News Flash

चित्र रंजन : नावापुरती ‘डोंबिवली’ असलेला रंजक थरारपट

‘डोंबिवली रिटर्न’ची ‘डोंबिवली फास्ट’शी साहजिकच तुलना होणार आहे.

रेश्मा राईकवार

डोंबिवली रिटर्न

‘डोंबिवली फास्ट’ प्रदर्शित झाला आणि डोंबिवली शहर, त्यातला कोणी एक माधव आपटे ही दोन्ही नावे घराघरात पोहोचली. डोंबिवली शहराबद्दल त्यापूर्वी कोणी ऐकलेच नव्हते असे नाही. मात्र या शहराच्या रूपाने तिथे राहणाऱ्या आणि दररोज नोकरीसाठी मुंबईत ये-जा करणाऱ्या नोकरदारांची घालमेल, त्याची मनोवस्था अचूकपणे हेरणारा निशिकांत कामत दिग्दर्शित ‘डोंबिवली फास्ट’ हा चित्रपट सर्वार्थाने वेगळा ठरला होता. त्यानंतर चौदा वर्षांनी ‘डोंबिवली रिटर्न’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला आहे. या चित्रपटात डोंबिवली आणि अभिनेता संदीप कुलकर्णी ही दोन नावे तीच असली तरी या चित्रपटाचा पहिल्याशी काहीएक संबंध नाही, ही खूणगाठ मनाशी बांधूनच ‘डोंबिवली रिटर्न’ पाहायला हवा.

‘डोंबिवली रिटर्न’ची ‘डोंबिवली फास्ट’शी साहजिकच तुलना होणार आहे. या दोन चित्रपटांतील महत्त्वाचा फरक म्हणजे ‘डोंबिवली रिटर्न’मध्ये डोंबिवली शहर हे फक्त नावापुरते येते आणि दिसते. प्रत्यक्षात एका कल्पनेच्या आधाराने थरारपटांच्या शैलीचा आधार घेत वास्तवाची जाणीव करून देण्याचा प्रयत्न दिग्दर्शक महेंद्र तेरेदेसाई यांनी या चित्रपटात केला आहे असे म्हणता येईल. एकाअर्थी पहिल्या चित्रपटात डोंबिवली शहर हेच कथेतील मुख्य पात्र होते. इथे फक्त रोजच्या रोज फलाट सोडणाऱ्या लोकलच्या निमित्ताने डोंबिवली स्थानकाचे दर्शन होते. अनंत वेलणकर (संदीप कुलकर्णी) नामक सभ्य, सज्जन, मध्यमवर्गीय आणि डोंबिवलीत राहणाऱ्या गृहस्थाची ही गोष्ट आहे. मंत्रालयात कामाला असलेल्या वेलणकरची लोकलपासूनची संसारापर्यंतची दैनंदिनी त्याच त्याच तथाकथित टिपिकल मध्यमवर्गीय वेगाने पळत असते. मात्र एके दिवशी कार्यालयात रोजचे काम करत असताना त्याला एक धक्कादायक घटना लक्षात येते. ही घटना पाहिल्यानंतर त्याचे नेमके काय करायचे हे त्याच्या लक्षात येत नाही. या घटनेचा फायदा घ्यायचा तर मध्यमवर्गीय आणि सज्जन वृत्ती तसे करण्यापासून रोखते आणि त्याबद्दल मौन बाळगायचे तरी हीच सज्जन वृत्ती सत्याचा मार्ग न धरल्याबद्दल मनाला टोचत राहते. याच कात्रीत सापडलेला वेलणकर नेमका कोणता मार्ग पत्करतो? एखाद्याच्या हातात अचानक सत्ता आली तर तो त्या सत्तेचा कसा आणि कोणासाठी उपयोग करू शके ल? ती सत्ता त्याला श्रीमंतीच्या मार्गावर नेईल की रसातळाला नेऊन सोडेल? या प्रश्नांची उत्तरे वेलणकरच्या कथेतून दिग्दर्शकाने रंजक पद्धतीने मांडली आहेत.

पूर्वार्धात एकापाठोपाठ एक घटना घडत जातात, अनेक चेहरे एकामागोमाग एक आपल्यासमोर येतात. कधी कधी तर तेच चेहरे वेगवेगळ्या पद्धतीने आपल्यासमोर का येतायेत, हाही प्रश्न पाहणाऱ्याला पडतो. मात्र त्याची तेव्हाच उत्तरे न देता केवळ घटनांमध्ये गुंतवत चित्रपटाची उत्कंठा वाढवत नेण्याचा दिग्दर्शकाचा प्रयोग यात चांगलाच रंगला आहे. पूर्वार्धात कथेबद्दल वाढवलेली उत्सुकता उत्तरार्धातही बऱ्यापैकी पकडून ठेवता आली असली तरी त्यात उगाचच येणारी गाणी आणि काही अनावश्यक प्रसंगांनी खो घातला आहे. उत्तरार्धात कथा पूर्णपणे वेगळे वळण घेते, मात्र या वळणामुळे कथेत रंजकता आली असली तरी त्यानंतरच्या टिपिकल मांडणीने चित्रपटाचा उद्देशच हरवल्यासारखा वाटतो. त्यातही सत्ता मिळाली की माणूस अमुक एका पद्धतीनेच वागतो, तो पैसा आणि स्त्रीच्या मागे नीतीमत्ता विसरतो, अशा काही ठरावीक ठोकताळ्यांवर ही कथा उभी केल्यासारखी वाटते. काहीएक गृहीतके मांडून ही कथा रचली असल्याने त्यात वास्तव म्हणावे तसे जाणवत नाही. त्या तुलनेत माधव आपटे आणि त्याची ससेहोलपट ही अत्यंत प्रामाणिक आणि वास्तवावर नेमके बोट ठेवणारी होती. त्यामुळे ‘डोंबिवली रिटर्न’ चित्रपटाची कथाकल्पना कितीही रंजक असली तरी ती पूर्णपणे वास्तवाला धरून वाटत नाही.

अभिनेता संदीप कुलकर्णीने त्याच तडफेने वेलणकरची भूमिका केली आहे. बऱ्याच दिवसांनी संदीप कुलकर्णीला मुख्य भूमिकेत पाहणे हा सुखद योग आहे. अभिनेत्री राजेश्वरी सचदेव हिने त्याच्या पत्नीची भूमिका केली आहे. तिनेही आपल्या भूमिकेला न्याय दिला आहे, मात्र तिची व्यक्तिरेखा त्या तुलनेत चित्रपटात फार महत्त्वाची ठरत नाही. हिंदी वेबसीरिजच्या माध्यमातून लोकप्रिय झालेला अभिनेता अमोल पराशर याने वेलणकरच्या भावाची भूमिका केली आहे. त्यालाही या चित्रपटात एका फ्रेश भूमिकेत पाहणे आनंददायी आहे. मात्र इतर सगळ्याच व्यक्तिरेखांपेक्षा यात वेलणकरच मध्यवर्ती असल्याने संदीप कुलकर्णीच भाव खाऊन जातो. चौदा वर्षांनी डोंबिवली शहराला पडद्यावर घेऊन परतलेला हा चित्रपट नावापुरताच डोंबिवलीचा हात धरतो. त्यामुळे या शहराची बदललेली मानसिकता वगैरे या कल्पनेतील गोष्टी उरतात. डोंबिवली शहराचा, आधीच्या चित्रपटाचा असे सगळे संदर्भ सोडून एका वेगळ्या रंजक कथाकल्पनेवर आधारित चित्रपट म्हणून ‘डोंबिवली रिटर्न’ पाहायला हवा.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on February 23, 2019 2:39 am

Web Title: dombivli return movie review
Next Stories
1 सामूहिक विवाह सोहळ्यात अभिनेता अक्षय कुमारकडून ७९ जोडप्यांना ७९ लाखांची भेट
2 मायकल जॅक्सन माहितीपट : HBO वाहिनीवर १०० मिलियन डॉलरचा दावा
3 स्मिता तांबेचं ‘या’ चित्रपटाद्वारे निर्मिती क्षेत्रात पदार्पण
Just Now!
X