अभिनेता अनुपम खेर यांची प्रमुख भूमिका असलेला ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट गेल्या आठवड्यात प्रदर्शित झाला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली. या चित्रपटाने ४ दिवसांमध्ये केवळ १३.९० कोटी रुपयांचा टप्पा गाठला. प्रदर्शनापूर्वी आणि नंतर या चित्रपटाला काँग्रेसच्या युवा कार्यकर्त्यांनी विरोध केला होता. त्यामुळे या चित्रपटाची सरासरी कमाई झाल्याचं सांगण्यात येत आहे. मात्र या कारणाव्यतिरिक्त अन्यही काही कारणं आहेत, ज्यामुळे हा चित्रपट प्रेक्षकांच्या पसंतीत उतरला नाही.

१. कथारंजकपणाची कमतरता –
भारतीय प्रेक्षक वर्गाची पसंती साहसदृश्य, रंजक गाणी, विनोद यांना पसंती असते. त्यामुळे बॉलिवूडमधील अशाच चित्रपटांना प्रेक्षकांची
‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ हा चित्रपट पॉलिटीकल ड्रामा या प्रकारात मोडणार आहे. या चित्रपटात साहसदृश्य, रंजक गाणी, विनोद यांची कमतरता आहे. भारतीय प्रेक्षक वर्गाचा कल हा मसालापटांकडे जास्त असतो. त्यांना चित्रपटात उडत्या चालीची गाणी, साहसदृश्य असं सारं काही पाहायला आवडतं. मात्र या चित्रपटामध्ये केवळ पॉलिटीकल व्ह्युज मांडण्यात आले आहेत. त्यामुळे बऱ्याच प्रेक्षकांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली. परिणामी हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर म्हणावा तसा चालला नाही.

२. दिग्गज कलाकार मंडळींची कमतरता-
या चित्रपटामध्ये अभिनेता अनुपम खेर आणि अक्षय खन्ना हे दोन कलाकार सोडले तर अन्य कोणतीही लोकप्रिय सेलिब्रिटी झळकलेली नाही. त्यामुळे अनोळखी किंवा लोकप्रिय नसलेल्या कलाकारांना बघण्यात प्रेक्षकांना विशेष रस वाटला नसावा. जर या चित्रपटात तगडी स्टारकास्ट असती तर त्यांच्या चाहत्यांनी हा चित्रपट आवर्जून पाहिला असता.

३. पॉलिटीकल कंटेंट –
माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांचे माध्यम सल्लागार संजय बारु यांच्या पुस्तकावर आधारित हा चित्रपट आहे. त्यामुळे या चित्रपटात राजकीय मुद्द्यांचा सर्वाधिक भरणा करण्यात आला आहे. त्यातच या चित्रपटाचं कथानक मनमोहन सिंग यांचं राजकारणातील कार्य आणि गांधी परिवाराभोवती फिरताना दिसतं. त्यामुळे या विषयामध्ये रस नसलेल्यांनी या चित्रपटाकडे पाठ फिरवली.

४. काँग्रेस युवा कार्यकर्त्यांचा विरोध –
या चित्रपटामध्ये मनमोहन सिंग यांचं कार्य उत्तमरित्या रेखाटण्यात आलं आहे. तर सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना अप्रत्यक्षरित्या खलनायकाच्या भूमिकेत दाखविण्यात आलं आहे. त्यामुळे अनेक काँग्रेस युवाच्या अनेक कार्यकर्त्यांनी या चित्रपटाचा विरोध केला आहे. काही कार्यकर्त्यांनी तर चित्रपटगृहांबाहेर जोरदार विरोध करुन चित्रपटाचा पडदाही फाडल्याच्या घटना घडल्या.

५. चित्रपट नव्हे माहितीपट –
अनेकांनी ‘द अॅक्सिडेंटल प्राइम मिनिस्टर’ ला चित्रपट न म्हणता हा माहितीपट असल्याचं म्हटलं आहे. तसंच यामध्ये काही रिअर फुटेजचा वापर करण्यात आल्यामुळे चित्रपट सुरु असताना मध्येच या फुटेजचा व्यत्यय येत असल्याचं प्रेक्षकांच मत आहे. या अशा साऱ्या कारणांमुळे प्रेक्षकांनी या चित्रपटाला नापसंत करत त्याकडे पाठ फिरवल्याचं दिसून आलं.