हॉलिवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीपने ७४ व्या ग्लोब अवार्ड सोहळ्यामध्ये अमेरिकेचे नवनिर्वाचित राष्ट्राध्यक्ष यांच्यावर टीका केली होती. मेरील स्ट्रिप यांना हॉलिवूड चित्रपटसृष्टीतील कामगिरीच्या जोरावर गोल्डन ग्लोबचा लाईफटाईम अचिव्हमेंट पुरस्काराने सन्मानित करण्यात आले होते. हा पुरस्कार स्वीकारताना स्ट्रीपने ट्रम्प यांच्यावर टीका केली होती. अमेरिकी नेतृत्व हे दहशत निर्माण करणारे असल्याची भावना मेरीलने नाव न घेता व्यक्त केली होती.त्यानंतर स्ट्रीप हिच्या अभिनयावर शंका व्यक्त करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी मेरिल स्ट्रीपला प्रत्त्युत्तर दिले. मेरिनच्या अभिनयाचा बाज नसताना तिचे उगाचच कौतुक करण्यात येत असल्याचे मत ट्रम्प यांनी ट्विटरच्या माध्यमातून व्यक्त केले. मी तिला ओळखत नसून ती माझ्यावर विनाकारण टीका करत असल्याचा उल्लेख देखील त्यांनी ट्विटमध्ये केला होता. ग्लोब सोहळ्यातील मानाचा पुरस्कार पटकविणाऱ्या अभिनेत्रीवर राष्ट्राध्यक्षांनी नाराजी व्यक्त केल्यानंतर बॉलिवूड अभिनेत्री आलिया भट्टने या अभिनेत्रीच्या पाठिशी असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न केल्याचे दिसते.

हॉलिवूड अभिनेत्री मेरील स्ट्रीपच्या अभिनयावर खुद्द राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांनी शंका व्यक्त केली असताना आलिया भट्टने या अभिनेत्रीचे समर्थन केले आहे. आलिया भट्टने समर्थनासाठी इन्स्टाग्रावरुन मेरीलचा फोटो शेअर केला आहे.
७४ वा गोल्डन ग्लोब अवार्ड सोहळा कॅलिफोर्नियात बेवर्ली हिल्समध्ये पार पडला. अपेक्षेप्रमाणे ‘ला ला लँड’ चित्रपटाने यंदाच्या गोल्डन ग्लोबवर ७ अॅवार्ड मिळवत वर्चस्व गाजवले. ७ गोल्डन ग्लोब्ज मिळवत या चित्रपटाने एक विक्रम बनवला आहे. याआधी एकाच चित्रपटाला एवढे गोल्डन ग्लोब्स मिळाले नव्हते.

जागतिक चित्रपटसृष्टीतील नावाजलेल्या पुरस्कारांमध्ये ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्काराचे नाव प्रामुख्याने घेण्यात येते. अशा या मानाच्या पुरस्कार सोहळ्यामध्ये अभिनेत्री प्रियांका चोप्रानेही हजेरी लावली होती. प्रियांकाने या पुरस्कार सोहळ्यात हजेरी लावत अनेकांचीच मनं जिंकली. सोनेरी रंगाच्या लांबसडक गाऊनमध्ये प्रियांका या पुरस्कार सोहळ्यामध्ये आली होती. रेड कार्पेटवर प्रियांकाचा हा सुवर्णावताराने अनेकजणांना घायाळ केले. अनेक सेलिब्रिटींनी हजेरी लावलेल्या या पुरस्कार सोहळ्यात प्रियांका चोप्रासोबत या पुरस्कार सोहळ्यात ड्रयू बैरीमोर, मेट डेमन, वियोला डेविस, लॉरा डेर्न, गोल्डी हॉन, निकोल किडमॅन, सिएना मिलर, क्रिस पाइन यांसारखे नावाजलेले कलाकारही सहभागी झाले होते. बी टाऊनच्या मस्तानीने म्हणजेच अभिनेत्री दीपिका पदुकोनही या पुरस्कार सोहळ्यामध्ये आली होती. दीपिका एका पिवळ्या रंगाच्या गाऊनमध्ये आली होती.