टेलिव्हिजन अभिनेत्री संजीदा शेखच्या वहिनीने संजीदा आणि तिच्या कुटुंबियांविरोधात घरगुती हिंसाचाराचा गुन्हा दाखल केलाय. झकेराबानू जाकिर हुसैन बागबान असं तिच्या वहिनीचं नाव असून तिने नणंद संजीदा शेख, पती अनस अब्दुल रहीम शेख आणि सासू अनिशा शेख यांच्यावर मारहाण आणि हिंसाचाराचा आरोप केलाय.

अहमदाबादमधील सारखेज पोलीस स्टेशनमध्ये २९ मे रोजी हा गुन्हा दाखल करण्यात आला होता. वडिलांशी फोनवर बोलत असताना संजीदा, तिचा भाऊ आणि आईने तिला मारहाण केल्याचं झकेराबानूने म्हटलंय. २७ मे रोजी मारहाणीनंतर झकेराबानू अहमदाबादला माहेरी आली होती. अहमदाबादला आल्यानंतर तिला खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आलं होतं.

याप्रकरणी संजीदाच्या वकिलांनीही अहमदाबाद उच्च न्यायालयात याचिका दाखल केल्याची माहिती आहे. झकेराबानूचे तिच्या वडिलांसोबत काही वाद होते. या वादाचा परिणाम तिच्या वैवाहिक जीवनावर होत असल्याचा उल्लेख याचिकेत आहे. त्याचप्रमाणे मारहाणीच्या घटनेच्या दिवशी झकेराबानूने तब्येत बरी नसल्याने अहमदाबादला माहेरी जाणार असल्याचं पती अनसला सांगितलं होतं, असंही त्यात म्हटलंय.

वाचा : दारु पिणाऱ्या ‘त्या’ तरुणांवर भडकला सलमान

घटनेच्या दिवशी संजीदा घरी नसून तिच्या शूटिंगमध्ये व्यस्त होती असे तिच्या वकिलांचं म्हणणं आहे. ‘संजीदा आणि तिच्या कुटुंबियांना त्रास देण्यासाठी हा गुन्हा दाखल करण्यात आला असून झकेराबानूच्या आरोपांमध्ये काही तथ्य नाही. कोर्टाने आमची याचिका स्वीकारली आहे. याप्रकरणी योग्य ती चौकशी होईल,’ असेही संजीदाच्या वकिलांनी सांगितले.

वाचा : कतरिना कैफ क्रिकेट खेळते तेव्हा…

संजीदा सध्या ‘स्टार प्लस’ वाहिनीवरील ‘लव्ह का है इंतजार’ या मालिकेत भूमिका साकारत आहे. अभिनेता आमिर अलीशी तिचं लग्न झालंय.