काही लोक मुद्दाम स्वप्नं बघतात. ती पूर्ण करण्यासाठी प्रयत्न करतात. एक स्वप्न पूर्ण झालं की मग दुसरं स्वप्न बघतात. ही जागेपणी स्वप्न पाहणाऱ्या खऱ्याखुऱ्या माणसांची गोष्ट आहे. फॅ मिली बाँडिंग यात आहे. एकाने पाहिलं की दुसऱ्यानेही ते उचलून धरायचं, तिसऱ्यानेही करायचं. असं प्रत्येकाने एखाद्याच्या स्वप्नाला हातभार लावला तर किती चटकन ते स्वप्न पूर्ण होतं. हेच सूत्र समाजाच्या बाबतीतही लागू आहे. समाजासाठी पाहिलेलं स्वप्न अशाच पद्धतीने अनेकजण एकत्र आले तर सहज पूर्ण होऊ शकेल. खऱ्याखुऱ्या माणसांनी, जागेपणी पाहिलेल्या स्वप्नांची आणि पूर्णतेकडे नेण्याचा ध्यास असणाऱ्या माणसांची ही गोष्ट आहे असं मी मानते. समजून घेण्याची, जुळवून घेण्याची मानसिकता ही चाळ संस्कृतीतील जगण्यातच असते. चाळ ही एका कुटुंबाप्रमाणे सांभाळून घेते. तिथे कुचाळक्याही होतात, पण मदतही तितकीच करतात. मंजिरी ही साध्या गावातून आलेली मुलगी आहे. त्यामुळे कुठल्याही नव्या नवरीप्रमाणे नव्या घरातल्या माणसांनी समजून घेणं ही तिची गरज मी ओळखू शकते. कारण, कधीतरी सून म्हणून माझीही तीच गरज होती. दोन खोल्यांतील संसारात तिची होणारी घुसमट मी पाहते आणि तिला यातून बाहेर पडावंसं वाटत असेल तर त्यासाठी तिला एक सासू, एक आई म्हणून माझ्यापरीने मदत करणं मला महत्त्वाचं वाटतं, जे या चित्रपटात मी मसाले विकून करते. एकमेकांना सांभाळून घेणाऱ्या कुटुंबांचं चित्रण ज्या चित्रपटांमध्ये झालं ते त्या वेळच्या समाजाचं प्रतिबिंब होतं असं मानलं तर आज तेच चित्रण समाजासमोर आणणं ही काळाची गरज आहे असं मला वाटतं. कारण, एकमेकांना सांभाळून घेण्याची, एकमेकांप्रति असणाऱ्या या बांधीलकीची जाणीव मुळात पती-पत्नीच्या नात्यातही उरलेली दिसत नाही. त्यामुळेच आज विवाहापेक्षा घटस्फोटाच्या केसेस कोर्टात जास्त आहेत. पती-पत्नीने एकमेकांना साथ देणं, एकमेकांना समजून घेताना फुलत जाणारं त्यांचं प्रेम आणि त्यातून त्यांनी स्वीकारलेलं नातं चांगल्या तऱ्हेने निभावणं हे अगदी सोळा वर्षे प्रेम करून लग्न करणाऱ्यांनाही लक्षात येत नाही. इथे अमित-मंजिरीच्या जगण्यातून ही साधीसरळ मांडणी दिग्दर्शकाने के ली आहे जी मला खूप भावली.