सध्या लॉकाडउनमुळे सर्वचजण घरात अडकून पडले आहेत. यात कलाकारांचा देखील समावेश आहे. कलाकार लॉकडाउनमुळे मिळालेल्या वेळात सोशल मीडियाचा वापर मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे दिसत आहे. तसेच ते त्यांचे जुने फोटो आणि व्हिडीओ सोशल मीडियावर चाहत्यांसोबत शेअर करताना दिसत आहेत. त्यामुळे सोशल मीडियावर थ्रोबॅक व्हिडीओचा ट्रेंड सुरु आहे. अशातच  बॉलिवूड अभिनेता रणवीर सिंगचा एक व्हिडीओ व्हायरल झाला आहे.

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या या व्हिडीओमध्ये रणवीरची एक वेगळी बाजू पाहायला मिळाली आहे. तो मुलाखतीमध्ये भावुक झाला आहे. या मुलाखतीमध्ये रणवीरला त्याच्या खासगी आयुष्याबद्दल आणि कामाविषयी काही गोष्टी विचारण्यात आल्या होत्या. त्यावर रणवीरने उत्तर देण्याआधी त्याला सरप्राइज म्हणून आईचा व्हिडीओ दाखवण्यात येतो. रणवीरची आई त्याच्या आयुष्यात त्याने किती संघर्ष केला आहे हे त्या व्हिडीओमध्ये सांगताना दिसत आहे.

‘रणवीरच्या करिअरच्या सुरुवातीच्या वेळी जेव्हा तो घरी परतायचा तेव्हा आई आजचा दिवस खूप खराब होता इतकच बोलायचा. पण मला त्याच्या चेहऱ्याकडे बघून तो किती निराश आहे हे कळायचे. आम्ही सगळे दु:खी होऊ नये म्हणून त्याने त्यावेळी आम्हाला काहीच सांगितले नाही. पण आता तो लोकप्रिय अभिनेता झाल्यानंतर त्याच्या करिअरच्या सुरुवातीच्या दिवसांबद्दल सांगत असतो. त्यावेळी त्याला काय काय करावे लागले, कोणी कशा कमेंट केल्या होत्या. त्याने स्वत:चे दु:ख कधीच आम्हाला सांगितले नाही. पण आता हे सर्व ऐकून तो किती संघर्ष करुन इतक्या उंचीवर पोहोचला आहे हे कळते’ असे रणवीरची आई म्हणाली.

आईचे बोलणे ऐकून रणवीरच्या डोळ्यात पाणी आले. त्याला रडताना पाहून शोची सूत्रसंचालिका सिमी गरेवाल रणवीरची माफी मागत त्याला शांत करताना दिसते. आज रणवीर बॉलिवूडमधील एक लोकप्रिय कलाकार आहे. पण त्याला इथं पर्यंत पोहोचण्यासाठी किती संघर्ष करावा लागला आहे हे त्याच्या आईच्या बोलण्यावरुन दिसत आहे.