विनोद आणि सरयू दोशी फाऊंडेशन आयोजित विनोद दोशी नाटय़महोत्सव यंदा दशकपूर्ती साजरी करत आहे. यंदा १९ ते २३ फेब्रुवारी दरम्यान यशवंतराव चव्हाण नाटय़गृहात हा महोत्सव होणार आहे. विविध भाषांतल्या नाटकांची मेजवानी या महोत्सवातून नाटय़प्रेमींना मिळणार आहे. या महोत्सवाच्या निमित्ताने आणि दशकपूर्तीच्या औचित्याने महोत्सवाचे संयोजक अशोक कुलकर्णी यांच्याशी साधलेला संवाद..

यंदा विनोद दोशी नाटय़महोत्सवाला दहा र्वष पूर्ण होत आहेत. ही वाटचाल कशी होती?

दहा वर्षांचा प्रवास नक्कीच रंगतदार आणि उत्साहवर्धक असाच आहे. विनोद दोशींना नाटकांची आवड होती. त्यामुळे पुण्या—मुंबईतल्या प्रायोगिक नाटकांना व्यासपीठ मिळावं या हेतूनं आम्ही नाटय़महोत्सवाची सुरुवात केली. काही काळ पुण्या-मुंबईतली नाटकं महोत्सवात झाली. मात्र, नंतर असं वाटलं, की केवळ पुण्या-मुंबईतलीच नाटकं करण्यापेक्षा इतर राज्यांतली नाटकंही व्हायला हवीत. देशभरातली नाटकं महोत्सवात व्हावीत. ही नाटकं अशी असावीत, जी पुण्यात आधी कधी सादर झाली नाहीत. आमची ही कल्पना प्रेक्षकांना आवडली. इतर भाषांतली नाटकंही प्रेक्षक आवडीनं पाहू लागले. दरवर्षी महोत्सवाला उपस्थिती वाढू लागली. उदाहरण सांगायचं तर, एकदा कन्नड नाटक महोत्सवात होणार होतं. आम्हाला अपेक्षा होती, की पुण्यातले कन्नड भाषक नाटकाला येतील, मात्र कन्नड भाषकांपेक्षा इतर प्रेक्षकच जास्त होते. त्यानंतर वेगवेगळय़ा भाषांतली नाटकं आम्ही आमंत्रित करू लागलो. आजवर मराठीसह हिंदी, इंग्रजी, कन्नड, आसामी, बंगाली, गुजराती आदी भाषांतली नाटकं महोत्सवात सादर झाली आहेत. त्यामुळे हा महोत्सव अखिल भारतीय, बहुभाषक, वेगवेगळय़ा आकृतिबंधातल्या नाटकांना स्थान देणारा ठरला. आता तर हा देशातला लँडमार्क महोत्सव झाला आहे असं म्हणायलाही हरकत नाही.

यंदाच्या महोत्सवाचं वैशिष्टय़ काय सांगाल?

यंदाच्या महोत्सवात पाच नाटकं होणार आहेत. तीन समकालीन नाटकांसह दोन अभिजात नाटकं पाहायला मिळतील. यंदाच्या महोत्सवाचं आकर्षण म्हणजे सतीश आळेकर यांनी दिग्दर्शित केलेलं महानिर्वाण आणि गिरीश कार्नाड यांचं ‘ययाति’ हे नाटक. दहा वर्षांपूर्वी महोत्सवात महानिवीद्द्रण झालं होतं, ते थिएटर अ‍ॅकॅडमीनं मूळ संचात केलं होतं. तेच नाटक आळेकरांनी नव्या रंगकर्मीना घेऊन केलं आहे. बऱ्याच वर्षांनी ते पुन्हा दिग्दर्शनाकडे वळले आहेत.

महोत्सवाबरोबरच तुम्ही रंगकर्मीना फेलोशिपही देता. आजवर या उपक्रमातून काय साधलं असं तुम्हाला वाटतं?

२००२-०३ मध्ये आम्ही नव्या रंगकर्मीना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीनं काहीतरी करावं असा विचार करत होतो. तेव्हा काही महोत्सव होत नव्हता. आमच्या साहित्य रंगभूमी प्रतिष्ठानतर्फे आम्ही मुंबईत एक प्रदर्शन भरवलं होतं. त्या प्रदर्शनातून काही रक्कम शिल्लक राहिली होती. त्या रकमेचा उपयोग व्हावा असं वाटत होतं. त्या वेळी नाटककार विजय तेंडुलकर आणि मी या फेलोशिपचा विचार मांडला. त्यानुसार तीन रंगकर्मीना आम्ही फेलोशिप दिली. ही फेलोशिप देताना ती विनाअट असावी, अर्ज मागवण्यात येऊ  नयेत असे काही नियम आम्ही ठरवले. दोन वर्षांत ही रक्कम संपली. मग विनोद आणि सरयू दोशी फाऊंडेशननं मदतीचा हात पुढे केला आणि फेलोशिप सुरू राहिली. फाऊंडेशननं तीनऐवजी पाच रंगकर्मीना फेलोशिप द्यायचं ठरवलं. या फेलोशिपमधून साधलं काय असा विचार केला, तर रंगकर्मीना प्रोत्साहन मिळालं. नवे रंगकर्मी गवसले. या रकमेचा उपयोग रंगकर्मीनी स्वत:साठीच करणं अपेक्षित आहे. त्याचा वापर करून त्यांनी नाटक लिहिण्यासाठी अभ्यास करावा, पुस्तकं घ्यावीत, वाचन करावं, फिरावं असं अपेक्षित आहे. आतापर्यंत ५२ रंगकर्मीना ही फेलोशिप मिळाली. त्यातले बहुतेक रंगकर्मीनी आज स्वत:ची ओळख निर्माण केली आहे. काहींनी चित्रपट क्षेत्रात प्रवेश केला आहे. या फेलोशिपसाठी रंगकर्मी निवडण्यासाठी सुनील शानबाग, सतीश आळेकर, शांता गोखले, गिरीश कार्नाड आदी ज्येष्ठांचंही सहकार्य लाभलं आहे.

नाटक वाढण्यासाठी असे आणखी महोत्सव व्हावेत असं वाटतं का?

हो, नाटकासाठी महोत्सवांची गरज आहेच. या महोत्सवामागे आमचा व्यावसायिक हेतू नाही. सरकार, नाटक इंडस्ट्रीनं अशा महोत्सवांसाठी पुढे यायला हवं. जितके महोत्सव होतील, तितकी वेगवेगळय़ा पद्धतीची नाटकं प्रेक्षकांना पाहायला मिळतील. नाटक पुढे जाण्यासाठी सुजाण प्रेक्षकही घडणं आवश्यक आहे. ते काम अशा महोत्सवांतून होतं.

या दहा वर्षांमध्ये नाटक किती बदललं आहे? त्या बाबत तुमचं काय निरीक्षण आहे?

नाटक कायमच होत आहे. त्यातला उत्साह वाढतोच आहे. मात्र, एक उणीव विशेषत्वानं नमूद करावीशी वाटते. आज पूर्वीसारखे नाटककार राहिले नाहीत. ऑथरबॅक नाटक होत नाही. एक संकल्पना घेऊन इम्प्रोवाइज करत, सगळय़ांनी मिळून लिहीत नाटक आकाराला येतं. आजच्या पिढीच्या रंगकर्मीमध्ये ऊर्जा प्रचंड आहे. तांत्रिकदृष्टय़ा प्रचंड बदल झाले आहेत. ते नक्कीच स्वागतार्ह आहेत. नाटक परिणामकारक होण्यासाठी तंत्राचा फार बारकाईनं विचार केला जात आहे, हे मला महत्त्वाचं वाटतं.

हा वर्षांचा टप्पा गाठल्यानंतर आता पुढील काळासाठी काय योजना आहेत? राज्यात इतर ठिकाणी महोत्सव व्हावा या दृष्टीनं काही विचार आहे?

महोत्सव आयोजित करणं हे खर्चिक काम आहे. त्यामुळे खर्चाची तजवीज झाली तर बाहेर नाटय़महोत्सव होऊ शकतो. मात्र, त्यासाठी स्थानिक नाटय़संस्था, रंगकर्मीनी पुढे यायला हवं. नाटकासह नाटकातले कलाकार, नाटककार, दिग्दर्शक यांच्यासह नाटकाविषयी चर्चा आयोजित करावी असा एक विचार आहे. त्यातून नाटकाची प्रक्रिया सविस्तरपणे समजेल. महोत्सवाला जोडून काही कार्यशाळा घेता येईल का, असाही विचार आहे. पण हा महोत्सव येत्या काळातही असाच उत्तम पद्धतीने होत राहील हे नक्की!

chinmay.reporter@gmail.com