चित्रपट समिक्षक आणि रसिक प्रेक्षक यांनी उत्तम प्रतिसाद दिलेला ‘डॉ. प्रकाश आमटे – द रिअल हिरो’ हा चित्रपट आता पाकिस्तानमध्ये प्रदर्शित करण्याची तयारी सुरु आहे. कराची येथील मानवी हक्क संघटनेशी त्यासंदर्भात पत्रव्यवहार सुरु आहे, असे चित्रपटाच्या निर्मात्या आणि दिग्दर्शिका समृध्दी पोरे यांनी त्यांच्याशी झालेल्या विशेष भेटीत बोलताना सांगितले. समृध्दी पोरे यानी याबाबत पुढे सांगितले की, चित्रपटाला देश-विदेशातून मिळालेल्या भावपूर्ण प्रतिसादाने मी नुसतीच भारावून गेले असे नाही, तर आपण मनापासून आणि प्रामाणिकपणे चांगले काम केले, तर ते लोकांपर्यंत नक्कीच पोहचते, यावरचा माझा विश्वास वाढला आहे. गरज कोणीतरी पहिले पाऊल टाकण्याची आहे.
समृध्दी पोरेनी यावेळी अधिक माहिती देताना सांगितले की, नागपूर येथील कैद्यांसाठी आयेजित केलेल्या या चित्रपटाच्या विशेष खेळाने विलक्षण प्रभावित होत काही कैद्यांनी डॉ. प्रकाश आमटे यांचे पाय धरले. त्यांच्यासारखे अलौकिक कार्य करता येणे म्हणजेच आयुष्याचे सार्थक झाले असे होय, अशीही त्यांनी आपली भावना व्यक्त केली. तर भांडूप येथील अल्प उत्पन्न वर्गातील मुलानी हा चित्रपट पाहून पैसे गोळा केले आणि मदत म्हणून दिले. असे अनुभव म्हणजे या कलाकृतीची खरी मिळकत आहे असेही समृध्दी पोरेनी सांगितले. अमेरिकेत सत्तावीस ठिकाणी या चित्रपटाचा प्रिमियर खेळ झाला, कॅनडातही चित्रपटाला उत्तम प्रतिसाद मिळाला. याशिवाय आखातीदेशासह जगातील आणखीनही काही देशात या चित्रपटाचे विशेष खेळ आयोजित केले गेले. चित्रपटाच्या माध्यमातून एक विशेष कार्य जगभरात पोहचत असल्याचे समाधान आहेच, असेही समृध्दी पोरेनी सांगितले.