‘भारतीय लोक सेवा प्रसारण’ अर्थात ज्या वाहिनीला आपण गेले कित्येक वर्ष ‘दूरदर्शन’ म्हणून ओळखतो. त्या वाहिनीला ६० वर्षे पुर्ण झाली आहेत. “गेली ६० वर्ष आम्ही देशाची सेवा केली, याचा आम्हाला सार्थ अभिमान आहे” असे ट्विट करुन दूरदर्शन आता ६० वर्षांचे झाले, ही माहिती त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवरुन देण्यात आली.

भारतात १५ सप्टेंबर १९५९ मध्ये दूरदर्शनची मुहूर्तमेढ रोवली गेली. एक लहानसा ट्रान्समीटर व रेकॉर्डींग स्टुडीओ यांच्या साह्याने दूरदर्शनचे काम सुरु झाले होते. मराठी माणसासाठी अभिमानास्पद बाब म्हणजे महाराष्ट्राचे लाडके व्यक्तिमत्त्व अर्थात पु. ल. देशपांडे हे दूरदर्शनचे पहिले संचालक होते. त्यांनीच ‘दूरदर्शन’ हे नाव सुचवले होते. त्यानंतर काही वर्षांनी म्हणजे १९७२ मध्ये मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले.

दर्जेदार कार्यक्रमांनी मनोरंजन क्षेत्रात स्वत:ची मक्तेदारी निर्माण केलेल्या दूरदर्शन वाहिनीचा ६० वर्षांचा प्रवास…

  • दूरदर्शनची सुरुवात झाली तेव्हा दूरदर्शनचे प्रसारण आठवडय़ातून फक्त तीन दिवस आणि तेही फक्त अर्धा तास इतका वेळ असायचे.
  • १९७२ मध्ये मुंबई दूरदर्शन केंद्र सुरू झाले.
  • १९६५ मध्ये दूरदर्शनचे दैनंदिन प्रसारण सुरू झाले. पाच मिनिटांचे बातमीपत्र याच वर्षी सुरू करण्यात आले.
  • १९७५ पर्यंत दूरदर्शन भारतातील अवघ्या सात शहरांपुरतेच मर्यादित होते.
  • १९८२ मध्ये दूरदर्शनचे रंगीत प्रसारण सुरू झाले.
  • आज दूरदर्शनच्या दोन राष्ट्रीय वाहिन्या, ११ प्रादेशिक वाहिन्यांसह एकूण २१ वाहिन्या आहेत.
  • ४६ स्टुडिओ आणि १४ हजार ट्रान्समीटर दूरदर्शनकडे आहेत.
  • ‘हमलोग’,‘बुनियाद’, ‘रामायण’, ‘महाभारत’ यासारख्या मालिकांनी दूरदर्शनच्या लोकप्रियतेवर कळस चढला.
  • दूरदर्शनवरील जाहिरातीही एके काळी लोकप्रिय व तोंडपाठ होत्या. वॉशिंग पावडर निरमा, रसना, बुलंद भारत की बुलंद तसबीर हमारा बजाज, लिरील ही याची काही प्रातिनिधिक उदाहरणे.
  • ३ नोव्हेंबर २००३ मध्ये दूरदर्शनची २४ तास चालणारी वृत्तवाहिनी सुरू झाली.