मराठी रंगभूमीवरचे पहिले सुपरस्टार डॉ. काशिनाथ घाणेकर यांच्या जीवनावर आधारित ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट येत्या दिवाळीत प्रदर्शित होत आहे. त्यामुळे सध्या या चित्रपटाविषयी प्रचंड चर्चा रंगताना दिसून येत आहे. यातच आता भर पडली आहे ती म्हणजे ‘गोमू संगतीनं’ या गाण्याची. काशिनाथ घाणेकर यांची अनेक गाणी सुपरहिट ठरली होती. त्यातीलच एक गाणं म्हणजे गोमू संगतीने. त्यामुळेच त्यांच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी हे गाणं सुबोध भावे आणि प्राजक्ता माळीने रिक्रिएट केलं आहे.

काशिनाथ घाणेकर यांच्या ‘हा खेळ सावल्यांचा’ चित्रपटातील ‘गोमू संगतीनं’ हे गाणं त्याकाळी खूपच लोकप्रिय झालं होतं. आजही या चित्रपटाची आणि त्यातल्या गाण्याची जादू रसिकांच्या मनावर कायम आहे. तिच जादू पुन्हा एकदा अनुभवण्याची संधी ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ या चित्रपटातून मिळाली आहे.

सुबोध भावे आणि प्राजक्ताने पुन्हा रिक्रिएट केलेल्या गाण्यामध्ये या दोघांनीही डॉ. काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांच्या नृत्याला न्याय दिला आहे. त्यांच्या वेशभूषेपासून ते नृत्यापर्यंत प्रत्येक गोष्ट ही काशिनाथ घाणेकर आणि आशा काळे यांची आठवण करुन देते.

सुबोध भावेने काशिनाथ घाणेकर यांच्या प्रत्येक गोष्टीचा, त्यांचे हावभाव याचा पूरेपूर अभ्यास केल्याचं या गाण्यातून दिसून येत आहे. तर, प्राजक्तानेही आशा काळे यांची सोज्वळता हुबेहूब वठविण्याचा प्रयत्न केला आहे. एकंदरीतच या दोघांमुळे पुन्हा एकदा तो काळ डोळ्यासमोर तरळतांना दिसून येतो. त्यामुळे जुनं गाणं पुन्हा त्याच पद्धतीनं चित्रीत करण्यात आल्याचं दिसून येतं.

दरम्यान, ८ नोव्हेंबरला ‘आणि डॉ. काशिनाथ घाणेकर’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात सुबोध भावे सोबतच सोनाली कुलकर्णी, मोहन जोशी, सुमित राघवन असे अनेक दिग्गज कलाकारही पाहायला मिळणार आहेत.