चंद्रकांत कुलकर्णी. रंगभूमीवरील सर्वकालीन सर्वोत्तम दिग्दर्शकांपैकी एक. ३५ वर्षांचा त्यांचा हा रम्य प्रवास. त्यामुळे सर्वात जास्त ते जगले असतील तर ते नाटकच. आतापर्यंत जवळपास ७० नाटकं आणि एकांकिकांना त्यांनी दिग्दर्शन केलं आहे. सुरुवातीला हौशी, पण त्यानंतर नाटय़शास्त्राचा रीतसर अभ्यास करत त्यांनी व्यावसायिक, प्रायोगिक रंगभूमीवर दिग्दर्शनाला सुरुवात केली. आणि वैविध्यपूर्ण विषयांवरील बरीच नाटकं केली.

सध्याच्या घडीला व्यावसायिक रंगभूमीवर त्यांची चार नाटकं सुरू आहेत. ‘साखर खाल्लेला माणूस’ या नाटकात त्यांनी प्रशांत दामले यांच्याकडून ज्यापद्धतीनं वेगळं काम करून घेतलं ते बऱ्याच जणांना भावलं. ‘साखर खाल्लेला माणूस’ हे नाटक वेगळ्या धाटणीचं आहे. ही एक ब्लॅक कॉमेडी आहे. त्याचबरोबर ‘चंकू’ची काम करण्याची एक वेगळी पद्धत आहे. पूर्ण एकाग्रतेने तो काम करतो. एका वेळी एकच नाटक तो करतो. लेखकाकडून काही गोष्टी राहून जातात, त्या गोष्टी भरण्याचं उत्तम काम ‘चंकू’ नटाकडून उत्तमपद्धतीने करून घेतो. तो लेखक आणि नटामधला एक अद्वितीय असा दुवा होतो. जेव्हा तो तालमीला उभा राहतो, तेव्हा त्याचं संपूर्ण नाटक पाठ असतं. प्रत्येक नटाकडून तो लहान लहान गोष्टी करवून घेतो.  तालमीला ९ म्हणजे ९ वाजताच पोहोचायला हवं, ही त्याची शिस्त असते. व्यावसायिक नाटक करत असाल तर ते त्याच पद्धतीनं करायला हवं, नाहीतर ते हौशी होतं, असं ‘चंकू’ सांगतो,’ असे प्रशांत दामले त्यांच्याबद्दल सांगत होते.

वैभव मांगले म्हटल्यावर विनोदी किंवा स्त्री भूमिका करणारा नट, असं चित्र काहींच्या मनात तयार होतं. त्यामुळे वैभव गंभीर भूमिका करू शकत नाही, असं बऱ्याच जणांना वाटत होतं. पण चंद्रकांत कुलकर्णी यांनी ते खोडून काढलं आणि वाडा चिरेबंदी व मग्न तळ्याकाठी या दोन्ही नाटकांमध्ये त्यांनी वैभवला संधी दिली. ‘लालबाग-परळ’ या सिनेमात माझी पाच मिनिटांचीच भूमिका होती. पण तू आतापर्यंत केलेल्या विनोदी भूमिका एका बाजूला आणि ही पाच मिनिटांची भूमिका एका बाजूला, असं त्यांनी सांगितलं. सध्या रंगभूमीवरील एक महान दिग्दर्शक म्हणून आपण चंदू सरांचे नाव नक्कीच घेऊ शकतो. त्यांची काम करण्याची शैली फारच भिन्न आहे. लेखकाने जे काही लिहिलं आहे ते प्रेक्षकांपर्यंत चोख कसं पोहचवता येईल, हे त्यांचे मुख्य ध्येय असते. त्यानुसार ते पात्रांनी निवड करतात. लेखकाने लिहिलेली भाषा जशी आहे तशीच ती नटाला यायला हवी, यावर त्यांचा भर असतो. पहिल्या तालमीला ते जेव्हा उभे राहतात तेव्हा त्यांचे नाटक पूर्ण पाठ असते. प्रत्येक शब्दच नाही, तर स्वल्पविराम, पूर्णविराम यासकट सर्वच. शब्द कसे असतात, त्याचा उच्चार कसा करायचा, याचे उत्तम ज्ञान त्यांच्यापाशी आहे,’ असे वैभव सांगत होता.

पु. ल. देशपांडे यांचं ‘व्यक्ती आणि वल्ली’ नाटक करणं सोपं नाही. कारण प्रत्येक व्यक्तीची धाटणी निराळी, पण असं जरी असलं तरी हे आव्हान चंद्रकांत कुलकर्णी यांनी उत्तमरीत्या पेललं. या नाटकात महत्त्वाची भूमिका साकारली ती आनंद इंगळेने. तो ‘चंदू’सरांविषयी भरभरून बोलत होता. सध्याच्या रंगभूमीवरचा सर्वात हुशार दिग्दर्शक म्हणजे चंद्रकांत कुलकर्णी. शब्द ज्यांना कळतात, असे काही थोडेसे दिग्दर्शक आहे, त्यापैकी एक चंदू सर आहेत. ‘बीटविन द लाइन्स’ कळण्याची कमालीची क्षमता त्यांच्यामध्ये आहे. नटाकडून काम कसं करून घ्यायचं, हे त्यांना नेमकं कळतं. एखादा नाटकातील प्रसंग करत असताना नटाच्या मनात नेमकं काय चाललंय, हे ते अचूक ओळखतात. नट उत्तम काम करतोय किंवा अडखळतोय, याचे कारण त्यांना नेमकेपणाने ठाऊक असते. त्यांच्याबरोबर काम करताना एक नट म्हणून मी प्रगल्भ झालो. नटाची विचार करण्याची क्षमता त्यांच्याबरोबर काम करताना वाढते. वैविध्यपूर्ण नाटकाचे ते दिग्दर्शन करतात, असं काम करणारा दुसरा दिग्दर्शक आता नाही. आतापर्यंतच्या मराठी रंगभूमीवरचा सर्वात महत्त्वाच्या दिग्दर्शकांपैकी एक चंदू सर आहेत.

बऱ्याच जणांची त्यांच्याविषयीची भिन्न मतं असली तरी आपण कसं काम करतो, हे थेट चंद्रकांत कुलकर्णी यांनीच अलवारपणे उलगडलं. ‘मी संहितेचा खूप खोल अभ्यास करतो. दिग्दर्शकाने त्याच्यावर काही संस्कार करायचेच असतात, पण मूळ लेखकाने नाटक कुठल्या शैलीत लिहिले आहे, त्याचा आकृतिबंध हा संहितेमध्ये दडलेला असतो. त्याच्या रंगसूचनांपासून ते वेगवेगळ्या पात्रांतून आपल्याला वेगळी माहिती मिळत जाते. नाटक जेव्हा वारंवार वाचतो, तेव्हा या साऱ्या गोष्टी उमजतात. मी प्रत्येक नाटक केल्यावर माझी पाटी कोरी करतो आणि पुन्हा नव्याने एक विद्यार्थी म्हणून शिकायला सुरुवात करतो. बासरीवादकाच्या पोतडीत फक्त एकच बासरी नसते, तो प्रत्येक गोष्टीनुसार कोणती बासरी वाजवायची ते ठरवतो, तसंच काम मला करावं लागतं. मी उठतो ते नाटक, सिनेमाचा श्वास घेण्यासाठी आणि झोपतो ते या क्षेत्रातलं काम करून. मी समकालीन व्यक्तींची कामं पाहतो. यापूर्वीच्या लेखकांचे लिखाण वाचले आहे. नेपथ्य, प्रकाशयोजना हे अंगही तपासलेलं आहे. तू असल्यावर आम्हाला दर्जेदारच बघायला मिळेल, असं लोकं सांगतात तेव्हा ती माझ्यासाठी शाबासकी असते, अभिमान वाटतो, पण त्यानंतर लगेचच जबाबदारीची जाणीवही होते. कामातून मी मला जिवंत ठेवतो, जागतं ठेवतो. या व्यवसायाने मला ऊर्जा दिली आहे. मला तालमीच्या प्रक्रियेविषयी फार प्रेम आहे. तालीम ते पहिला प्रयोग हा प्रवास मला फार आवडतो. मी सर्व प्रकारच्या नाटककरांचे नाटक करता आले. माझ्या कामात वैविध्य ठेवतो. कामात नावीन्य, सातत्य आणि दर्जा यावर मी भर देतो. सचिन तेंडुलकर किंवा सुनील गावस्कर यांनी बरीच शतके झळकावली. पण त्यानंतर पुन्हा मैदानात उतरताना आपली खेळी तंत्रशुद्ध आणि नावीन्यपूर्ण कशी करता येईल, हा त्यांचा ध्यास होतो, तसेच माझेदेखील आहे. एखादा नवीन प्रयोग बघायला मिळाला तर विनम्र होऊन त्या कलाकृतीला शरण जातो.’

नाटक हे पहिलं लेखकाचं माध्यम समजलं जातं. पण लेखकाचा विचार प्रेक्षकांपर्यंत नटाच्या माध्यमातून प्रयत्न करतो तो दिग्दर्शक. लेखकाचे म्हणणे ऐकून ते नटांमध्ये भिनवून प्रेक्षकांपर्यंत चोख पोहोचवणं, ही त्यांची ओळख सर्वश्रूतच. त्याचबरोबर कमालीची शिस्त आणि व्यावसायिकपणा त्यांच्यामध्ये आहे. आतापर्यंत वैविध्यपूर्ण नाटकांचे रंग उधळत त्यांनी रसिकांना अवीट आनंदाचे क्षण दिले आहेत आणि यापुढे अशाच दर्जेदार नाटकांनी ते रंगभूमीची धग कायम ठेवतील, अशी आशा आपण त्यांच्याकडून ठेवू शकतो.