अंमली पदार्थ विरोधी पथकाने कॉमेडियन भारती सिंहच्या घरावर शनिवारी छापा टाकला. त्यावेळी तिच्या घरात अंमली पदार्थ आढळून आल्यामुळे एनसीबीने शनिवारी तिला चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीत भारती आणि तिचा पती हर्ष लिंबाचियाने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आता त्या दोघांना मुंबई किल्ला कोर्ट न्यायालयाने १४ दिवसांची म्हणजे ४ डिसेंबरपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावली आहे. भारती आणि हर्षने जामीनासाठी अर्ज केला असून त्यावर सोमवारी सुनावणी होणार आहे.

अभिनेता सुशांत सिंह राजपूत मृत्यू प्रकरणाच्या चौकशीत ‘बॉलिवूड ड्रग्ज प्रकरण’ समोर आले. एनसीबीने शनिवारी सकाळी खार दांडा परिसरात छापा घातला. कारवाईत अमली पदार्थांचा पुरवठा करणाऱ्या एकाला अटक करण्यात आली. त्याच्याकडून १५ एलएसडी डॉट्स, ४० ग्रॅम गांजा आणि नायट्रोझेपाम औषध आदी अमली पदार्थ एनसीबीने हस्तगत केले होते. त्याच्या चौकशीतून भारतीचे नाव समोर आले.

शनिवारी ( २१ नोव्हेंबर) सकाळी एनसीबीच्या पथकाने भारती सिंहच्या घरी धाड टाकली. यावेळी करण्यात आलेल्या झाडाझडतीत अधिकाऱ्यांना भारतीच्या घरातून गांजा मिळाला. ड्रग पेडलरने दिलेल्या माहितीनंतर एनसीबीने ही कारवाई केली. त्यानंतर भारती आणि हर्ष यांना चौकशीसाठी बोलवण्यात आले होते. चौकशीत भारतीने अमली पदार्थांचे सेवन करत असल्याची कबुली दिल्यानंतर एनसीबीने तिला ‘एनपीडीएस’ कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली. आता त्यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.