अवघ्या चार नाटकांना घेऊन का होईना पार पडलेल्या २८ व्या महाराष्ट्र राज्य मराठी व्यावसायिक नाट्य स्पध्रेत ‘डोन्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकावर विजयाचे शिक्कामोर्तब झाले आहे. नाटय़स्पर्धेच्या अंतिम फेरीत ‘सोनल प्रॉडक्शन’ निर्मित या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला असून त्याला ५ लाख रुपयांचा पुरस्कार जाहीर झाला असल्याची घोषणा सांस्कृतिक कार्यसंचालनालयाने केली आहे. ‘जिगिषा’ आणि ‘अष्टविनायक’ची निर्मिती असलेले ‘वाडा चिरेबंदी’ द्वितीय क्रमांकाचे तर ‘अष्टविनायक’चीच निर्मिती असलेले ‘श्री बाई समर्थ’ हे नाटक तिसऱ्या क्रमांकाचे मानकरी ठरले आहे.
राज्य मराठी व्यावसायिक नाटय़स्पर्धेची नियमावली ऐनवेळी बदलून त्यात गेल्यावर्षीच्या स्पर्धेतील नाटकांनाही प्रवेश देण्यात आल्याने स्पर्धेत सहभागी झालेले नाटय़निर्माते आणि सांस्कृतिक कार्यसंचालनाय यांच्यात वादाला तोंड फु टले होते. स्पर्धेत असलेल्या दहा नाटकांपैकी सहा नाटकांनी काढता पाय घेतला होता. त्यामुळे उर्वरित चार नाटकांवरच यंदाची स्पर्धा घेण्यात आली. २ ते ११ मे या कालावधीत प्रबोधनकार ठाकरे नाटय़गृहात ही स्पर्धा पार पडली. यंदाच्या स्पर्धेत ‘डोन्ट वरी बी हॅप्पी’ या नाटकाने प्रथम क्रमांकासह सर्वाधिक पुरस्कार पटकावले असून त्यापाठोपाठ ‘वाडा चिरेबंदी’नेही अनेक पुरस्कारांवर नाव कोरले आहे. सवरेत्कृष्ट दिग्दर्शनासाठी प्रथम क्रमांकाचे पारितोषिक दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी (वाडा चिरेबंदी), द्वितीय क्रमांकाचे पारितोषिक अद्वैत दादरकर (डोण्ट वरी बी हॅपी) तर तिसऱ्या क्रमाकांचे पारितोषिक राजेश देशपांडे (श्री बाई समर्थ) यांना जाहीर झाले आहे.
उत्कृष्ट अभिनेते म्हणून किरण माने (परफेक्ट मिसमॅच), उमेश कामत (डोण्ट वरी बी हॅपी), वैभव मांगले (वाडा चिरेबंदी), अरुण नलावडे (श्री बाई समर्थ), समीर चौघुले (श्री बाई समर्थ)यांना रौप्य पुरस्काराने गौरवण्यात येणार असून उत्कृष्ट अभिनेत्रीसाठी अमृता सुभाष (परफेक्ट मिसमॅच), स्पृहा जोशी (डोण्ट वरी बी हॅपी), निवेदिता सराफ (वाडा चिरेबंदी), नेहा जोशी (वाडा चिरेबंदी), निर्मिती सावंत (श्री बाई समर्थ)यांनाही रौप्य पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार आहे.

प्रदीप मुळ्ये यांना तिन्ही पुरस्कार
या पुरस्कारांचे यावेळचे वैशिष्टय़ म्हणजे नेपथ्यासाठी प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांकाचे पुरस्कार प्रदीप मुळ्ये यांनाच अनुक्रमे ‘वाडा चिरेबंदी’, ‘डोण्ट वरी बी हॅपी’ आणि ‘परफेक्ट मिसमॅच’ या नाटकासाठी जाहीर झाले आहेत.

अन्य पुरस्कार
प्रकाश योजना – प्रथम पारितोषिक – रवि रसिक (नाटक-वाडा चिरेबंदी), द्वितीय पारितोषिक – शीतल तळपदे (नाटक-परफेक्ट मिसमॅच), तृतीय पारितोषिक -अमोघ फडके (नाटक-डोण्ट वरी बी हॅपी)
संगीत दिग्दर्शन – प्रथम पारितोषिक – आनंद मोडक (वाडा चिरेबंदी), द्वितीय पारितोषिक – साई-पियुष (डोण्ट वरी बी हॅपी), तृतीय पारितोषिक- राहुल रानडे (परफेक्ट मिसमॅच)
वेशभूषा – प्रथम पारितोषिक – प्रतिमा जोशी (वाडा चिरेबंदी), द्वितीय पारितोषिक – चत्राली डोंगरे (डोण्ट वरी बी हॅपी), तृतीय पारितोषिक – असिता नार्वेकर (श्री बाई समर्थ)
रंगभूषा – प्रथम पारितोषिक – कृष्णा खेडकर (श्री बाई समर्थ), द्वितीय पारितोषिक – किशोर पिंगळे (वाडा चिरेबंदी), तृतीय पारितोषिक – महेंद्र झगडे (डोण्ट वरी बी हॅपी)
नाटय़लेखन- प्रथम पारितोषिक – मिहीर राजदा (डोण्ट वरी बी हॅपी) , द्वितीय पारितोषिक – हिमांशू स्मार्त (परफेक्ट मिसमॅच) तर तृतीय पारितोषिक – राजेश देशपांडे यांना (श्री बाई समर्थ)