26 February 2021

News Flash

राजकीय पक्षांच्या भूलथापांना बळी पडू नका – विक्रम गोखले

'देशात राजकीय पक्ष दंगली घडवून आणून दुफळी निर्माण करत आहेत.'

विक्रम गोखले

देशात राजकीय पक्ष दंगली घडवून आणून दुफळी निर्माण करत आहेत. त्यांच्या भूलथापांना बळी पडू नका. देशाची सत्ता कुणाच्या ताब्यात द्यायची याचा हक्क संविधानाने दिला. त्याकरिता प्रत्येकाने मतदान केले पाहिजे. तरच आपल्या मनातील राज्य येईल, असे प्रतिपादन अभिनेते विक्रम गोखले यांनी केले.

देशातील विविध प्रांतांतून नगरमध्ये स्थायिक झालेल्यांनी भारत भारती या संस्थेची स्थापना केली आहे. प्रजासत्ताक दिनानिमित्त संस्थेच्या वतीने भारतमाता पूजन, देशभक्तिपर व्याख्यान, फुड फेस्टिव्हल, सांस्कृतिक कार्यक्रम आदी उपक्रम आयोजित केले होते. त्याला थंडीतही मोठा प्रतिसाद मिळाला. निवृत्त मेजर जनरल एस. पी. सिन्हा व संस्कार भारतीचे कोकण विभागाचे अध्यक्ष अभिनेते विक्रम गोखले यांच्या हस्ते भारतमाता पूजन करून उपक्रमाचा शुभारंभ करण्यात आला. या वेळी भारत भारतीचे संस्थापक संयोजक विनय पत्राळे हे अध्यक्षस्थानी होते. प्रमुख पाहुणे म्हणून दामोधर बठेजा, उपाध्यक्ष राजू लक्ष्मण, राजेंद्र अग्रवाल, खासदार दिलीप गांधी, आमदार शिवाजी कर्डिले, महापौर बाबासाहेब वाकळे, उपमहापौर मालन ढोणे उपस्थित होते.

अभिनेते विक्रम गोखले म्हणाले, सैनिक आणि शेतकरी हे समाजाचे महत्त्वाचे घटक आहेत. त्यांना कधीही विसरता कामा नये. धर्म, जात घरात ठेवून सैनिक सीमेवर लढत असतात. स्वातंत्र्य मिळाल्यापासून ते देशाची सेवा करतात. भारत भारतीसारख्या संस्था तन, मन, धनाने देशसेवा करतात. देशाला स्वातंत्र्य सहजासहजी मिळालेले नाही. स्वातंत्र्यावर संकट येईल तेव्हा शस्त्रे उचलावी लागतात. याच उद्देशाने नेताजी सुभाषचंद्र बोस यांनी आझाद हिंद सेनेची स्थापना केली, असे त्यांनी स्पष्ट केले.

प्रास्ताविक भारत भारतीचे अध्यक्ष दामोधर बठेजा यांनी केले. सूत्रसंचालन वीणा दिघे व अविनाश कराळे यांनी केले. आभार कमलेश भंडारी यांनी मानले. या वेळी हरेष हरवाणी, दिनेश छाब्रिया, चेतन जग्गी, चंद्रशेखर आरोळे, अनिल ढोकरिया, हरीश रंगलानी, मोहन मानधना, बाबुशेठ टायरवाले, रामेश्वर बिहाणी, कमलेश भंडारी, मुन्ना अग्रवाल, राजू ढोरे, प्रदीप पंजाबी, के. के. शेट्टी, अशोक मवाळ, राजेंद्र जोशी आदी उपस्थित होते.

 

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 29, 2019 3:42 pm

Web Title: do not fall prey to political parties promises says vikram gokhale
Next Stories
1 Video : पॅरिस फिक्टिव्ह फिल्म फेस्टिव्हलमधून ‘विरांगणा’ लघुपटाला आमंत्रण
2 बायोपिकसाठी अरुणा इराणी यांची ‘या’ अभिनेत्रीला पसंती
3 Video : सलील कुलकर्णींच्या ‘वेडिंग चा शिनेमा’चा टीझर
Just Now!
X