रोहिणी हट्टंगडी यांचा नवोदितांना सल्ला, विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान

‘ग्लॅमर’ म्हणून काहीही करायची तयारी न ठेवता कष्ट आणि अभिनय या जोरावरच निष्ठेने काम केले तर पसा तुमच्या मागे धावत येईल. सामाजिक स्थितीमध्ये बदल झाला आहे. स्त्रियांनाही स्वतंत्रपणे काम करता येते. या संधीचा जरूर लाभ घ्या, मात्र केवळ ‘ग्लॅमर’साठी म्हणून काहीही करण्यास स्पष्ट शब्दात नकार देता आला पाहिजे, असे मत ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांनी व्यक्त केले.

अखिल महाराष्ट्र नाटय़ विद्यामंदिर समितीच्यावतीने श्रीमती हट्टंगडी यांना यंदाचे विष्णुदास भावे गौरव पदक प्रदान करण्यात आले. अखिल भारतीय नाटय़संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. या वेळी समितीचे अध्यक्ष डॉ. शरद कराळे यांनी प्रास्ताविक केले, तर मुक्ता पुरंदरे यांनी हट्टंगडी यांच्या अभिनय क्षेत्रातील कारकिर्दीचा धावता आढावा घेतला.

‘भावे पदक मिळाल्याने मी भारावून गेले असल्याचे सांगत श्रीमती हट्टंगडी यांनी अनेक नामवंतांच्या रांगेत बसण्याचा मान मिळाला हे गौरवास्पद आहे. या कौतुकाने मी थांबणार नाही, रंगभूमीवरील वाटचाल सुरूच राहील,’ असे सांगितले.

नवी पिढी झटपट प्रसिध्दीच्या मागे लागते. अन्य क्षेत्राप्रमाणेच याही ‘ग्लॅमर’च्या जगात धोके आहेत, हे धोके ओळखता येणे आवश्यक आहेच पण यशासाठी वाट्टेल ते, ही भूमिका टाळून कष्ट आणि अभ्यास या जोरावर आहे त्या ठिकाणी काम करीत राहिलात तर यश तुमच्यापर्यंत आपोआप येते. अभिनय शिकण्यासाठी शहर जवळ करायला हवे असे नाही, तर आहे त्या ठिकाणी तुम्ही कलागुणांना वाव देऊ शकता. तुमचे काम चांगले असेल तर संधी तुम्हाला शोधत येते.

या वेळी श्रीमती हट्टंगडी यांनी ‘गांधी’ चित्रपटातील ‘कस्तुरबा’ या भूमिकेच्या आठवणीही कथन केल्या. ‘गांधी’ मधील ‘कस्तुरबा’ या भूमिकेत वेगळे काय असणार अशी शंका प्रथम होती, मात्र अभ्यास केल्यानंतर या भूमिकेतील वेगवेगळे कंगोरे लक्षात आले.

या वेळी बोलताना  गज्वी म्हणाले,की सध्या अभिनय क्षेत्रात अनेक गोष्टी शिकवल्या जात आहेत. परंतु कलाकृतीमध्ये तात्विकता हवी ती शिकवली जात नाही, शिकवता येत नाही. यामुळे अनेक नाटके चालत नाहीत. नाटकांची तात्त्विक बठकच पक्की झाली नसल्याने प्रेक्षकांवर प्रभाव टाकू शकत नाहीत.

नाटय़ परिषदेच्या सांगली शाखेचे अध्यक्ष श्रीनिवास जरंडीकर यांनी स्वागत केले, तर प्राचार्य डॉ. भास्कर ताम्हणकर यांनी आभार मानले. यावेळी विनायक केळकर, मेधा केळकर, अ‍ॅड. वि.ज. ताम्हणकर, आनंदराव पाटील, बलदेव गवळी, बीना साखरपेख, मुकुंद पटवर्धन आदी उपस्थित होते.

नाटय़क्षेत्रात मानाचे समजले जाणारे ‘विष्णुदास गौरव पदक’ ज्येष्ठ अभिनेत्री रोहिणी हट्टंगडी यांना सांगलीत अखिल भारतीय मराठी नाटय़ संमेलनाचे अध्यक्ष प्रेमानंद गज्वी यांच्या हस्ते प्रदान करण्यात आले.