बहुतांश मराठी मालिका बॉलीवूड सिनेमांसारख्याच असतात. भपकेबाज सेट, कपडे, भडक मेकअप वगैरेंमुळे त्या वास्तवापासून तुटलेल्या असतात. पण लोकांशी, त्यातही तरुणाईशी चांगल्या अर्थाने जोडून घेण्याचा प्रयोग एका मालिकेने केला आणि प्रेक्षकांनीही तिला डोक्यावर घेतलं.

प्रयोग या शब्दांतच गंमत आहे. काहीतरी नवं धुंडाळण्याची ताकत या संकल्पनेत आहे. त्याच वेळी फिसकटण्याची, गोंधळाची, फजितीची शक्यताही या टर्मिनलॉजीत आहे. प्रयोग होतात म्हणूनच नवीन काहीतरी गवसतं. दिल दोस्ती दुनियादारी मालिका हा असाच एक भन्नाट प्रयोग. मित्रांवर आधारलेली ही पहिलीच मालिका नाही. ‘बेधुंद मनाच्या लहरी’पासून ‘४०५ आनंदवन’पर्यंत दोस्ती केंद्रस्थानी होती. पण सासू, सून, लग्न, कटकारस्थानं यांनी व्यापलेल्या प्राइमटाइममध्ये दोस्तीवरची डेली सोप हा धाडसी प्रयोग होता. सर्वार्थाने आगळंवेगळं काहीतरी मांडण्यापेक्षा छोटय़ा सूक्ष्म गोष्टींचा सखोल विचार करून केलेल्या सादरीकरणामुळे हा प्रयोग हिट ठरलाय. गोष्टींमागची दुनियादारी समजून घेण्याचा केलेला प्रयत्न.

– मराठी मालिकांमध्ये एकत्र कुटुंब असतं. संस्कृतीचं जतन वगैरे भावनिक मुद्दय़ांपेक्षा चॅनेल आणि दिग्दर्शकासाठी व्यवहार्य मुद्दा महत्त्वाचा. एखादा कलाकार अन्य मालिका, नाटक किंवा सिनेमाच्या कामात बिझी असेल तर घरातल्या बाकीच्या मंडळींवर सीन खेळवता येतात. नॅनो कुटुंब दाखवलं की ही पंचाईत जास्त होऊ शकते. आठ-दहा माणसं दाखवायची. रोटेट करता येतात. दुनियादारीत कुटुंबच नाही. फारच धाडसी.

पाच मंडळी एकत्र राहतात, पण ते नात्याने कुटुंब नाहीत. ‘सासूसुनेची कारस्थानं, हेवेदावे, रडारड परवडली पण हे काय बॅचलर मुलंमुली एकत्र राहतात, हेच दाखवायचं बाकी ठेवलं होतं’. दुनियादारीचा पहिला एपिसोड टेलिकास्ट झाल्यानंतर असंख्य घरांमधला हा कॉमन डायलॉग होता. शिक्षण, नोकरी-व्यवसाय निमित्ताने मुलंमुली घराबाहेर पडतात. नातेवाईकांकडे, कॉट सिस्टमवर, पेइंग गेस्ट म्हणून, भाडेतत्त्वावर, होस्टेलमध्ये अशी मंडळी राहतात. ऑफिसमधले कलिग एकत्र राहतात किंवा शिक्षणासाठी बाहेरगावाहून आलेली मुलं एकत्र राहतात. पण जेंडर डिफरन्स काटेकोरपणे पाळला जातो. आणि इथं तीन मुलं आणि तीन मुली एकत्र- वन बीएचकेमध्ये. ‘अब्रमण्यम-सुब्रमण्यम’ प्रकार. हा बाहेरख्यालीपणा न पचून सीरियलला स्टार्टिगलाच झिडकारून देण्याची शक्यता होती. नैतिकतेला धक्का, संस्कृतीचा ऱ्हास वगैरे प्रक्षोभक मुद्दे बाहेर येण्याची दाट शक्यता होती. पण वादग्रस्त ठरू शकणाऱ्या मुद्दय़ावरच सीरियलने बाजी मारली.

– प्रेम, इश्क, मोहब्बत, लिव्ह इन, वन नाइट स्टँड अशा कोणत्याही तृतीयपर्णी (पेजथ्री) उपद्व्यापांसाठी ही मंडळी एकत्र आलेली नाहीत हे स्पष्ट झाल्याने अनेकांनी नि:श्वास टाकला. एवढय़ा कमी स्पेसमध्ये मुलं-मुली एकत्र राहावं लागणं हे त्यांनाही आवडलेली नाही. उलट आर्थिक टंचाई आणि सुरक्षितता या दोन कारणांसाठी ही मंडळी नाईलाजाने एकत्र आलेली आहेत हे समजल्यावर अनेकांना ते आपलेसे वाटू लागले. बरं बहुतांशी मालिकांमध्ये ‘तुम्ही छान-आम्ही छान, मधाळ आटपाट नगरी’ बेगडी वातावरण दाखवतात किंवा टोकाची क्रुरता, अप्पलपोटी, कपटी भडक मेकअपसह उग्र वळणाची माणसं असतात. इथे वेगळं आहे. दुनियादारीतली माणसं एकत्र येतात, कडाडून भांडतात. परिस्थितीनुरूप असतात, वागतात. मालिकांमधून एवढं कृत्रिम पाहायची सवय झालेय आपल्याला की आपल्यासारखं घर, माणसं पडद्यावर बघायला मिळत आहेत हेच अनेकांना भावलं.

– जनरल मालिकांमध्ये घरं असतात, बंगले असतात. कथानकानुसार सेट उभारले जातात. पण बहुतांशी सामान्य माणसांच्या घराप्रमाणे ही घरं नसतातच. हे स्टुडिओतलं घर हे सतत जाणवत राहतं. प्रत्येकाला स्वतंत्र खोली ही चैन मालिकांमध्ये बरेचदा असते. पण किती घरांमध्ये असे चोचले असतात, तुम्हीच सांगा. दुनियादारीमध्येही सेटच आहे पण तो वन बीएचके घराचा. आणि हे घर तुमचं-माझं असतं तसं वाटतं. प्रॉपर सोसायटीतला ब्लॉक असं स्पेसिफाइड दाखवून शूट होणारी ही पहिलीच मराठी मालिका असावी. प्रत्येक घरात बेसिन आणि टॉयलेट असतं. पण मराठी मालिकांना ते दाखवणं योग्य वाटायचं नाही. इथे ते पाहायला मिळतं. बहुतांशी घरांमध्ये बेसिन असतं, पण नळाला पाणी नसतं. चंबूने खालच्या पिंपातून घ्यावं लागतं. दुनियादारीत अस्संच बेसिन आहे डिट्टो. इतका बारीक विचार लेखकाच्या, पटकथाकाराच्या डोक्यात आहे आणि सेट तयार करणाऱ्या माणसाने त्याची उत्तम अंमलबजावणीही केली आहे. आता घरात मुलं-मुली म्हटल्यावर टॉयलेट सेपरेटच असावं. मुंबईत एवढी स्पेस कोणाकडे आहे. म्हणून तर माणसं रेल्वे ट्रॅकवर जातात. असो.. मालिकेत कॉमन टॉयलेट आहे. सहा माणसं ते वापरणार, कोणाला कशासाठी किती वेळ लागेल सांगता येत नाही. बरं ही जागा अगदी खासगी असते एरव्ही. म्हणूनच आत जाताना टॉयलेटच्या दारावर राजा किंवा राणी बदलण्याची आयडिया भन्नाट आहे. हे असं आपल्याला रोज पडद्यावर दिसतं.

आपणही विचार केला की लक्षात येतं- मुंबई, जागेची समस्या, वैैयक्तिक स्पेस, प्रायव्हसी हे सगळं ध्यानात घेऊन ही शक्कल लढवली आहे जी प्रॅक्टिकल आहे.

– बॉलीवूड चित्रपटांमध्ये हिरोचा बिझनेस असतो. अख्ख्या चित्रपटात तो कधीच काम करताना दिसत नाही तो भाग वेगळा. हीच लाट भाषिक मालिकांमध्येही आहे. पण दुनियादारीत आयता बिझनेस करणारं कोणी नाही. आयटी प्रोफेशनल, बुटिकमध्ये जाणारी, कम्पोझर अशी कॉमन वाटावी अशी माणसं आहेत. शिक्षण बेताचं असलेला माणूस काय काम करू शकेल? उत्तर अवघड आहे. पार्टीत बनी म्हणून काम करणारा असं आगळंवेगळं प्रोफेशन असणारा माणूस आहे. स्वयंपाकाची आणि एकूणातच संसाराची आवड असणारी स्त्री आहे. पडद्यावरचं जग आभासीच असतं. आपण कन्व्हिन्स होण्यासाठी पात्रांशी रिलेट होणं आवश्यक असतं. सर्वसामान्यांप्रमाणे अडचणी घेऊन जगणारी माणसंच दिसत असल्याने ती प्रेक्षकांना पटतात, आवडतात. गॅझेट्सच्या जंजाळात अडकलेली, मी आणि माझं असं जगणारी एक पिढी तयार झाली आहे. सभोवतालची, वडिलधाऱ्यांची, त्यांना काहीही पडलेली नसते. या पिढीच्या वयाशी साधम्र्य साधणारी मुलं मालिकेत आहेत. पण त्यांना परिस्थितीची जाण आहे. प्रॅक्टिकल आहेत, पण भावनिकही आहेत. पैशाचं महत्त्वं कळलंय पण लोभी नाहीत. सीनियर सिटिझन्सना आदर देतात, पण नातेवाईकांच्या गोतावळ्यात रमत नाहीत. कविता, जुनी गाणी, कलाकार, संस्कृती यांच्याविषयी त्यांना आदर आहे. २५ ते ३० वयोगटांतली ही मुलं आहेत. मॉडर्न आहेत, पण रीतिरिवाज, सणसमारंभ त्यांना ठाऊक आहेत आणि ते पाळणं त्यांना कमीपणाचं वाटत नाही. पाचजणांच्या मिळून पिढीचा बॅलन्स समतल काढला आहे. प्रत्येक कॅरेक्टरला एकमेकांपासून वेगळं करणारी गुणवैशिष्टय़ं आहेत. आणि त्यांनी ती जाणीवपूर्वक जपली आहेत. म्हणूनच कोणाला सुजय आवडतो कुणाला मीनल.

– तपशीलवार काम करण्याला इंग्रजीत डिटेलिंग असा सुंदर शब्द आहे. कपडय़ांबाबत इतकं फाइन डिटेलिंग पहिल्यांदाच पाहायला मिळतं. मुळातच घरात वावरताना, कटय़ावर जाण्यासाठी, पिकनिकसाठी, ऑफिसला जाण्यासाठी वेगवेगळे कपडे आपण वापरतो. मालिकांमधली माणसं कायम डिझायनर कपडे परिधान करूनच दिसतात. प्रसंग कोणताही असो. ही मालिका अपवाद आहे. प्रत्येक व्यक्तीचा कम्फर्ट झोन असतो कपडय़ांचा. घरात वावरताना टीशर्ट-ट्रॅकसूटवर असतात मुलं. घरात वावरताना, मुलं आजूबाजूला असताना मुली काय कपडे घालतील याचा विचार करून कॉस्श्युम दिले गेलेत.

काही माणसांना घरात मोकळंढाकळं राहायला आवडतं. हल्ली अनेकांना बाहेर तसं राहायला आवडतं तो भाग वेगळा. म्हणूनच गंजी आणि शॉर्ट्समध्ये वावरणारा मुलगा आहे. फार समर्थनीय नसलं तरी अशी माणसं आपण पाहतोच की आपल्या आजूबाजूला. नॉनमराठी पण मराठी समजू शकणाऱ्या आणि मॉडर्न वुमन म्हणवणाऱ्या निशाला तिच्या लाइफस्टाइलप्रमाणे कपडे देण्यात आलेत.

-डेली सोपच्या मालिकांमध्ये पहिल्यापासून काय घडलंय याचं बॅगेज घेऊनच रोजचा भाग पाहावा लागतो. पण दुनियादारीचा एपिसोड स्किटसारखा असतो. कोणताही भाग तुम्ही रँडमही एन्जॉय करू शकता. १७-१८ मिनिटांत विषय मांडून, तो समअप करणं खूपच कठीण टास्क आहे. या फॉरमॅटमुळे त्यांना असंख्य अपडेट होत जाणाऱ्या गोष्टींवर खेळता येतं. पण त्याच वेळी विषय टुकार असेल तर बोअर होण्याचा धोकाही वाढतो. दुनियादारीतले अनेकजण नाटय़कर्मी आहेत. प्रत्येक नवीन प्रयोगाला नव्याने सुरू करण्याचा अप्रोच असतो. तो मालिकेतही जाणवतो. एकच दळण आठवडाभर कांडत बसायचं नसल्यानं त्यांना सुटता येतं. मोकळीक राहते. उत्तम अभिनय करणाऱ्या मंडळींच्या साथीला सक्षम लेखक असल्याने मजबुती येते. सभोवतालची स्पंदन टिपण्यात माहीर लेखिका मनस्विनी लता रवींद्र आणि कॉमेडी शोजसाठी स्किट्स लिखाणात वाकब्गार आशिष पाथरे या द्वयीचे संवाद हा खरा यूएसपी आहे. जनरल बोलण्यातून लगावण्यात येणारे पंचेस, कोपरखळ्या, चिमटे, टोमणे, उपरोधिक गुद्दे यांची भरगच्च मेजवानी अनुभवायला मिळते. विशिष्ट दिवसाचा कथानकाचा प्लॉट तगडा असेल तर मैफल खुलते. पण अनेकदा स्किट्ससाठी विषयच नसतो. काहीतरी फुटकळ विषयावर एपिसोड ढकलायचा असल्याने अनेकदा ग्रीप सुटते. आज नाही सगळा एपिसोड बघितला तरी चालेल वाटू लागतं. मात्र दुसऱ्या दिवशी पुन्हा चार्ज्डअप होतो आपण.

– अमेय वाघचा अपवाद सोडला तर बाकी सगळ्यांसाठी टीव्हीवरचं हे पहिलंच मोठं प्रोजेक्ट आहे. डेली सोप म्हटलं की कोणते कलाकार पाहायला मिळतील हे लक्षात येतं. मात्र इथे अख्खं युनिटच नवीन आहे. म्हणून त्यांच्या अप्रोचमध्ये फ्रेशनेस जाणवतो. केवळ मालिकेसाठी त्यांच्यात बाँडिग झालंय असं वाटत नाही. प्रत्यक्ष आयुष्यातही त्यांची दोस्ती आहे. आणि ते पुरेपूर रिफ्लेक्ट होतं काम करताना. प्रत्येक कॅरेक्टरला प्रांताची आणि समाजातल्या स्तराची ओळख दिलेली आहे. सुजय-इन्टलेक्युच्युअल, जबाबदाऱ्यांमुळे प्रौढ झालेला संयमी, विचारी आणि पुण्याचा. बडे बाप का बेटा मात्र क्रिएटीव्ह स्पेसवरून वडिलांशी भांडण असलेला कैवल्य, पारंपरिक वळणाची मात्र खंबीर, सोशिक रेश्मा, आईवडिलांच्या भांडणामुळे घर सोडलेली अल्लड अ‍ॅना, कॉन्फिडन्स हा व्यक्तिमत्त्वाचा मेजर फॅक्टर असलेली ‘अरे’ला ‘कारे’ करणारी मीनल, गुंडगिरीची पाश्र्वभूमी असणारा मात्र हळवा आशु. या पाचही जणांनी आपलं बेअरिंग घट्ट पकडलं आहे.

– गोष्टी सटल पद्धतीनेही दाखवता येतात ही शिकवण दुनियादारीने अन्य मालिकांना दिली आहे. सुरुवातीच्या दिवसात रेश्मा माजघरात दाखल झाल्यावरचा सीन होता. सगळेजण झोपतात. सकाळी कैवल्यचा पाय चुकून रेश्माच्या पांघरुणावर असतो. नैतिकता संपली असा डंका पिटत आठवडाभर चालेला एवढा ड्रामा या सीनमध्ये होता. पण केवळ तीन-चार फ्रेममध्ये रेश्माला तिचा झालेला गैरसमज चुकीचा आहे हे समजवलं जातं. सुजयची बहीण कैवल्यच्या प्रेमात पडते. हे कैवल्य सुजयला सांगतो तो सीन. हे प्रेम नाही, शारीरिक आकर्षण आहे. तिचं वय आहे असं वाटण्याचं मात्र त्याच वेळी मित्राला काय वाटेल याने अवघडलेला कैवल्य आणि ऐकल्यावर स्तब्ध झालेला सुजय. खूप मसालेदार करता आलं असतं. पण सिंपल ठेवल्यामुळे त्यातला खरेपणा वाढला. खरंतर ही तरुण पिढीची कहाणी आहे. पण विषय केवळ तरुणांचेच नसतात. एखाद्या प्रॉपर कुटुंबाचे जे विषय असतात ते मांडले जातात. त्यामुळे तरुण पिढी पाहतेच मात्र असंख्य मध्यमवयीन तसंच ज्येष्ठ नागरिकही ही मालिका पाहतात. हे जग, त्यांचे प्रॉब्लेम कुठेतरी आपलेच आहेत हे युवा पिढीला वाटणं मालिकेचं यश आहे. संवाद कमी ऐकू येतील एवढं लाऊड बॅकग्राऊंड म्युझिक हल्ली सीरियलमध्ये असते. दुनियादारीत जाणीवपूर्वक माइल्ड मात्र त्याच वेळी अर्थपूर्ण संगीत मागे वाजत राहतं. टायटल साँग फर्स्ट इंप्रेशन असतं. तीन गायकांनी गायलेलं हे पहिलेच मराठी टायटल साँग असावं. गाण्याचा व्हीडिओही चातुर्याने तयार करण्यात आला आहे. पाच कॅरेक्टर्सच्या चेहऱ्यांचं होणारं मिक्सिंग एका वेळी त्यांच्यातले वेगळेपण आणि एकी दाखवतात.

– प्रत्येक मालिकेत सबट्रॅक असतात. इथं मुळात रोज नवीन प्लॉट असल्याने सप्लीमेंटरी पात्रांची गरज वाढते. किंजल हा प्रकार डोक्यात जाणारा. पण डोक्यात जाणारी माणसं आपल्याही आजूबाजूला असतातच की. प्रज्ञेश आणि प्रगल्भा सर्वाधिक खपणीय. या सप्लीमेंटरी पात्रांना किती आणि केव्हा उपयोगात आणायचं याचं अचूक प्लॅनिंग दिसतं. भरलेल्या ताटात लोणचं-कोशिंबीर असतं तेवढंच. दोस्तीवरच्या मालिका शनि-रवी सेंगमेंटमध्ये जातात. पण डेलीसोप प्रकारात मांडणी धाडसी आहे. याआधी बेधुंद मनाच्या लहरी सीरियलला उत्तम प्रतिसाद मिळाला होता. छोटेखानी ४०५ आनंदवन लोकप्रिय झाली होती. पण डे इन डे आऊट दोस्तीवर मालिका रेटणं कठीण आहे. प्रयोगातली गंमत हरवण्याआधी एकदा अनुभवायला हवी.
पराग फाटक –