महाराष्ट्राला पुरोगामी विचारांची मोठी परंपरा लाभलेली आहे. इथल्या प्रबोधनाच्या परंपरेचे दाखले देण्यासाठी फुले-शाहू-आंबेडकर यांच्या दुरदृष्ट्या आणि आधुनिक विचारांचा आधार घेतला जातो. अगदी याप्रमाणेच छत्रपती शिवाजी महाराज यांनीही सर्वांना समानतेची वागणूक मिळेल अशा स्वराज्याची स्थापना केली होती. आज या महामानवांच्या विचारांचा वारसा पुढे नेण्याचं काम अनेक मंडळी वेगवेगळ्या माध्यमातून करत आहेत. कुणी सामाजिक कार्याच्या माध्यमातून तर कुणी कलेच्या माध्यमातून. भारतात दरवर्षी १४ एप्रिलला भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. याशिवाय महाराष्ट्रात अनेक ठिकाणी छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा फुले आणि डॉ. आंबेडकर यांची संयुक्तिक जयंतीही साजरी करण्यात येते. याच दिनाचे औचित्य साधून कलर्स मराठीवरून ‘जलसा महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम १४ एप्रिलला प्रसारित होणार आहे.

स्वातंत्र्यपूर्व काळात महापुरुषांचे विचार, त्यांचं कार्य सर्वसामान्य जनतेपर्यंत पोहचावे यासाठी शाहिरी पोडावे, गाणी या कलामाध्यमांचा वापर केला जायचा. या वैचारिक जागराला ‘जलसा’ असं म्हटलं जायचं. असाच वैचारिक जागर या जलसा महाराष्ट्राचा या कार्यक्रमातून बघायला मिळणार आहे. या जलशामध्ये आनंद शिंदे, लोकशाहीर संभाजी भगत, विदर्भातील नामवंत गायक अनिरुद्ध वनकर, प्रसिद्ध गायिका वैशाली भैसने माडे, गायक प्रसेनजीत कोसंबी, कडूबाई खरात, कव्वालीचा सामना रंगवणाऱ्या सुषमा देवी, आपल्या गीतांच्या माध्यमातून महापुरुषांच्या वैचारिक क्रांतीची गोष्ट सांगणारे सचिन माळी, शीतल साठे, भीमस्पंदन बँड, धम्मरक्षक बँड, शिंदेशाहीचा आजच्या पिढीचा वारसा जपणारे डॉ. उत्कर्ष शिंदे आदी कलाकारांच्या गायनाची मेजवानी प्रेक्षकांना मिळणार आहे.

prakash ambedkar caa nrc against hindus
“हिंदुंना भाजपच फसवतेय”, ॲड. प्रकाश आंबेडकर यांची टीका; म्हणाले, “सीएए आणि एनआरसी कायदा मुस्लिमांच्या नव्हे…”
solapur dr babasaheb ambedkar jayanti 2024
डॉ. आंबेडकर जयंतीचा सोलापुरात अखंड उत्साह
Narendra Modi death threat
“जगभरात मोदींच्या हत्येचा कट”, भाजपाच्या नेत्याचं खळबळजनक विधान; म्हणाले, “मोदी पुन्हा पंतप्रधान झाले तर…”
Prakash Ambedkar on RSS PM Narendra Modi Mohan Bhagwat
‘RSS ने आम्हाला साथ द्यावी’, प्रकाश आंबेडकरांचे आवाहन; म्हणाले, “मोदी संघाच्या मानगुटीवर…”

याशिवाय प्रायोगिक नाट्य चळवळीत अग्रगण्य असणाऱ्या आविष्कारच्या ‘संगीत बया दार उघड’ चे काही प्रवेशही सादर होणार आहेत. डॉ. सुषमा देशपांडे यांचं ‘व्हय मी सावित्री’ आता एका नव्या रुपात प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे. शुभांगी भुजबळ आणि शिल्पा साने या दोघींनी सादर केलेली या नव्या रूपाची झलकसुद्धा प्रेक्षकांना बघायला मिळणार आहे. या कार्यक्रमाचं निवेदन केलं आहे संवेदनशील कवी आणि सामाजिक भान जपणाऱ्या अभिनेता जितेंद्र जोशी याने. निवेदनासोबतच जितेंद्रने संभाजी भगत, आनंद शिंदे आणि उत्कर्ष शिंदे, डॉ. सुषमा देशपांडे, शीतल साठे आणि सचिन माळी यांच्याशी साधलेला संवाद प्रेक्षकांसाठी एक वेगळी वैचारिक मेजवानी ठरेलच पण सर्वांना अंतर्मुखही करायला लावेल.

आजच्या या काळात महापुरुषांना जातीपातीच्या चक्रात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असला तरी त्यांचे विचार कसे सर्वांगीण होते आणि एकूणच समाज व्यवस्थेच्या उत्थानासाठी होते किंबहुना आजही ते कसे लागू आहेत हे सांगण्याचा प्रयत्न म्हणजे ‘जलसा महाराष्ट्राचा’ हा कार्यक्रम. येत्या रविवारी १४ एप्रिलला दुपारी १२ वाजता आणि सायंकाळी ७ वाजता कलर्स मराठीवरून प्रसारित होणारा हा प्रबोधनाचा आगळा वेगळा जलसा बघायला विसरू नका.