आटपाट नगरातल्या राजकुमाराने सुंदर राजकन्येला दुष्ट राक्षसाच्या तावडीतून वाचवले आणि नंतर ती दोघं सुखाने संसार करू लागली. लहानपणी गोष्टीच्या पुस्तकातील या गोंडस गोष्टींचा हा नेमून दिलेला शेवट आपल्याला ठाऊक असूनही ती गोष्ट वाचण्याची उत्सुकता तसूभरसुद्धा कमी व्हायची नाही. कालांतराने आपल्याकडे गोष्टीच्या पुस्तकांची जागा टीव्हीने घेतली, त्यातही अशाच राजाराणीच्या संसाराच्या गोष्टी सांगितल्या जाऊ लागल्या. त्यांचाही शेवट थोडय़ाअधिक फरकाने हाच असतो; पण सध्या टीव्हीवर दाखवल्या जाणाऱ्या राजकुमार आणि राजकन्येच्या गोष्टी फार बदलल्या आहेत. आता राक्षसाची जागा प्रेमातलाच संशय, मत्सर आणि दगाबाजीने घेतली आहे आणि प्रेमकथांच्या गोंडस शेवटालाही तुरुंगवास, मृत्यू, एकलकोंडेपणा यांनी ग्रहण लावले आहे. टीव्हीवर सध्या प्रेम, प्रेमातून निर्माण होणारा संशय, मत्सर आणि त्यातून घडत जाणारे गुन्हे यावर आधारित मालिकांचे प्रमाण वाढू लागले आहे.
तरुणांसाठीच्या वाहिन्यांची वाढती संख्या.
नेहमीच्या सासू-सून मालिकांमुळे टीव्हीपासून दूर गेलेल्या तरुण प्रेक्षकवर्गाला पुन्हा आपल्याकडे खेचून आणण्यासाठी ‘एम टीव्ही’, ‘चॅनेल व्ही’, ‘िबदास’सारख्या वाहिन्या जोमाने कामाला लागल्या आहेत. सुरुवातीला ‘एम टीव्ही’ने ‘स्प्लिट्सव्हिला’, ‘रोडीज’ यांसारखे रिअ‍ॅलिटी शो, तर ‘चॅनेल व्ही’ने ‘हम से है लाइफ’, ‘सुवरीन गुगल-टॉपर ऑफ इयर’ यांसारख्या तरुणाईच्या कॉलेजविश्वाभोवती फिरणाऱ्या मालिका आणून आपापला प्रेक्षकवर्ग निश्चित केला होता; पण हळूहळू ‘रोडीज’सारख्या शोज आणि मालिकांमध्ये तोचतोचपणा येऊ लागला. त्याचदरम्यान ‘िबदास’ने ‘इमोशनल अत्याचार’ या शोमधून गोंडस, गोड प्रेमकथांमागे दडलेली फसवेगिरी सर्वासमोर आणली. शोच्या माध्यमातून आपल्या जोडीदाराच्या सच्चेपणाची परीक्षा घेण्याची सुरुवात या शोमधून झाली. त्यामुळे आपल्या प्रेमावर संशयाची कीड लागलेली तरुणाई या शोकडे वळू लागली. ‘इमोशनल अत्याचार’सारख्या मालिकेला मिळणारा तरुणांचा प्रतिसाद पाहून मग त्याच धर्तीवर प्रेम आणि मत्री यांमधील वास्तव दाखवणाऱ्या ‘गुमराह’, ‘पाँच’, ‘एम टीव्ही वेब्ड’, ‘प्यार का दी एन्ड’ यांसारख्या शोज आणि मालिका यायला सुरुवात झाली.
वास्तवाचे दर्शन
व्यभिचारामुळे जोडीदाराचा खून, नकारामुळे तरुणींवर केलेले हल्ले आणि बलात्कार, रॅिगग आणि त्यातून आलेल्या नराश्येतून केलेल्या आत्महत्या, कॉलेजमध्ये जात, राहणीमान यामुळे केला जाणारा भेदभाव हे विषय तरुणाईला नवीन किंवा काल्पनिक नव्हते. त्यांच्या आजूबाजूला घडणाऱ्या याच विषयांना या शोजमधून सर्वासमोर आणले गेले. ‘इमोशनल अत्याचार’मधून तुमचा जोडीदार तुमच्या नकळत कसा आणि किती फसवतो आहे हे दाखवले गेले, तर ‘गुमराह’मध्ये छोटय़ाछोटय़ा कारणांमुळे नकळतपणे किंवा जाणूनबुजून तुमचा मित्र, जोडीदार अगदी तुमचा जीव घेण्यासही मागेपुढे पाहत नाही हे सांगितले गेले. ‘एम टीव्ही वेब्ड’मध्ये सोशल मीडियाच्या माध्यमातून होणारे फसवणुकीचे प्रकार समोर आले, तर नवीन येणाऱ्या ‘प्यार का दी एन्ड’ या शोमधून प्रेमात फसवणूक केल्यास त्याचे काय परिणाम होऊ शकतात, हे सांगितले जाणार आहे. ‘पाँच’ ही मालिका रॅिगग आणि त्यामुळे घेतलेला सूड यावर आधारित होती.
वास्तव घटना आणि प्रत्यक्ष सहभागी
या सर्व शोजमध्ये भाग घेणारे स्पधर्क खरे होते. त्यांच्यासोबत घडलेल्या वास्तव घटना त्यांनी लोकांसमोर आणल्या. त्यामुळे आतापर्यंत पडद्याच्या मागे राहिलेल्या किंवा वर्तमानपत्रातील एक छोटी बातमी बनलेल्या या घटनांना टीव्हीचे माध्यम मिळाले. या शोमध्ये तरुण-तरुणी स्वत: येऊन त्यांची आपबीती सांगतात. त्यामुळे या कथा आपोआपच तरुणाईला आपल्याशा वाटू लागल्या आहेत. या वाहिन्यांचे सोशल मीडियावरील पेजेस आणि मेलबॉक्स अशा घटनांनी भरायला सुरुवात झाली. तरुणांनी आपल्यासोबत झालेल्या फसवणूक, दादागिरी, अन्याय, बळजबरीबाबत उघडपणे बोलायला सुरुवात केली.
सोशल मीडिया, स्मार्ट फोन हे तरुणाईचे जीव की प्राण; पण याच माध्यमांचा फायदा घेत आपल्या जवळचे लोक आपल्या नकळत आपल्याला कसे फसवू शकतात याचे चित्रण या शोजमधून करण्यात आले. स्पाय कॅमेऱ्याने केलेली गुप्तहेरी, खासगी क्षणांच्या चित्रीकरणाचा गरवापर, सोशल मीडियावरील माहितीचा आणि छायाचित्रांचा गरवापर यातून काय-काय घडते हे या मालिकांमधून दिसल्यानंतर तंत्रज्ञानाच्या आहारी गेलेली तरुण पिढी खाड्कन जागी झाली. त्यामुळे मित्रांबरोबर, प्रियाजनांसोबत असतानाही दक्ष राहण्याची खबरदारी घेण्याचा संदेश या शोजमधून देण्यात येऊ लागला.  
आपल्या आजूबाजूला, आपल्यासोबत घडणाऱ्या घटनांविषयी बोलणारे शोज म्हणून सध्या हे शोज तरुणाईमध्ये लोकप्रिय आहेत; परंतु टीव्हीवरील पोलिसांच्या मालिका पाहून गुन्हा करायची क्लृप्ती मिळाल्याच्या घटना आपल्याला नवीन नाहीत. या मालिकांच्या संदर्भातसुद्धा असे होणार नाही का? यावर वाहिन्यांचे उत्तर ‘नाही’ असे आहे. चॅनेल व्हीचे प्रमुख अजित ठाकूर यांच्या मते, असे शोज ही आजची गरज आहे आणि म्हणूनच त्यांची संख्या वाढते आहे. असे शोज हे एक प्रकारे समाजाचा आरसाच असतात. यातून आम्हाला लोकांना कायद्याची ओळखच करून द्यायची असते. उद्या तुम्ही कळत-नकळत किंवा जाणूनबुजून गुन्हा केला तर त्याचे परिणाम काय होतील, हेच आम्हाला लोकांच्या मनात बिंबवायचे असते. ‘प्यार का दी एन्ड’सारख्या शोजमधून प्रेमात घडणाऱ्या घटनांचे एक वेगळे परिमाण दाखवायचा आपला प्रयत्न असल्याचे डिस्ने मीडिया नेटवर्क्‍सचे आशय आणि संपर्क प्रमुख विजय सुब्रमण्यम यांनी सांगितले. प्रेमात अविश्वासाचे, संशयाचे प्रसंग अनेकदा येतात, मात्र अशा वेळी डोकं शांत ठेवून धैर्याने आणि संयमाने त्याची उकल केल्यास आपल्या हातून अनिष्ट कृती घडणार नाही, हेच आम्हाला या मालिकेतून सांगायचे आहे, असे सुब्रमण्यम यांनी स्पष्ट केले.