गेल्या आठवड्याभरापासून बॉलिवूड अभिनेत्री सोनम कपूर आणि आंनद आहुजाच्या लग्नाची चर्चा सुरू होती. धुमधडाक्यात मुंबईत कपूर कुटुंबियांची ‘बिग फॅट इंडियन वेडिंग’ पार पडली. या लग्नाच्या चर्चा क्षमत नाही तोच बॉलिवूडच्या आणखी एका अभिनेत्रीनं लग्नगाठ बांधून सगळ्यांनाच आश्चर्याचा सुखद धक्का दिली. ही अभिनेत्री म्हणजे नेहा धुपिया. ती लग्न करतेय याची कल्पनाच कोणाला नव्हती त्यामुळे तिनं इन्स्टाग्राम अकाऊंटवर आपल्या लग्नाचे फोटो शेअर करून चाहत्यांना जवळजवळ धक्काच दिला.

नवी दिल्ली येथे पारंपरिक शीख विवाहपद्धतीनुसार अनंत कारजमध्ये नेहा आणि अंगदने सहजीवनाची वचनं दिली. लग्नसोहळ्यात नेहानं परिधान केलेल्या फिक्कट गुलाबी रंगाच्या लेहंग्यानं सगळ्याचं लक्ष वेधलं. कोणतीही कुणकुण लागू न देता नेहानं आपल्या लग्नाची तयारी केली होती. या लग्नासाठी तिनं फॅशन डिझायनर अनिता डोंगरेच्या खास वेडिंग कलेक्शनमधल्या लेहंग्याची निवड केली होती. या हंगामात होणाऱ्या लग्नाचा विचार करून लेहंग्यासाठी खास प्रकराची रंगसंगती निवडण्यात आली होती. चंदेरी कापडावर गोटा पट्टी, जरदोजी, रेशम आणि खड्यांच्या विणकामामुळे हा लेहंगा अधिकच आकर्षित दिसत होता. फुलांचं नाजूक नक्षीकाम यावर करण्यात आलं होतं. ‘अँड’ कलेक्शनमधल्या या सर्वात खास लेहंग्याची किंमत २ लाखांहून अधिक आहे. त्यामुळे सोनमच्या लेहंग्यानंतर नेहाच्या लेहंग्यानं देखील फॅशन विश्वात नवा ट्रेंड सेट केलाय.

नेहानं ज्येष्ठ क्रिकेटपटू बिशन सिंह बेदी यांचा मुलगा म्हणजेच अंगद बेदीची विवाहगाठ बांधली. दिल्लीच्या रणजी संघाकडून सुरुवातीला काही वर्षे क्रिकेट खेळणाऱ्या अंगदने त्यानंतर मॉडेलिंग आणि अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं.