मराठी चित्रपटाच्या इतिहासात उत्पन्नाचे नवे विक्रम रचणाऱ्या ‘दुनियादारी’च्या चमूने उत्पन्नाचा नवा उच्चांक प्रस्थापित करणाऱ्या ‘टाइमपास’च्या चमूला ‘रेकॉर्डब्रेक ट्रॉफी’देऊन सन्मानित केले. यापुढे जो कोणता मराठी चित्रपट अगोदरच्या चित्रपटाच्या उत्पन्नाचा विक्रम मोडेल, त्या चित्रपटाच्या पथकाला ही ‘रेकॉर्डब्रेक ट्रॉफी’ हस्तांतरित केली जावी आणि हा फिरता चषक राहावा, अशी यामागील कल्पना आहे. एस्सेल व्हिजन प्रॉडक्शन, अथांग कम्युनिकेशन, झी टॉकीज यांची संयुक्त निर्मिती असलेल्या ‘टाइमपास’ने आजवर ३० कोटींहून अधिक महसूल मिळवून मराठी चित्रपटाच्या इतिहासात विक्रम प्रस्थापित केला आहे. त्यानिमित्त बुधवारी एका खास कार्यक्रमात ‘दुनियादारी’चे दिग्दर्शक आणि प्रसिद्ध सिनेमॅटोग्राफर संजय जाधव व चित्रपटातील कलाकारांच्या हस्ते ही ट्रॉफी ‘टाइमपास’चे दिग्दर्शक रवी जाधव यांच्याकडे सुपूर्द करण्यात आली. याप्रसंगी रवी जाधव, व्हिडीओ पॅलेसचे नानुभाई तसेच दिग्दर्शक संजय जाधव यांच्यासह ‘दुनियादारी’ चित्रपटातील कलाकार अंकुश चौधरी, स्वप्नील जोशी, उर्मिला कानेटकर, सुशांत शेलार आदी व्यासपीठावर उपस्थित होते. ‘रेकॉर्डब्रेक ट्रॉफी’ देण्यामागील उद्देश सांगताना संजय जाधव म्हणाले की, ‘दुनियादारी’च्या उत्पन्नाचा विक्रम ‘टाइमपास’ने मोडला याचा आम्हालाही आनंद आहे. मराठी चित्रपटांमध्ये निकोप स्पर्धा होऊन एकमेकांना प्रोत्साहित करण्यासाठी आम्ही हा फिरता चषक आज रवी जाधव यांच्याकडे सुपूर्द करत आहोत. यापुढे ‘टाइमपास’चा विक्रम जो मराठी चित्रपट मोडेल, त्यांना हा फिरता चषक रवी जाधव यांनी द्यावा.