ‘पागलपंती’ आणि ‘मरजावाँ’ असे दोन चित्रपट प्रदर्शित होणार आहेत. एकूणच दिवाळीनंतरही चित्रपटांचा तिकीटबारीवरचा धडाका कायम असणार आहे. डिसेंबरमध्ये पुन्हा सलमान खान येणार असल्याने हा धूमधडाका थोडा कमी होईल, पण संपणारा नाही हे निश्चित!

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 20, 2019 1:38 am

Web Title: diwali upcoming movies housefull 4 saand ki aankh abn 97
Next Stories
1 हुश्श.. सलमान ईदचा मुहूर्त साधणार..
2 ‘काम मोजकेच, पण चांगले हवे’
3 हिरकणी..
Just Now!
X