भारतातील धर्मभेद आणि जातीयवादाप्रमाणेच पाश्चिमात्य संस्कृतीत वर्णभेदाची पाळेमुळे खोलवर रुजलेली दिसतात. आज विज्ञान तंत्रज्ञानाच्या युगातही या चुकीच्या विचारसरणीचा प्रभाव ओसरलेला दिसत नाही, उलट ही विकृती माहिती तंत्रज्ञानाच्या माध्यमातूनच अधिकच बळावल्याचे दिसून येते. १९७३ साली मार्लोन ब्रांडो यांनी ‘द गॉडफादर’ या चित्रपटासाठी मिळालेला सर्वोत्कृष्ट अभिनयाचा ऑस्कर पुरस्कार वर्णद्वेषाबद्दल निषेध व्यक्त करण्यासाठी नाकारला होता. आज या घटनेला ४४ वर्षे झाली परंतु त्या नंतर पुरस्कार नाकारणे हा जणू ट्रेंडच सुरू झाला. आजवर रोमन पोलन्स्की, मायकेल केन, एलिझाबेथ टेलर, वुडी अ‍ॅलन यांसारख्या कित्येक कलाकारांनी वर्णद्वेषाविरोधात आवाज उठवण्यासाठी पुरस्कार नाकारले आहेत.सुपरस्टार ‘रॉक’ ऊर्फ ड्वेन जॉन्सन यानेही या आंदोलनकर्त्यां कलाकारांच्या पावलांवर पाऊल ठेवत ‘गोल्डन ग्लोब’ पुरस्कारांविरोधात निषेध व्यक्त केला आहे.

‘गोल्डन ग्लोब २०१८’ पुरस्कार नामांकनात परीक्षकांनी कृष्णवर्णीय कलाकारांना मुद्दामहून डावलल्याचा आरोप ड्वेनने केला असून त्या विरोधात आवाज उठवण्यासाठी थेट पुरस्कार सोहळ्यावरच बहिष्कार टाकण्याची मागणी त्याने केली आहे. त्याच्या मते वर्णद्वेष ही एक गंभीर समस्या असून त्याच्याविरोधात आवाज उठवण्यासाठी चित्रपट हे एक उत्तम माध्यम आहे, परंतु ‘ऑस्कर’ किंवा ‘गोल्डन ग्लोब’ सारख्या प्रतिष्ठित पुरस्कारांच्या माध्यमातून काही मूठभर विकृत मंडळी आपल्या वैयक्तिक नफ्यासाठी त्या समस्येला आणखीन वाढवण्याचा प्रयत्न करत आहेत आणि अशा मंडळींना वेळीच थांबवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन प्रयत्न करणे गरजेचे आहे. सध्या या पुरस्कारांविरोधात रमी मलेक, डोनाल्ड ग्लोवर, टॉम हिडलस्टन, विल स्मिथ यांसारख्या अनेक कलाकारांनी निषेध व्यक्त केला असून त्यांच्या लढय़ाला प्रोत्साहन देण्यासाठी ड्वेनने जाहीर निषेध केला आहे.