लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ऑफ लीडरशिप अॅण्ड एक्सलन्स या संस्थेचा दशकपूर्ती सोहळा नुकताच संपन्न झाला. या सोहळ्याचे औचित्य साधून हेमलकसा येथील लोकबिरादरीचे डॉ. प्रकाश आमटे आणि मंदाकिनी आमटे यांना लक्ष्यवेधी परिवाराचा पुरस्कार देण्यात आला. यावेळी आशुतोष ठाकूर यांच्या वतीने हेमलकसा प्रकाशित करण्यासाठी “सौरऊर्जा प्रकल्प” डॉ. प्रकाश आमटे यांना भेट देण्यात आला. हा कार्यक्रम दादर येथील वीर सावरकर सभागृहात सायंकाळी ५.०० वाजता पार पडला. या कार्यक्रमात मुख्य अतिथी म्हणून डॉ. प्रकाश आमटे आणि डॉ. मंदाकिनी आमटे यांची उपस्थिती होती.

“लक्ष्यवेध इन्स्टिट्यूट ही संस्था गेली १० वर्ष उद्योजक घडवत आहेत. आजच्या छोट्या उद्योजकांना आणि भविष्यात होऊ घातलेल्या उद्योजकांना माझे एकच सांगणे आहे की आज खेडोपाडी छोट्या उद्योजकांची नितांत गरज आहे. तुम्ही जे उत्पादन बनवता ते तिथे येऊन विकण्यापेक्षा तेथील लोकांना ते उत्पादन बनवण्याचे प्रशिक्षण द्या. यामुळे तेथील लोकांना रोजगार निर्माण होईल. नफा आणि तोट्याच्या दुनियेत समाजाचा विसर पडायला नको.” असा संदेश डॉ. प्रकाश आमटे यांनी दिला.

हेमलकसासारख्या अतिदुर्गम भागामध्ये काजव्याप्रमाणे आपण थोडा तरी उजेड करू शकतो हा या संकल्पनेचा पाया आहे. हेमलकसा येथील आदिवासी व्यक्तीच्या आयुष्यात प्रकाशाचा एक झोत आणू शकतो असे आयोजकांना वाटते. या कामाची संकल्पना लक्ष्यवेधचे सर्वेसर्वा अतुल राजोळी यांची आहे. तर प्रकल्पाची आखणी, उभारणी सौर इंजिनीअर कन्सल्टंट प्रा.लि चे सोलर ग्रीड इंजिनीअर आशुतोष ठाकूर यांनी केली आहे.