News Flash

डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन

डॉ. वसंतराव देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष २ मे पासून सुरु होत आहे

हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतातील महान गायक, मराठी संगीत रंगभूमीवरील अभिनेते, ज्यांनी आपल्या अद्वितीय, अविस्मरणीय गायकीने रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवले ते डॉ. वसंतराव देशपांडे. ज्यांनी बंदिश, ठुमरी, नाट्यसंगीत, चित्रपट संगीत या सर्व गान प्रकारांवर आपल्या गायकीचा अमीट ठसा उमटवला. असे आपल्या सर्वांचे लाडके व्यक्तीमत्व डॉ. वसंतराव देशपांडे यांचे जन्मशताब्दी वर्ष २ मे २०१९ पासून सुरु होत आहे. त्यांचे पट्टशिष्य पं. चंद्रकांत लिमये यांचं संगीत क्षेत्रातलं कार्य आणि गुरुप्रेम सर्वांना परिचित आहे. या निमित्ताने त्यांनी दर्जेदार कार्यक्रमांचे आयोजन केले आहे.

डॉ. वसंतराव देशपांडे यांचे पट्टशिष्य पं.चंद्रकांत लिमये यांनी २००० साली वसंतराव देशपांडे संगीत सभेची स्थापना केली. वसंतरावांची गायकी, लय-सुरांवरचं प्रभुत्व, गाण्यातला शास्त्रशुद्धपणा, आवाजातला गोडवा, श्रोत्यांना खिळवून ठेवण्याची ताकद हा समृद्ध वारसा पुढे अविरत सुरू रहावा हा या संगीत सभेचा मूळ उद्देश. तो पं. लिमये यांनी मनोभावे जपला. ही परंपरा पुढे नेण्यासाठी आणि वसंतरावांच्या कर्तृत्वाचे पुण्यसमरण करण्याच्या हेतूने पं. लिमये यांनी जन्मशताब्दीनिमित्त विविध कार्यक्रमाचं आयोजन केले आहे.

डॉ. वसंतराव देशपांडे संगीत सभेचे प्रमुख विश्वस्त पं. चंद्रकांत लिमये असून संगीत सभेने ५ मे २०१९ रोजी वसंतराव देशपांडे जन्मशताब्दी महोत्सवाच्या शुभारंभाचा सोहळा रविंद्र नाट्य मंदीर येथे संध्याकाळी ५ ते रात्री १० या वेळेत आयोजित केला आहे. या दिवशी डॉ. वसंतराव देशपांडे यांच्यावरील विशेषांकाचे प्रकाशन करण्यात येणार आहे. यावेळी अच्युत गोडबोले, पं. शंकर अभ्यंकर, पं. सत्यशील देशपांडे, फैयाज, माजी पोलीस आयुक्त अरविंद इनामदार, माजी लोकसभा अध्यक्ष आणि माजी मुख्यमंत्री डॉ. मनोहर जोशी इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार असून ते डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या आठवणी जागृत करणार आहेत.

त्यानंतर ‘वसंत बहार’ हा डॉ. वसंतराव देशपांडे यांच्या गायकीचे दर्शन घडवणारा कार्यक्रम सादर करण्यात येणार आहे. दृकश्राव्य माध्यमातून उलगडणाऱ्या या कार्यक्रमात डॉ. वसंतराव देशपांडे यांनी अजरामर केलेल्या बंदीशी, ठुमरी, नाट्यगीत, चित्रपटगीत, इत्यादी गीतप्रकार पं. चंद्रकांत लिमये आपल्या गुरुकुलातील शिष्यांसह सादर करणार आहेत. त्यानंतर ग्वाल्हेर घराण्याच्या तरुण गायिका नुपूर काशीद- गाडगीळ व पद्मभूषण पंडिता प्रभाताई अत्रे यांच्या गायनाचा आनंद रसिकांना मिळणार आहे. हा कार्यक्रम जन्मशताब्दी निमित्त सर्व रसिकांसाठी विनामुल्य ठेवला आहे.

जन्मशताब्दी निमित्ताने महाराष्ट्रातील पुणे, कोल्हापूर, सांगली, नाशिक, सोलापूर, बेळगाव, गोवा इत्यादी ठिकाणी संस्थेच्या वतीने वेगवेगळ्या कार्यक्रमांचे आयोजन करण्यात येणार आहे. तसेच कार्यशाळांचेही आयोजन करण्यात येणार आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on April 30, 2019 2:01 pm

Web Title: dr vasantrao deshpande birth centenary the state organizes events in various places
Next Stories
1 …म्हणून प्रभास झाला भावूक
2 Photo : उधम सिंग यांच्या भूमिकेतील विकी कौशल
3 उच्चशिक्षित मंत्री असतांनाही पाण्याचं नियोजन नाही – अण्णा हजारे
Just Now!
X