‘स्टार प्रवाह’वरील ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेला प्रेक्षकांचा भरभरुन प्रतिसाद मिळतोय. बाबासाहेबांचा बालपणापासूनचा प्रवास या मालिकेत प्रेक्षकांना अनुभवता येतोय. छोट्या भीवाने प्रेक्षकांची मन जिंकली आहेत. या मालिकेचा पुढील प्रवासही तितकाच उत्कंठावर्धक असणार आहे. जाणत्या वयात जातीयतेचा पहिला विखारी अनुभव भीवाला येणार आहे. वडिलांच्या भेटीसाठी सातारा ते गोरेगाव प्रवास करत असताना अस्पृश्यतेची झळ भीवाला तीव्रपणे जाणवते. महार असल्याचं सांगितल्यामुळे भीवाला प्रवासासाठी टांगा मिळणंही अशक्य होतं. गयावया करुन आणि दामदुप्पट भाव देतो असं सांगितल्यानंतर अखेर त्याला टांगा मिळतो पण त्यातही अट असते ती म्हणजे स्वत: टांगा चालवण्याची. तहानेने व्याकुळ असलेल्या भीवा आणि त्याच्या भाच्यांना पाण्याचा घोटही कुणी देत नाही. समाजाकडून मिळणारी तुच्छतेची वागणूक आणि मुलभूत गरजांसाठी करावा लागणारा संघर्ष भीवाच्या मनावर खोलवर परिणाम करुन जातो. आयुष्याला कलाटणी देणाऱ्या या प्रसंगानंतर भीवाची मानसिकता कशी बदलते? याची उत्कंठावर्धक गोष्ट ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून उलगडणार आहे. इतक्या वर्षांनंतर आजही जाती-भेदाच्या घटना आपण ऐकतो, वाचत असतो. जातीवादाच्या या आगीत कित्येक निरागस जीव आजही होरपळत आहेत. ‘डॉ. बाबासाहेब आंबेडकर’ या मालिकेतून महामानवाचा प्रेरणादायी प्रवास दाखवत समाज प्रबोधन करण्याचा ‘स्टार प्रवाह’ वाहिनीचा प्रयत्न आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर हे कर्ते सुधारक होते. सर्व माणसे समान आहेत, कोणीही उच्च किंवा नीच नाही अशी त्यांची ठाम धारणा होती. व्यवस्थेत शूद्र मानल्या गेलेल्या जातींवर होणारे अत्याचार याबाबत त्यांच्या मनात विलक्षण चीड होती. आपल्या प्रत्येक कृतीतून त्यांनी समानतेचे धडे दिले. डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा हाच प्रेरणादायी जीवनपट उलगडण्याचा मालिकेतून प्रयत्न केला जातोय.